Dashavatar: वेळेचे गणित साधताना आयुष्याची गोळाबेरीज, दशावतार लोककलेचे ‘टाईम मॅनेजमेंट’
प्रवास दशावताराचा
‘कायदा पाळा गतीचा, जो थांबला तो संपला’, याप्रमाणे अगदी गतीचा कायदा पाळत अनादी काळापासून या मातीचा सर्वांग सुंदर आविष्कार असणारी लोककला म्हणजे दशावतार, हा कोकणच्या मातीचा जाज्वल्य अभिमान.
दशावतार लोककला आज सामान्य माणसाच्या जगण्याचा भाग झाली खरी; पण भूतकालीन दशावताराचा इतिहास चाळता दशावतारी बाज तसाच ठेवून दशावतार कलेत केले गेलेले ‘टायमिंग मॅनेजमेंट’ हे दशावताराच्या दूरदृष्टीसह प्रगल्भताही सिद्ध करते.
भूतकाळात डोकावल्यास त्यावेळच्या प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढत या लोककलावंतांनी स्वतःच्या घरादारावर ठेवलेलं तुळशीपत्र, मुलाबाळांसह संसाराचा केलेला त्याग या सगळ्या गोष्टी अंगावर आजही शहारे आणतात.
अर्थात, यामध्ये दशावतारी कलावंत, मालक, संचालक यासोबतच त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्यासमोर आजही सहज हात जोडले जातात. प्रतिकुल काळातील दशावतार कलेचे टाईम मॅनेजमेंट आजही त्याच श्रध्देने, निष्ठेने जोपासले जाते.
- प्रा. वैभव खानोलकर
पूर्वी पायी प्रवास करावा लागायचा आणि त्यामुळे किती मैल अंतरावर आपल्याला जायचे आहे, त्याचे नियोजन, यात नेमके कुठे थांबायचे, यांसह सर्व कलावंतांची विश्रांती, जेवण, झोप आदी सगळे नियोजन दशावतार कलावंतांकडून अचूक आणि पध्दतशीर केले जायचे.
संबंधित गावातील पालखी सोहळ्यानंतर धयकाल्यात आडदशावतार साधारणपणे रात्री १२ ते १ दरम्यान सुरू व्हायचे. त्याकाळी लोकांना प्रवासासाठी तितकी साधने उपलब्ध नव्हती. परिणामी दशावतार नाटके सकाळी तांबडे फुटण्यापर्यंत चालायची. यामागे केवळ एकच कारण लपलेले होते की, सूर्य उगवला की त्या प्रकाशात लोकांनी सुखरूपपणे घरी जावे. आजही विशेष धयकाल्यात सादर होणारी दशावतारी नाटके पहाटेपर्यंत चालतात, वाहतूक व्यवस्था असली तरीही...
आज दशावतारात आलिशान गाडी आली, नाटक सादर करण्यासाठी दगडधोंडे तुडवत पायी चालणारे कलावंत आलिशान गाडीत विसावले. नाटक करण्याच्या ठिकाणात असणारे अंतर, रस्ता, नाटकाची वेळ, कलावंतांना सादरीकरण करण्याअगोदर तयारीसाठी लागणारा वेळ आदी गोष्टी आजही बघितल्या जातात आणि तसे टाईम मॅनेजमेंट केले जाते.
सध्य स्थितीत काल्यात आडदशावतार हे साधारणपणे पाऊण ते एक तासापर्यंत केले जाते. त्यानंतर मुख्य कथानक सुरू होते. या लोककलेत कलावंतांमधील असणारा समन्वय हा देखील कौतुक करण्यासारखा असतो. काल्यात सगळ्या पहिल्यांदा जत्रोत्सवात पालखी सोहळ्यात वादनासाठी झांज वादक आणि मृदुंग वादक उठतो. ते ‘बिलिमारो’ म्हणजे पंचारती फिरवणाऱ्या कलावंताला उठवतात. त्यानंतर बिलिमारो हा कलावंत मुख्य नाटकात पहिली भूमिका पार पाडणाऱ्या कलावंताला उठवतो.
कधी तरी कलावंत भूमिका सादर करताना एखादा प्रवेश (कचेरी) खूप वाढतो, अशावेळी दुसरा कलावंत आपलं सादरीकरण आटोपशीर करून नाटक वेळेतच संपविण्याचा प्रयत्न करतो. केवळ संयुक्त नाट्य हे साधारणपणे साडेतीन ते सहा तास चालते. कारण यात सगळे दिग्गज कलावंत एकत्रितपणे आपले सादरीकरण करतात.
परिणामी या नाटकात स्पर्धा, शाब्दिक जुगलबंदी काही प्रमाणात जास्त असते; मात्र नेहमी नाट्यमंडळात सादर केली जाणारी नाटके शक्यतो वेळेतच टाईम मॅनेजमेंट करून सादर केली जातात. किंबहुना एखाद्या वेळेस वेळेआभावी एखादा प्रवेश प्रासंगिकता बघून काटछाट करून किंवा रद्द करून सुध्दा टाईम मॅनेजमेंट साधले जाते आणि हे कौशल्य बहुदा या लोककलेतील कलावंतांना सहज जमते. विशेष म्हणजे, ते रसिकांच्या नजरेतही येत नाही. हे कसब दशावतार लोककलेतील कलावंताकडेच दिसते.
कधी तरी सादरीकरण करायला येणाऱ्या कलावंताची सादरीकरण करण्यापूर्वीची तयारी झालेली नसते. अशाही वेळी रंगमंचावर प्रवेश सादर करणारा कलावंत आपल्या संवाद, स्वगत, गाणं आदींचा वापर करत संबंधित कलावंताची तयारी होईपर्यंत रंगमंचावरील खिंड लढवतो आणि नाट्यपुष्प पुढे नेतो.
थोडक्यात, टाईम मॅनेजमेंटवर दशावतार नाटक कमी-जास्त प्रमाणात करत त्यातील गोडवा, मनोरंजन, प्रबोधन याला धक्का न देता पध्दतशीरपणे टाईम मॅनेजमेंट साधतात.
मंडळाची गाडी कलावंताला घेऊन नाटकाच्या ठिकाणी मार्गस्थ होण्यापासून एखाद्या ठिकाणी चहापान करताना, संबंधित नाटक सादर करण्याच्या ठिकाणी सुद्धा टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचे ठरते.
सहाय्यक कलावंताकरवी सर्व कलाकारांना जेवणाच्या व्यवस्थेपासून नाट्य सुरू करण्यापर्यंत जो रंगभूमीवर कलावंत जाण्यापर्यंतचा वेळ असतो, तो दशावतारासाठी खूप महत्त्वाचा असून, यात प्रत्येक मिनिटांचे टाईम मॅनेजमेंट करून आपली कला वैविध्यपूर्ण रीतीने समाजासमोर मांडत काळासोबत गती घेणारा दशावतार लोककलावंत म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा आदर्शवत गुरूच! जीवनातील कोणत्या गोष्टीला किती आणि कसे महत्त्व द्यायचे आणि वेळेचे गणित साधताना आयुष्यची गोळाबेरीज कशी करायची, हे शिकायचे असेल तर कधी तरी नक्कीच या दशावतार लोककलावंतांना भेटा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.