खेड ( रत्नागिरी ) - शहराला पर्यटनाचा दर्जा मिळावा, खेडच्या सौंदर्यात भर पडेल या हेतूने लवकरच खेडला क्रोकोडाईल पार्कची उभारणी करणार असल्याची माहिती खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी "सकाळ'ला दिली. यासाठी पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या पार्कमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. पर्यटकांमुळे खेड बंदर आणि परिसरात छोटे-मोठे व्यवसाय सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जगबुडी नदीत देवणे भागात म्हणजे जुन्या खेड बंदरात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आहे. त्यांना पाहण्यासाठी कोकण तसेच मुंबई व पुण्यातून पर्यटकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा आहे. यासाठी क्रोकोडाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे.
शहरातील गुलमोहर पार्क, शिवाजीनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. तेथील नागरिकांची पाण्यासाठी धावपळ होत होती. म्हणून तो प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्णय घेतला. आता नव्याने सुरू केलेल्या पाण्याच्या टाकीमुळे हा प्रश्न सुटला आहे. नातूनगर ते खेड ही गुरूत्वीय बलाने येणारी पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. ही योजना 50 कोटी रुपयांची आहे. जिजामाता उद्यान, प्रबोधनकार ठाकरे उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या बागेत लष्कराचे 32 फायटर हे विमान बसवण्याचे काम सुरू झाले असून ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक बागेला भेट द्यायला येणार आहेत. येथे लवकरच युद्धातील रणगाडाही बसविण्यात येणार आहे. खेड हा सैनिकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. शहीद जवानांची आठवण म्हणून हे फायटर विमान बसवण्यात आल्याचे खेडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - खेडमधील त्या तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप
सुमारे 60 लाख रुपये खर्च करून शिवतर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबडकर भवन या कामाला प्रारंभ होणार आहे. स्वामी समर्थ मंदिराचे सुशोभीकरण तसेच शहरातील 17 प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जीमची सुविधा पालिका उपलब्ध करून देणार आहे. खेड शहर स्वच्छ असावे म्हणून शहरात 16 हजार कचरापेट्यांचे (डस्टबीन) वाटप करण्यात आल्याचे खेडेकर यांनी सांगितले. विकासाभिमुख उपक्रमामुळे खेड शहर निश्चितच समृद्धीकडे वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह 2007 पासून दुरुस्तीअभावी बंद पडले आहे. ते पाच ते सहा महिन्यात सुरू करणार आहे. शहरातील बौद्धकालीन लेण्याचे कायमस्वरूपी जतन व्हावे म्हणून नगरपालिका या लेण्यांना बंदिस्त करणार आहे. पर्यटकांनी काही अंतरावरून ही लेणी पाहावीत म्हणून हा प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.