Crime: परप्रांतीय आचाऱ्याकडे सापडलं पिस्तूल; ४६ राउंडसह २ फायटर जप्त
चिपळूण येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी त्याला अटक केली.
त्याच्याकडील मुद्देमालही जप्त केला आहे. नीरज सिंह हिरा बिस्त (वय २१) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
चिपळूणमधील वालोपे परिसरातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडे विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले होते. मिळालेली माहिती सत्य असल्याचे समजताच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे पुढील नियोजन करून कार्यवाहीला सुरुवात केली होती.
संबंधिताला किंवा त्याच्या बरोबर रूममध्ये राहणाऱ्याला कोणताही सुगावा लागू नये याची पूर्ण काळजी घेत पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. बुधवारी दुपारी १२ वाजता पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याबरोबर सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे, संजय पाटील, उपनिरीक्षक अरुण जाधव, पंकज खोपडे, पूजा चव्हाण, हेड कॉस्टेबल पाटील, शेटकर, दराडे यांनी थेट वालोपे येथील माऊली अपार्टमेंटवर धडक दिली. येथील एका रूममध्ये नीरज हा दरवाजाला आतून कडी लावून असल्याचे पोलिसांना समजताच रुमच्या बाहेर पूर्ण सापळा लावून तसेच सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन पोलिसांनी दरवाजा उघडण्यास भाग पाडले.
दरवाजा उघडताच पोलिसांनी नीरजवर झडप घातली आणि रूमची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड आढळून आले. पोलिसांनी तत्काळ मुद्देमाल ताब्यात घेऊन नीरज सिंह बिस्ता याला अटक केली. पोलिस स्थानकात आणल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता ही पिस्तुल त्याने कोणाकडून घेतली होती आणि कशासाठी बाळगली होती, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले असून त्यावरून अधिक माहिती मिळण्याची श्यक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.