Devgad देवगड हापूस अजूनही ‘बॅक फूट’वर

मुबलक मोहराची प्रतीक्षाः तूर्त २५ टक्केच मोहर
देवगड हापूस
देवगड हापूसsakal
Updated on

देवगड- निसर्गाची अपेक्षित साथ लाभत नसल्याने कोकणातील हापूस यंदा ‘बॅक फूट’वर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नव्या हंगामाच्या दृष्टीने मुबलक मोहराची अजून तरी चाहूल दिसत नसल्याने आंबा बागायतदार काहीसे हैराण दिसत आहेत. तुलनेत केवळ २५ टक्केच मोहराचे प्रमाण सध्यातरी दिसत आहे. निसर्ग साथीला येऊन नव्या पालवीतून मोठ्या प्रमाणात आंबा मोहर आल्यास शेतकऱ्यांची चिंता दूर होऊ शकते, असे मत आता बागायतदार व्यक्त करू लागले आहेत.

कोकणची आणि विशेषतः देवगड तालुक्याची अर्थव्यवस्था हापूस आंब्यावर आधारित आहे. वेळेत आंबा कलमे मोहरून उत्तम फलधारणा झाल्यास झालेला खर्च वजा जाता. बागायतदाराच्या हाती काही शिल्लक राहण्यास मदत होते; मात्र आता जानेवारी महिना उलटून जात आला तरीही आंबा कलमांना भरभरून मोहर आल्याचे सार्वत्रिक चित्र पहावयास मिळत नाही.

सतत बदलते हवामान, थंडीमधील चढउतार, ढगाळ वातावरणाचा परिणाम तसेच अन्य कीडरोग यामुळे आंबा कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावत आहे. पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून त्यातून आंबा उत्पादन घेणार्‍या काही प्रगतशील बागायतदारांचा आंबा फळबाजारात गेलाही आहे.

वाशी फळबाजारात गेलेल्या पहिल्या दोन डझन आंबा पेटीला यंदा नऊ हजाराचा भाव मिळाला. त्यानंतर काही दिवसांच्या फरकाने कुणकेश्‍वर भागातील आंबा बागायतदारांच्या आंबा पेट्या फळबाजारात पाठवल्या गेल्या.

कुणकेश्‍वर येथील अरविंद वाळके गेली सुमारे सात वर्षे पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा नोव्हेंबरच्या सुमारास फळबाजारात पाठवण्यामध्ये आघाडीवर असतात. यंदाही त्यांच्या पेट्या फळबाजारात गेल्या; मात्र नेहमीच्या तुलनेत त्याला तसा विलंबच झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे बागायतदारांना रोज नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी जोरदार थंडी पडल्याने आंबा कलमे मोहोरण्याच्या दृष्टीने आशादायी चित्र निर्माण झाले होते.

त्यामुळे आंबा बागायतदारांनी मोहोर येण्याच्या आशेने फवारणीचा सपाटा लावला होता. यासाठी काहींनी संजीवकाचाही वापर केला; मात्र आंबा कलमांना भरपूर मोहोर येण्याऐवजी पालवीचे प्रमाण वाढले. त्यातूनही पालवी टिकवून त्यातून मोहोर बाहेर येण्याच्या आशेने पुन्हा फवारणी वाढवण्यात आली; मात्र पालवी जून होऊनही त्यातून अपेक्षित मोहोराचे प्रमाण दिसत नसल्याने खर्च कमी करण्याच्या दृष्टीने बागायतदारांनी फवारणीचे नियोजन बदलले असल्याचे सांगितले जाते.

तालुक्यात काही भागात मोहराचे प्रमाण दिसत असले तरीही त्याचे प्रमाण कमीच आहे. सर्वच भागात मोहोराचे प्रमाण दिसत नसल्याने आतापर्यंत केवळ २५ टक्केच मोहर असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात फळबाजारात आंबा गेल्यास त्याला चांगला दर मिळून खर्चाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

त्यांनतर उशिराचा आंबा एकाचवेळी फळबाजारात येत असल्याने दराची होणारी घसरण बागायतदारांच्या मिळकत आणि खर्चाचे गणित कोलमडणारी ठरते. त्यामुळे आता जानेवारी उलटत आला तरीही अद्याप आंबा बागायतदारांची कळी खुललेली दिसत नाही. त्यामुळे कोकणातील हापूस यंदा ‘बॅक फूटवर’ जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसे झाल्यास बागायतदारांचे आर्थिक गणित बिघडू शकते.

दूषित हवामान आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे आंबा बागायतदार हैराण आहेत. मुबलक मोहर नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. निसर्गाने साथ दिली आणि नवीन पालवीतून मोहर आल्यास बागायतदारांची चिंता दूर होऊ शकते.

आतापर्यंत केवळ २५ टक्केच मोहर दिसत आहे. त्यामुळे हंगामाची परिस्थिती बिकट दिसत आहे.

आपण गेली सात वर्षे हंगामात आगावू आंबा फळबाजारात पाठवत असतानाही यंदा मात्र थोडा विलंब झाला आहे. मोहर येण्याची प्रक्रिया लांबत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे बागायतदारांना भरपाई मिळण्याच्या दृष्टीनेही विचार व्हावा, असे वाटते.

- अरविंद वाळके, ज्येष्ठ आंबा बागायतदार, कुणकेश्‍वर (देवगड)

हवामान बदल मारक

वारंवार बदलणारे हवामान आंबा हंगामास मारक ठरत आहे. आंबा हंगाम रडतखडत चालल्यास एकूणच आर्थिक गणित बिघडून त्याचा स्थानिक पूरक व्यवसायांवर परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे बाजारातील एकूणच आर्थिक उलाढाल मंदावून चलन मंदावते. पर्यायाने अन्य व्यवसायही आर्थिक समस्यांच्या गर्तेत सापडण्याची शक्यता निर्माण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()