गेल्या पंधरा वर्षांमध्ये राजापूर तालुक्यामध्ये दोनवेळा आढळलेला जिवंत ब्लॅक पँथर आणि लगतच्या लांजा तालुक्यामध्ये आढळलेला शेकरू हा दुर्मीळ राज्यप्राणी. पश्चिम घाटातील वनसंपदेचा वारसा लाभलेल्या आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या राजापूर-लांजा परिसराच्या जंगल परिसरामध्ये विविध दुर्मीळ प्राण्यांचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
राजापूर-लांजा येथील जंगल परिसरातील विशेषतः ब्लॅक पँथर, शेकरूच्या वास्तव्याने वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्लॅक पँथर, शेकरूच्या सुरक्षित अधिवासासाठी येथील जंगल परिसर आणि वातावरण पोषक असणार हे निश्चितच. त्यामुळे ब्लॅक पँथर, शेकरू या दुर्मीळ प्रजातीसह येथील वनसंपदेची सुरक्षितता जतन अन् संवर्धन यादृष्टीने महत्त्व वाढले आहे. वनविभागाने राजापूर-लांजाच्या जंगलराजीवर ‘स्पशेल वॉच’ ठेवला आहे.
बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी. दोघांमध्ये फरक आहे. बिबट्याच्या अंगावर पोकळ ठिपके आढळतात आणि शरीरयष्टी मांजराप्रमाणे भरीव असते. बिबट्याचे भारतीय बिबट्या, श्रीलंकी बिबट्या, आफ्रिकी बिबट्या, उत्तर चिनी बिबट्या, चिनी भारतीय बिबट्या, अरबी बिबट्या, अमूर बिबट्या, कॉफेशियाई बिबट्या अशा उपप्रजाती अस्तित्वात आहेत. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात. पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त दिसत असून त्यांना काळ्या रंगाचा अधिक फायदा होतो असे मानले जाते. या रंगबदलामुळे प्राण्याच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काही फरक न पडता ते त्यांच्या कुळातील प्राण्यांप्रमाणेच वागतात. चीन, म्यानमार, जावा, उत्तर मलेशिया, नेपाळ या देशांसह भारतात आसाम, मध्य भारत, दक्षिण भारतात काळे बिबटे आढळतात.
शेकरू ही खारींची एक प्रजाती असून महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. त्याचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मीळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीत पिलाला जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज झेप घेताना १५ ते २० फूट लांब उडी मारू शकतो. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते. भीमाशंकर, फणसाड, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगररांगात, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. शेकरूची भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जात आहे. भीमाशंकर, मध्य प्रदेश या भागात आढळणारे शेकरू आणि सह्याद्रीतील शेकरू यात थोडाफार फरक असतो.
डोंगर पायथ्याशेजारी मोठ्याप्रमाणात क्षेत्र आहे. वन्यप्राण्यांकडून ज्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते. उंदीर, रानडुक्कर, पक्षी, रानगवे, सांबर यांच्याकडूनही शेतीचे नुकसान होते. माकडेही शेती अन् बागायतीसाठी हानीकारक ठरत आहेत. बिबट्या शेतीसाठी नुकसानकारक ठरणाऱ्या अशा अनेक उभयचर प्राण्यांनाही भक्ष्य करीत असतो. यामुळे शेतीचेही अनपेक्षितपणे रक्षण होते. त्यातून, जैवविविधततेच्या साखळीत बिबट्या हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. त्यांची संख्या घटल्यास अन्नसाखळीत अडचणी येईल. त्यामुळे बिबट्याचेही संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
जैवविविधततेने नटलेल्या पश्चिम घाटासह सह्याद्रीच्या पर्वतरांगातील जंगलामध्ये वावरणारे विविध वन्यप्राणी गेल्या काही वर्षांमध्ये कोकणात दिसू लागले आहेत. त्यामध्ये दुर्मीळ ब्लॅक पँथर डिसेंबर, २०१३ मध्ये राजापुरातील ओणी येथे विहिरीमध्ये पडलेला आढळला होता. दोन महिन्यांपूर्वी कुवेशी येथे फासकीमध्ये अडकल्याची घटना घडली होती. या दोन्ही ठिकाणी वनविभागाला ब्लॅक पँथरची सुखरूपपणे सुटका करण्यात यश आले आहे. मात्र, त्यातून राजापूरमध्ये ब्लँक पँथरचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होते. दोन महिन्यांपूर्वी भांबेड येथे एका बागेमध्ये शेकरू प्राणी आढळला.
