शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे चर्चा करत असून त्याला यश आले असल्याचे सुत्रांकडून समजते.
दाभोळ : दापोली मतदार संघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा दापोलीत सुरू होती. मात्र याची दखल थेट मातोश्रीमध्ये घेतली गेल्याने दळवी समर्थकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला तूर्तास विराम मिळाला असल्याचे चित्र दिसत आहे.
माजी आमदार दळवी हे मुंबईत असून राष्ट्रवादीच्या दापोलीतील काही पदाधिकारी यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्यासाठी गळ घातली असली तरी दळवी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे दळवी यांचे समर्थक नाराज असून त्यांना पुन्हा शिवसेनेत सक्रिय करण्यासाठी दळवी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे चर्चा करत असून त्याला यश आले असल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश तूर्त थांबविण्यात दळवी यांना यश आले आहे. दळवी समर्थकांना शिवसेनेत पुन्हा मानाची पदे मिळावीत, अशी त्यांची मागणी असून ही मागणी मान्य झाल्यास ही मंडळी शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्यास तयार आहेत.
मागील काळात दळवी हे भाजपत जाणार अशी चर्चा होती त्यानंतर दळवी हे राष्ट्रवादीत जाणार, अशा बातम्या पसरल्या होत्या पण माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी त्याचा इन्कार केला आहे. १ डिसेंबर रोजी दळवी समर्थकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश सोहळा होणार होता; मात्र माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला नसला तरी शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर दापोली मतदार संघातील होणारी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना थोपविण्यासाठी योग्य ते आश्वासन मिळाल्याने हा प्रवेश थांबला आहे, असे समजते.
दापोली विधानसभा मतदारसंघात सुर्यकांत दळवी यांचे २५ वर्षे वर्चस्व होते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी पराभव केला. त्यानंतर काही महिने ते राजकीय विजनवासात गेले. काही महिन्यांनी शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात आणले. योगेश कदम यांनी मतदारसंघात दौरे सुरु केले, रामदास कदम यांनी विविध खात्यांचा निधी दापोली विधानसभा मतदारसंघात आणला. अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी दळवींची साथ सोडून योगेशना मिळाले.
संघटनेतील प्रभाव कमी
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा शिवसेनेचे योगेश कदम यांनी प्रभाव केल्यावर दापोली विधानसभा मतदारसंघावर योगेश कदम यांचा एकछत्री अंमल सुरू झाला. दळवी यांना मानणारे फार कमी समर्थक उरलेत. संघटनेतील त्यांचे स्थानही कमी झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.