तिलारीत कीटकभक्षी वनस्पती;डॉ. एस. आर. यादव यांच्या शोधकार्याला यश

तिलारी बायो नॅचरल फार्ममधील बांधावर दुर्मिळ प्रजातीतील कीटकभक्षी वनस्पती ‘ड्रॉसेरा बर्मानी’ आढळली.
Drosera burmannii plant in Tilari  Dr S R Yadav research
Drosera burmannii plant in Tilari Dr S R Yadav researchsakal
Updated on

दोडामार्ग : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांना तिलारी परिसरातील तिलारी बायो नॅचरल फार्ममधील बांधावर दुर्मिळ प्रजातीतील कीटकभक्षी वनस्पती ‘ड्रॉसेरा बर्मानी’ आढळली.

डॉ. यादव यांनी जवळजवळ ६० हून अधिक वनस्पतींच्या नवीन प्रजातींची विज्ञानात भर घातली आहे. डॉ. यादव प्रकल्प अध्ययनातून विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शनासाठी देशातील विविध भागांत वर्षभर अभ्यास दौरे करतात. अशाच अभ्यास दौऱ्यासाठी तिलारी परिसरातील तिलारी बायोनॅचरल फार्म या ठिकाणी जैवविविधता संरक्षण, संगोपन आणि संशोधनासाठी आले होते. त्यांची संशोधनात्मक व चिकित्सक वृत्ती असल्याने परिसरात अस्तित्वात असलेल्या पाणथळ जागांच्या वनस्पतींची त्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा बर्मानी आढळली.

परिसरातील ऑर्किडच्या विविध प्रजातींचा शोध घेताना कॉटोनिआ पेंडीक्युलारीस म्हणजे भ्रमरी या वैशिष्ट्यपूर्ण ऑर्किड प्रजातीचे अस्तित्व असल्याचे निश्चित केले व त्याविषयी मार्गदर्शनही केले.वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या सहाय्याने तयार करतात; परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि ते अन्न काही वनस्पतींना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशा कीटकभक्षक वनस्पतींच्या सुमारे ६२५ जाती असून, त्यांपैकी ३०-३५ जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त पाच-सहा जातींच्या वनस्पती आढळतात. या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असेही म्हणतात. या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्‍या असतात; परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. ज्या ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो, तेथे त्या वनस्पतींची विशिष्ट प्रकारे वाढ होते.

महाराष्ट्रात सापडणाऱ्‍या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन प्रजाती उपलब्ध आहेत. ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानी. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर आदी भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते.

निसर्ग अद्‌भूत आणि विस्मयकारक गोष्टींनी भरलेला आहे. अशाच एका विस्मयकारक गोष्टीचा साक्षीदार होण्याची संधी आपल्याला प्रा. यादव यांच्यामुळे मिळाली.

- संजय नाटेकर, निसर्ग अभ्यासक

तिलारी बायोनॅचरल फार्म, आयनोडे हा भाग निसर्ग अध्ययनासाठी उपयुक्त आहे. या भागात अभ्यासकांनी योग्य दिशेने अभ्यास केला, तर अनेक दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेत भर पडेल.

- संजय सावंत, अध्यक्ष, वनश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग

वैशिष्ट्ये

  • ड्रॉसेरा बर्मानी कीटकभक्षी वनस्पती

  • शास्त्रज्ञ जोहान्स बर्मन यांच्याकडून श्रीलंकेत १७३७ मध्ये शोध

  • त्या सन्मानार्थ त्यांचे नाव या वनस्पतीला

  • वनस्पतीची रचना फुलासारखी, पाने गुलाबी, लाल

कसे खातात कीटक?

पानांच्या कडांना बारीक केसतंतूंवर चिकट द्रवाचे बिंदू असतात. या वनस्पतीकडे आकर्षित झालेले कीटक या चिकट द्रवामुळे अडकून बसतात. अडकलेले कीटक वनस्पतीद्वारे स्रवलेल्या रसायनाद्वारे विघटित केले जातात. त्यातील पोषक तत्त्वे वनस्पती शोषून घेतात. या वनस्पतींच्या पानांच्या चमच्यासारख्या पात्यावर लाल व जाड टोकाचे केस असतात. या केसांवर चिकट द्रवाचे आवरण असते. केसाच्या टोकावर चिकट द्रवाचे बिंदू असतात. बिंदू उन्हात दवबिंदूप्रमाणे चकाकतात. म्हणून याला इंग्रजीत ‘सन ड्यू’ हे नाव पडले आहे. एखादा कीटक या वनस्पतीच्या पानावर बसला, की केस आतल्या बाजूस वळतात आणि कीटक पकडला जातो. वनस्पतीच्या ग्रंथीतील स्रावामुळे कीटकाचे अन्नद्रव्यात रूपांतर होऊन त्याचे वनस्पतींच्या पेशींकडून शोषण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.