२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तर खूप ठिकाणी भेगा तसेच दरड कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले होते.
चिपळूण : दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत डोंगराला भेगा घेऊन कोळकेवाडीतील (Kolkewadi) कुटुंबे अजूनही जीव मुठीत घेऊन रहात आहेत. प्रशासन केवळ पावसाळ्याच्या सुरवातीला स्थलांतराच्या नोटीसा पाठवत बसले आहे; स्थलांतराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
अशा परिस्थितीत बुधवारी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi Raigad) येथे दरड (Irshalwadi landslide) कोसळून मोठी दुर्घटना घडली, अन् कोळकेवाडी हादरून गेले, अनामिक भीतीने गावकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. सतत असे भीतीच्या छायेत राहण्याऐवजी येथील लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.
कोळकेवाडीतील बोलाडवाडी, बौद्धवाडी, तांबडवाडी, हसरेवाडी पूर्व, खारावजवाडी, वाडसाडी, कावलावणे, जांभराई या वाड्या कोयना प्रकल्प धरणक्षेत्रातील कोळकेवाडी धरणाच्या दुतर्फा प्रशासनाने वसवलेल्या आहेत. ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी गावातील डोंगरभागाला भेगा गेल्या.
२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तर खूप ठिकाणी भेगा तसेच दरड कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले होते. यावेळी प्रशासनामार्फत कोळकेवाडी गावाचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. तो सर्वेक्षण अहवालही अद्याप दिला गेला नाही. सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावातील काही भाग हा धोकादायक स्थितीत आहे, असे तोंडी सांगितले होते.
परंतु, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरवर्षी जून महिन्यात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची नोटीस काढून आपली बाजू मोकळी करण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र, पुढे वर्षभर त्याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही.
आधीच कोयना प्रकल्पामुळे गावातील जमिनी प्रामुख्याने शेतजमीन संपादित झाली आहे. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाला आहे. भूमिहीनांना शेतजमीन देण्यात येईल, असे २०१४ मध्ये तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या मुख्य सचिवांकडून आदेश देण्यात आले होते.
त्याबाबतही अद्याप कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. कोयना प्रकल्पाकडे वारंवार मागणी करूनही इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. गावातील वाड्यांत नागरी सुविधा मिळण्याबाबत पाटबंधारेकडून सर्वेक्षण झाले; परंतु त्यांच्याकडूनही कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही होत नाही.
कोळकेवाडीतून चिपळूणमधील गावांना जलजीवन मिशनअंतर्गत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ग्रॅव्हिटी नळपाणी योजना मंजूर झाल्या आहेत. त्या पाईपलाईनचे खोदकामही भेगा गेलेल्या भागातूनच केले आहे. याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
कोळकेवाडी डोंगराला भेगा गेल्यानंतर प्रशासनाकडून स्थलांतरबाबत ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. भूगर्भ शास्त्रज्ञाचे अहवाल अजून आलेले नाहीत. पावसाळा आला की, केवळ स्थलांतर नोटीस देऊन मोकळे होतात. रोज मरे त्याला कोण रडे यासारखी अवस्था झाली आहे. इर्शाळवाडी दुर्घटना लक्षात घेऊन तरी आता प्रशासनाने पावले उचलावीत.
- नीलेश कदम, माजी सरपंच कोळकेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.