जंगलातील दाट झाडीचे पट्टे, उंच झाडे असलेला परिसर आणि कॅनोपी कनेक्टिव्हीटी असलेल्या निवासस्थानांना प्राधान्य देतात जे त्यांना भक्षकापासून संरक्षण देतात. त्याचवेळी त्यांना अन्नाचा पुरवठा करतात. जीवनसाखळीसाठी पोषक असलेला अधिवास राजापूर-लांजा परिसरातील जंगलामध्ये असल्याने याठिकाणी शेकरूचे वास्तव्य असल्याचे सांगितले जात आहे. लांजा येथे शेकरू एकटा आढळून असला तरी, सर्रासपणे शेकरू जोडीने आढळतो. त्यामुळे त्याच्या जोडीचे अन्य शेकरू त्या परिसरामध्ये असण्याची दाट शक्यता असून त्यांचा वावर अनेक वर्षांपासून असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशीच स्थिती ब्लॅक पॅंथरची आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये ब्लॅक पँथरचा प्रत्यक्षदर्शी दोनवेळा झालेला आढळ पाहता त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पर्यावरण वा वन्यजीव अभ्यासकांकडून सर्वेक्षण, संशोधन वा अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच ब्लॅक पँथर याच परिसरात का आढळतात यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच वन्यप्राण्यांचे प्रगणन (मोजदाद) झाले तर त्याचा सविस्तर अभ्यासही होईल.
शेकरू फळे खावून फळांच्या बिया जंगलातून फेकून देतात. या बिया जंगलाच्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात पसरतात. त्यामुळे नवीन झाडांची वाढ होते आणि जंगलाची जैवविविधतता टिकून राहते. फुलांचे परागण होण्यास आणि त्यातून फळधारणा होऊन जंगलांत फळांची उपलब्धता होण्यासही ते सहाय्यभूत ठरतात. शेकरूची उपस्थिती वास्तव्याच्या जंगल परिसरात मुबलक फळे आणि चांगले पर्यावरण असल्याचे दर्शविते. शेकरूचे अस्तित्व जंगलातील प्राणीसृष्टीचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.
राजापूर तालुक्यात गेल्या चार वर्षांमध्ये विहिरीत बिबट्या पडणे वा फासकीत अडकणे यामध्ये सुमारे अकरा जिवंत बिबटे सापडले आहेत. जंगलरक्षणाचा वसा हाती घेतलेल्या वनविभागाने स्वतःच्या प्रयत्नांना जनसंपर्काची साथ घेत विहिरीमध्ये पडलेले वा फासकीत अडकलेल्या या बिबट्यांची सुखरूपणे सुटका केली आहे. एवढेच नव्हे तर, सुटका केलेल्या या बिबट्यांना मुक्तपणे जगता यावे यासाठी त्यांना नैसर्गिक अधिवासामध्येही सोडले. बिबट्यांच्या संवर्धनाच्यादृष्टीने निश्चितच ही आनंददायी बाब आहे. मात्र, गेल्या चार वर्षांमध्ये विविध ठिकाणी कमी-जास्त वयाच्या तेरा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. अनेक बिबट्यांचा भूकबळी म्हणजे बरेच दिवस शिकार न मिळाल्याने मत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. भूकबळीने बिबट्यांचा होणारा मृत्यू वन्यजीवांच्या साखळीच्या संवर्धनाच्यादृष्टीने निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. त्याच्यातून, बिबट्या ज्या प्राण्यांची खाद्य म्हणून शिकार करतो त्या प्राण्यांची जंगलातील संख्या कमी झाल्याचे हे चित्र दिसत आहे.
