चिपळूण : वाशिष्ठी नदीने २२ जुलैला हाहाकार माजवत चिपळूण शहरासह अनेक गावे, वाड्यावस्त्या, हजारो एकर शेती कवेत घेतली होती. चिपळूणच्या इतिहासातील त्या महाप्रलयाला वर्ष झाले. वर्ष पूर्ण झाल्यानंतर सामान्य नागरिकांनी काय धडा घेतला. याचा शोध घेताना प्रशासकीय पातळीवर चांगले प्रयत्न होत आहेत. मात्र, त्याला सामान्य नागरिकांची अजूनही साथ मिळत नाही, असे दिसते. अजूनही गटाराच्या कडेलाच कचरा टाकला जात आहे. हा कचरा गटारात जाऊन गटारे तुंबतात.
गेल्यावर्षी सह्याद्रीच्या पट्ट्यात ढगफुटी झाली. २००५ मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती झाली. वाशिष्ठी नदीची पाणी पातळी कुठे दहा ते कुठे पंधरा फुटापर्यंत पोहचली. २१ जुलैच्या रात्रीपासूनच पाणी पातळी वाढत होती. शहरासह उपनगर पाण्याखाली होते. नागरिकांना स्थलांतर व्हावे लागले. त्याला वर्ष झाले. या महाप्रलयातून नागरिकांनी काय धडा घेतला, याचा विचार केला तर हाती भोपळाच दिसतोय.
गटारात कचरा टाकण्याच्या मानसिकतेतून नागरिक अद्यापही बाहेर येत नाहीत. झाडांचा पाळापाचोळाही गटाराच्या कडेला टाकला जात आहे. पूरावर मात करण्यासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचा विषय मांडण्यात आला. सुरवातीला हा विषय महाकाय वाटत होता.अतिवृष्टीचा धोका तुर्तास टळला असला तरी पूर येऊ नये, म्हणून पालिकेकडून ज्या उपायोजना सुरू आहेत, त्याला नागरिकांकडून म्हणावी तशी साथ मिळत नाही.
वाशिष्ठी नदी किनारी मोठी भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याची चर्चा केवळ हवेतच राहिली. महापुरानंतर रेड झोनमधील बांधकामे काढण्यासाठी पालिका आणि जिल्हा प्रशासनाने विचार केला. मात्र, एकही बांधकाम काढण्यात आलेले नाही. इतका मोठा प्रलय आल्यानंतरही पूरपट्यातील बांधकामाची संख्याही वाढतेच आहे.
नागरिकांनी कचरा गटार किंवा नाल्यात टाकू नये, यासाठी आम्ही नागरिकांचे प्रबोधन करीत आहोत. घरोघरी फिरून पालिकेचे पथक नागरिकांना सांगत आहेत. गटार किंवा नाल्यात टाकलेला कचरा बाहेर काढण्यासाठी सफाई कामगारांना गटारात उतरावे लागत आहे. त्यामुळे यापुढे कठोर कारवाई करावी लागणार आहे.
-वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग, चिपळूण पालिका
चिपळूणमध्ये महापूर आल्यानंतर तत्कालीन मंत्र्यांनी केवळ शासनाचा प्रतिनिधी म्हणून असंख्य बैठका घेतल्या. अनेक निर्णय जाहीर केले. त्यातील एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. पावसाळा संपल्यानंतर पाहुणे म्हणून येणारे लोकप्रतिनिधीही गायब झाले. चिपळूण बचाव समतीने गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला नसता आणि आमदार शेखर निकम यांची साथ मिळाली नसती तर हा प्रश्न कायमस्वरूपी भिजत राहिला असता.
-शब्बीर घारे, गोवळकोट, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.