'आमदार नाईक हे महायुतीच्या प्रयत्नातून झालेल्या कामांचे जाऊन भूमिपूजन करून श्रेय घेत असतील, तर त्यांना संपूर्ण जिल्ह्यात विरोध होईल.'
कुडाळ : मठ-घोडगे-पणदूर रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने काल (शुक्रवार) सायंकाळी डिगस येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना (Shiv Sena) व भाजप (BJP) कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन रोखल्याचा दावा केला; तर ठाकरे गटाने भूमिपूजन केल्याचे सांगितले.
तालुक्यातील मठ-कुडाळ-घोडगे या मार्गाचे संपूर्ण कामाच्या भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आयोजित केला होता. या वेळी येथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आमदार नाईक यांना भूमिपूजन करण्यापासून रोखले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
दोन्ही गट एकमेकांच्या आमनेसामने होते. यावेळी एकमेकांना ढकलण्यात आले. दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे झाले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने भूमिपूजन केल्याचा दावा केला. या वेळी घोषणाबाजीही झाली. शिवसेना फुकटचे श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. यापुढे आमदार नाईक हे महायुतीच्या प्रयत्नातून झालेल्या कामांचे जाऊन भूमिपूजन करून श्रेय घेत असतील, तर त्यांना संपूर्ण जिल्ह्यात विरोध होईल, असा इशारा भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी दिला.
या रस्त्याचा शासकीय कार्यारंभ व भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी नित्यानंद कांदळगावकर, अरुण सावंत, निखिल कांदळगावकर, योगेश घाडी, जयेश चिंचणकर, विलास राणे, विनोद सावंत, मनोरंजन सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी हा रस्ता कोणत्या निधीतून झाला त्याचे उत्तर द्यावे, असेही आमदार नाईक यांना विचारले.
दरम्यान, याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले, ‘या रस्त्यासाठी महविकास आघाडीची सत्ता असताना अर्थसंकल्पात तरतूद केली होती. दरम्यानच्या कालावधीत स्टे आल्याने हे काम झाले नाही. या रस्त्याचे श्रेय हे महाविकास आघाडीचेच असल्याने आम्ही आज भुमिपूजन केले.’ यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन बोभाटे, गोट्या चव्हाण, बंड्या कोरगावकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.