पाली : मुसळधार पावसामुळे पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघजाई नगर येथे शुक्रवारी दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नाही. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेले पाली शहर सरसगडाच्या पायथ्याशी वसले असून जवळच लोकवस्ती आहे. त्यामुळे अतिवृष्टीत शहरावर दरडीचे सावट कायम असते.
वाघजाई नगर येथे किल्ल्यावरील मातीचा काही भाग ढासळला. याबाबत माहिती मिळताच नगरपंचायत समितीमार्फत पाहणी करण्यात आली. सरसगडाला लागूनच वाघजाई नगर, वरचा देऊळवाडा, श्रीकृष्ण नगर, बेगरआळी, उंबरवाडी,
सावंत आळी, राम आळी, मधली आळी तसेच तळई व दापोडे या आदिवासी वाडी तसेच ग. बा. वडेर हायस्कूल आणि पालीवाल महाविद्यालय आहे. त्यामुळे किल्ल्यावरून दरड कोसळल्यास मोठी हाती होण्याची शक्यता आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर सरसगडाच्या पायथ्याशी पाहणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
सरसगड किल्ल्यालगतच्या लोकवस्तीचे पाहणी केली असून काही नागरिकांना पालीतील भक्तनिवास येथे हलविण्यात येणार आहे. तेथे त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. शिवाय धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसाही बजावल्या आहेत. नागरिकांनी दक्ष व सुरक्षित राहावे.
- विद्या येरूनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत, पाली
मगरीची सुरक्षित अधिवासात सुटका
माणगाव : माणगाव कचेरी रोड येथील मंगलमूर्ती कॉम्प्लेक्ससमोर गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सात फूट लांबीची मगर रस्त्यावर फिरताना दिसली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
वनविभाग, पोलिस व कोलाड रेस्क्यू पथकाने बचावकार्य करून मगरीला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले. मगरीला पाहण्यासाठी उत्साही मंडळींनी गर्दी केली होती, तर अनेकांनी तिचे फोटो, व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल केले. रस्त्यावरून एका इमारतीत शिरलेल्या मगरीला काळ नदीत सोडले.
थरार बचावकार्य
रात्री साधारण सव्वा बाराच्या सुमारास कोलाड येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे बचाव पथक दाखल झाल्यानंतर सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्वात योग्य काळजी घेत पथकाने मगरीला पकडले आणि सुरक्षित अधिवासात सोडले.
मुसळधार पाऊस नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक वन्यजीवांचे वाताहत होऊन त्यांचा नागरी वस्तीत वावर आढळून येत आहे. अशी परिस्थितीत नागरिकांनी भयभीत न होता वन्यजीवाला कोणतीही हानी पोहोचवूनये. स्थानिक वनविभागाला त्वरित संपर्क साधावा.
- अनिरुद्ध ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, माणगाव
वन्यजीवांच्या बचावकार्यात लोकांच्या विनाकारण गर्दीमुळे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे बचाव करणाऱ्यांसाठी वन्यजीवांसोबत जमलेल्या गर्दीतील माणसांच्या सुरक्षेचाही विचार करावा लागतो. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून बचावकर्त्यांना त्यांचे काम योग्य पद्धतीने करू द्यावे.
- शंतनू कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.