सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोर परप्रांतीय बोटी मासेमारी करत असतानाही अधिकारी कारवाई करत नाहीत.
हर्णै : येथील बंदरासमोरील (Harnai Port) समुद्रात मासेमार करण्यासाठी परप्रांतीय एलईडी, पर्ससीन नेट व फास्टर नौकांनी धुमाकूळ घातला आहे. किमान ८ ते १० नॉटिकल मैलाच्या अंतरावरच अवैध मासेमारी सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कमी खोलीत येऊन मासेमारी केली तर छोट्या मासेमारांनी उपाशी मरायचं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घुसखोरीवर वेळीच नियंत्रण ठेवा, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध बंदर म्हणून दापोली तालुक्यातील हर्णै बंदराची ओळख आहे.
या बंदरात साधारणपणे आजूबाजूच्या गावातील मिळून १ हजाराच्या आसपास मासेमारी नौका मासेमारी व्यवसाय करतात. हर्णै गावात मासेमारांची मोठी वस्तीही आहे शिवाय बाजूच्या पाजपंढरी गावातील प्रत्येक घरातील लोक मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह चालवतात. समुद्राच्या काठावरील पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने मासेमारी व्यवसाय करत आले आहेत. त्या मच्छीमारांकडे ना वेगवान, ना पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या महागड्या बोटी. पारंपरिक, छोट्या बोटींच्या साहाय्याने मासेमारी करतात.
हर्णै बंदर येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात गेल्या चार दिवसापासून किनाऱ्यापासून खूपच जवळ येऊन परप्रांतीय फास्टर आणि पर्ससीन नेट नौका अवैध बेकायदेशीर मासेमारी करत आहेत. परप्रांतीय नौकांकडून अगदी एक इंच ते पार १० फुटांपर्यंत लांबीचे मासे मारले जातात. त्यामुळे हर्णै बंदराजवळील समुद्रात मासेच मिळणे बंद होईल. वातावरणातील बदलांमुळे मच्छीमार समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. आज ना उद्या व्यवसाय होईल, या आशेने येथील मच्छीमार विविध वित्तीय संस्था तसेच उधार उसनवार करून तर कधी सोनंनाणं गहाण ठेवूनही मासेमारी व्यावसाय चालवत आहे.
कामगारांवर पैसा खर्च करत आहे; मात्र अनेकवेळा पदरी निराशाच पडते. किनाऱ्याजवळच राजरोसपणे मासेमारी होत राहिली तर भविष्यात अडचण होईल. समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणारी शासनयंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने मच्छीमार बांधव आर्थिक संकटात सापडत आहे. मासळी नाही मिळाली तर धंद्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे? अशी चिंता आहे. त्यामुळेच येथील पारंपरिक मच्छीमार हवालदिल झाला आहे.
सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोर परप्रांतीय बोटी मासेमारी करत असतानाही अधिकारी कारवाई करत नाहीत. त्यामुळे मच्छीमारांना व्यवसाय टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असा इशारा दापोली-मंडणगड-गुहागर मच्छीमार संघर्ष कमिटी कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी दिला. तर पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका मासेमारीसाठी किनाऱ्याजवळ येत आहेत. हे भविष्यासाठी खूपच धोकादायक आहे. आम्हा पारंपरिक मच्छीमारांवर उपाशी राहायची वेळ येईलच; परंतु भविष्यात आपल्या मुलांना चित्रात मासे दाखवायची वेळ येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया पाळंदे येथील मच्छीमार अभिजित भोंगले यांनी व्यक्त केली.
गेल्या चार दिवसांपासून हर्णै बंदर येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात परप्रांतीय फास्टर बोटी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटी मासेमारीची हद्द ओलांडून समुद्रकिनाऱ्यापासून ८ ते १० नॉटिकल मैल अंतराच्या आतच राजरोसपणे मासेमारी करत आहेत. या गैरप्रकाराला शासनयंत्रणा प्रतिबंध का करत नाही? अधिकारीवर्ग कोणाच्या तरी आशीर्वादाने हे सर्व करत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया मच्छीमारांमधून येत आहेत.
मत्स्य विभागाकडून गस्ती नौकेसोबत एक सुरक्षारक्षक घेऊन गस्त सुरू केली आहे. काल गुहागर परिसरात गस्त सुरू होती. आज बुरोंडीपासून हर्णै बंदर परिसरामध्ये गस्त घालायचे काम सुरू आहे. अवैध मासेमारी करताना नौका सापडली तर ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल.
-दीप्ती साळवी, मत्स्य व्यवसाय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.