मंडणगड : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावासाठी कोटींच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र आजही गावाची परिस्थिती जैसे थे असल्याने घटनात्मक मूल्यांची पायमल्ली होत असल्याच्या भावना आंबडवेवासीय व्यक्त करत आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या भेटीनंतरही यामध्ये काहीच बदल झाला नाही.
मंत्री, नेते, अधिकाऱ्यांनी भेटी देत आदर्श संसद ग्राम, पंचतीर्थ, शिल्पसृष्टी, पर्यटन भवन, डिजिटल गाव, राष्ट्रीय महामार्ग, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे ग्रंथालय अशा लाखो, कोटींच्या विकासकामांची आश्वासने दिली; मात्र ही आश्वासने फक्त घोषणाच ठरल्या आहेत. त्यामुळे देशाला घटना देणाऱ्या घटनाकारांच्या मूळगावाबाबत अशा दिखाऊपणाच्या भूमिकेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र शासनाने आंबडवेला पंचतीर्थ घोषित केले; मात्र अन्य स्थळांच्या मानाने आंबडवे दुर्लक्षितच राहिले आहे. हे गाव अजूनही भौतिक, मूलभूत सोयींसाठी झगडताना दिसते.
एकात्मता बळकट करणारा संविधान दिन
देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासीनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा, देशातील सर्व गावे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन आंबडवेच्या ग्रामस्थांनी केले.
आंबडवेला पंचतीर्थ, जागतिक दर्जाचे स्थळ अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी फक्त भेट देऊन आश्वस्त करतात. ज्या घटनेवर देशाचा कारभार चालतो त्या घटनाकारांचे मूळगाव आजही उपेक्षित ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत घटना कळणार नाही तोपर्यंत चांगले आणि देशहितकारक राजकारण होणार नाही.
- सुदामबाबा सकपाळ, ज्येष्ठ ग्रामस्थ, आंबडवे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.