बिबट्यांची वाढती संख्या, लोकवस्तीमध्ये त्यांचा वाढता वावर, विहिरीमध्ये पडणे वा फासकीमध्ये अडकणे यांसारख्या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे जैवविविधततेच्या साखळीतील महत्त्वपूर्ण दुवा असलेला बिबट्याचा अधिवास अडचणीत आला आहे. त्यातून, बिबट्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने काही उपाययोजना करण्याच्या हालचाली वनविभागाकडून सुरू झाल्या आहेत. मानवी लोकवस्तीमध्ये फिरत असताना अनेकवेळा भक्ष्याचा पाठलाग करताना उघड्या विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीमध्ये बिबट्या पडल्याच्या घटना सर्रासपणे घडत आहेत. त्यामुळे जंगल आणि लगतची लोकवस्ती यांच्या मध्यवर्ती भागामध्ये मात्र, लोकवस्तीतील आणि सातत्याने ज्या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे अशा भागातील विहिरींवर जाळ्या बसविण्यात येणार आहेत.
काहींना संरक्षण कठडेही उभारण्यात येणार आहेत. वाढत्या जंगलतोडीमुळे पाणवठे वा पानस्थळे नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे पाणवठे वा पानस्थळावंर येणारे विविध प्राणी भक्ष्य म्हणून बिबट्याला मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातून, साहजिकच भक्ष्यासाठी बिबट्यांचा वावर लोकवस्तीमध्ये वाढला आहे. तो कमी करण्यासाठी जंगल परिसरासह लोकवस्ती आणि जंगल परिसर अशा मध्यवर्ती भागामध्ये कृत्रिम पाणस्थळांचीही उभारणी वनविभागाकडून करण्यात येणार आहे. जंगल परिसरातील हालचालींवर दुर्बिणीच्या सहाय्याने वॉच ठेवण्यासाठी जंगलामध्ये उंच, मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी मनोरेही उभारण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन्यजीवांचे वास्तव असल्याने या वन्यजीवांसह वनसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. त्याची सर्वाधिक जबाबदारी वनविभागाची असते. मात्र, त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सोयीसुविधा वनविभागाकडे आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे. रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत बेकायदेशीररीत्या शिकार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याला चाप लावण्यासाठी रात्रीची गस्त घालणे गरजेचे आहे. त्यासाठी काही वर्षापूर्वी वनविभागाकडे दर्जेदार बॅटऱ्या उपलब्ध नव्हत्या. सद्य:स्थितीमध्ये त्या आता उपलब्ध झाल्या असल्या तरी, रात्रीच्या गस्तीसाठी आवश्यक असलेली गाडी तालुकास्तरीय वनविभागाकडे नाही. संरक्षण वनमजूरांसह अन्य कर्मचार्यांची कमतरता. पेट्रोलिंग स्कॉड नाही. एखाद्या शिकार्याने हल्ला केल्यास स्वरक्षणासाठी कर्मचाऱ्यांकडे कोणतीही सुविधा नाही. अशा स्थितीमध्ये जंगलाचा आणि वन्यजीवांचे संवंर्धन आणि संरक्षण करायचं कसं? असा प्रश्न वनविभागाला स्थानिक पातळीवर भेडसावत आहे.
सिंधुदूर्ग जिह्यामध्ये पट्टेरी वाघाचे वास्तव्य अधोरेखित झाले असून वन्यजीव संस्थान (डब्ल्यू.आय.आय.) संस्थेने कर्नाटक, गोवा आणि सिंधुदुर्ग असा वाघाचा कॉरीडॉर असलेल्या भागामध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात सुमारे ५० पट्टेरी वाघांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले होते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पट्टेरी वाघाच्या वास्तव्याची अद्यापही नोंद आढळलेली नाही. असे असले तरी, रत्नागिरी जिल्ह्याच्या विशेषतः राजापूर-लांजा-रत्नागिरी तालुक्यातील सह्याद्री घाटाच्या पायथ्यासह समुद्र किनारपट्टीनजीकचा दाट जंगलाच्या भागामध्ये पट्टेरी वाघाचे वास्तव्य असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे.
