विश्व देवरहाटीचे

धुक्याची चादर अलगद बाजूला सरकावून येणाऱ्या उबदार किरणांचा शिडकावा. धनेश, पोपट, कोतवाल, शिळकस्तूर आणि इतर पाखरांच्या कानावर पडणाऱ्या गुजगोष्टी. वाऱ्याची आणि पानांची अलगद होणारी सळसळ.
connection with nature and human ratnagiri
connection with nature and human ratnagiriSakal
Updated on

धुक्याची चादर अलगद बाजूला सरकावून येणाऱ्या उबदार किरणांचा शिडकावा. धनेश, पोपट, कोतवाल, शिळकस्तूर आणि इतर पाखरांच्या कानावर पडणाऱ्या गुजगोष्टी. वाऱ्याची आणि पानांची अलगद होणारी सळसळ.

देवळातील मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दिसणारी तेजप्रभावळ आणि मनाला भावुक करणारी शांतता. कोकणात गावोगावी गाव देवळाच्या सानिध्यात किंवा जंगलाच्या आजूबाजूला वसलेल्या अशा रहाटी वर्षानुवर्षे डामडौलात उभ्या आहेत.

कोणत्याही कायद्याने संरक्षण नसतानासुद्धा राईमध्ये प्रवेश करणे सुद्धा निषिद्ध मानले जाते. इथल्या काटक्या उचलणे तर दूरच पण फळे, फुले सुद्धा गोळा केली जात नाहीत. प्रत्येक देवराईचे नियम वेगवेगळे,

काही अतिशय कडक जिथे जमिनीवर पडलेले एखादे पानदेखील आणण्यास मनाई असते तर काही ठिकाणी थोडे शिथिल जेथे मर्यादित स्वरूपात अडीअडचणीच्या काळात तिथली चीजवस्तू वापरण्यास परवानगी असते. परंतु, सर्वत्र एक उद्दिष्ट मात्र जीवापाड कायम जपले जाते ते म्हणजे निसर्ग आणि मनुष्याचा भावसंबंध.

- प्रतीक मोरे, देवरूख moreprateik@gmail.com

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून २४०० पेक्षा जास्त देवराया वसलेल्या आहेत. त्यापैकी सिंधुदुर्गात १५०० तर रत्नागिरीमध्ये साधारणतः ९०० राया आहेत. कौलारू, बसके लाकडाचे कलाकुसर केलेले, मातीच्या भिंती आणि नळ्यांनी शाकारलेली मंदिराची इमारत,

छताला अडकवलेली पालखी, कोपऱ्यात रचून ठेवलेली भांडी, सारवलेली जमीन आणि गावकऱ्यांना बसण्यासाठी बांधलेला कट्टा अशी मुख्य रचना असणारी गावदेवळे बहुतेक ठिकाणी आहेत.

पुजाऱ्याने सकाळी लवकर यावे, कडेला वाहणाऱ्या झऱ्यातून पाणी आणावे, धूप, अगरबत्तीच्या मंद सुवासाने आसमंत दरवळून जावा आणि समोरच्या प्रांगणात फुललेल्या सीता अशोकाच्या रंगाप्रमाणे संपूर्ण आसमंत भरून जावा अशी अनुभूती एखाद्या राईतच मिळू शकते. देवळाच्या शेजारून ओढ्यावर जाणारी पायवाट आता पाखाडीने बांधून काढली आहे.

दोन्ही बाजूने लावलेले सूरमाड, त्यांच्यावर लटकलेले फळांचे घोस आणि पायरीवर पडलेला नाजूक फुलांचा सडा ओलांडून तुम्ही पुढे गेलात की तुमची नजर ठरणार नाही एवढ्या बुंध्याचा बेहडा तुमच स्वागत करतो.

उन्हाळ्याच्या काळात पिवळसर फुलांचे झुबके, एकाच वेळी घुमणाऱ्या हजारो मधमाश्या, आणि मधासारखा पोटात ढवळून आणणारा मनमोहक सुगंध भेळ्याची ओळख करून देतो. खाली पडलेली राखाडी रंगाची टणक फळे आतल्या पिवळसर गाभ्याने सहज ओळखता येतात.

शेजारीच पायरीवर दगडाने फळ फोडून त्यातला गर तोंडात टाकावा. चणे आणि बदाम याचं मिश्रण असणारी अनोखी चव जिभेला नक्कीच भुरळ पाडते. मात्र, त्या मोहापासून दूर राहणेच चांगले. लहानपणी अशी भरपूर फळे खाऊन पोटात मांजरे पडलेली अजून स्मरतात. याच्या रुंद बुंध्यावरून नजर वर गेली की मोठमोठ्या ढोल्या नजरेला पडतात. एखादा पिंगळा आणि पोपट किंवा मैना यांच्यात या ढोलीच्या कब्जावरून उडणारी भांडणे नित्याचीच.

दुपारच्या शांततेत तांबट आणि सुतार पक्ष्यांची खोडावर चाललेली ठोकाठोक आणि वानराच्या टोळीतील पिल्लांचे खेळ बघत एखादी दुपार शांत डुलकी घेत इथेच काढावी. जमिनीवर फिरणाऱ्या केकाटी, बुलबुल आणि कस्तूर कोंबड्यांचा गलका तुम्हाला जागे करतो.

एखादी धामण पाण्याच्या डोहावरून सरपटत निघालेली असते. डोळे अर्धवट बंद करून डुलक्या घेणारे वनघुबड या गलक्याने जागे होते. या सगळ्या कलकलाटात मुरून बसलेले पिसोरी हरण बुजते आणि धावत ओढ्यापालीकडील जाळीत गायब होते. शेपटीला काळे टोक असणारी मुंगसे कुतूहलाने फेरी मारून जातात.

उन्ह उतरू लागली की रानकोंबड्याची रात्रीचा निवारा शोधण्याची धावपळ सुरू होते. पिल्लांना पोटाशी घेऊन कोंबडी झाडाचा बुंधा पकडते तर ऐटबाज तुरा आणि शेपटी असणारा कोंबडा झाडाचा शेंडा गाठून रातपहारा सुरू झाल्याची तान अख्ख्या जंगलाला ऐकवतो.

रात्र होऊ लागली की मग मंडूकमुखी, रातवे आणि घुबड यांच्याकडे कार्यभार सोपवून बहुतांशी द्विजगण झोपी जातात. चांदण्याच्या मंद प्रकाशात चमकणारे चान्द्फळ, अक्राळविक्राळ वाटणाऱ्या गारंबीच्या फांद्या आणि झाडाझुडूपाच्या अनोळखी सावल्या वातावरण मंत्रमुग्ध करतात.

मिणमिणत्या समईच्या प्रकाशात उग्र वाटणाऱ्या रक्षक देवतांच्या प्रभावळी, रात्रीचा पडू लागणारा गारवा आणि दूरवरून येणारी बिबट्याची मादीला घातलेली साद तुम्हाला घराची आठवण करून देते. एखादी रात्र इथे काढूया असा संकल्प करत पावले घराची वाट केव्हा चालू लागतात हे सुद्धा कळत नाही.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.