राजापूर-लांजा परिसरात ब्लॅक पँथर आणि दुर्मीळ राज्य प्राणी शेकरू आढळले आहे. दुर्मीळ वन्यप्राणी सापडत असल्याने येथील वनसंपदेची सुरक्षितता, जतन आणि संवर्धनाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे वनविभागाने विशेष लक्ष ठेवले आहे. त्यादृष्टीने वनविभाग सतर्क झाला आहे.
-गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी
जंगल परिसरात बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना वन विभागाकडून राबविल्या जात आहेत. त्या जोडीला जनप्रबोधनही केले जात आहे. जंगल परिसरातील गावांमध्ये अधिक लक्ष्य केंिद्रत केले आहे.
-जयराम बावदाने, वनपाल राजापूर
बेसुमार वृक्षतोड आणि भक्ष्याची कमतरता यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीकडील वावर वाढला आहे. मानवाला सुसह्यपणे जगण्यासाठी आणि निसर्गातील अन्नसाखळीत कायम राहण्यासाठी वनांसह वन्यजीवांचे संवर्धन काळाची गरज आहे. वन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून वन्यजीवाबाबत समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे.
-धनंजय मराठे, वन्यजीव अभ्यासक
गेल्या काही वर्षांत बिबट्याकडून जंगलात चरण्यासाठी गेलेल्या गुरांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामध्ये गोधनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. त्याची आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसते. त्यासाठी बिबट्यांना पकडून विशिष्ठ भागात सोडण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- प्रकाश शिंदे, शेतकरी
कोकणच्या पर्यावरणासह निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचेही संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. याबाबत कोणालाही दुमत नाही; पण त्याचवेळी वन्यजीवांकडून होणारे पिकांचे, फळबागांचे नुकसान आणि धोके याबाबतही गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
- मनोहर गुरव, ग्रामस्थ
विविध कारणास्तव जखमी होणाऱ्या या वन्यजीवांवर तत्काळ प्राथमिक उपचार करण्याच्या उद्देशाने राजापुरातील धोपेश्वर येथे वनविभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले ‘वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्रा’ची उभारणी करण्यात येणार आहे. सर्वसोयीसुविधांनीयुक्त या प्राथमिक उपचार केंद्रामुळे जखमी होणाऱ्या प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांवर तत्काळ प्राथमिक उपचार होणे गरजेचे असते. त्यासाठी वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. मात्र, सद्य:स्थितीमध्ये जखमी वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. या साऱ्या गोष्टी विचारात घेऊन वनविभागातर्फे वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्राची राजापुरात उभारणी केली जात असून त्याचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यालाही उपयोग होणार आहे. या प्राथमिक उपचार केंद्रातील नियोजन अन् सोयीसुविधांसह तांत्रिक बाबींच्या उभारणीसाठी सुमारे दीड कोटी रुपये निधीची आवश्यकता असून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे वनविभागाकडून पाठविण्यात आला आहे.
वन्यजीवसाखळीच्या संवर्धनासाठी काय केले पाहिजे
जंगलतोडीवर पायबंद हवेत
जंगल संवर्धन कायद्यांची कठोर अंमलबजावणी गरजेची
विविध कारणांमुळे जंगलाचा होणारा ऱ्हास रोखणे गरजेचे
सोयीसुविधांनी वनविभाग सदृढ करणे गरजेचे
वृक्षरोपणाची आवश्यकता
वन्यजीव संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी गरजेची
राजापूर २९९.८५ हेक्टर
लांजा १२७५.६७ हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.