रत्नागिरी : आठ महिन्यांपुर्वीच रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार घेतलेल्या कान्हुराज बगाटे यांच्या जागी गडचिरोली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाचा आदेश मंगळवारी (14) प्राप्त झाला आहे. कमी कालावधीत बगाटे यांची बदली झाल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले असून त्यांची बदली कुठे झाली याबाबत समजू शकलेले नाही.
राज्यातील पाच जिल्हा परिषद अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यातील डॉ. जाकर यांची रत्नागिरीत नियुक्ती केल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. सध्या वैद्यकीय कारणास्तव श्री. बघाटे रजेवर असून जिल्हा परिषदेचा कारभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपवण्यात आला होता. कोरोनाचा कालावधीत असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी नियमित अधिकारी उपस्थित असणे आवश्यक असल्यामुळे प्रभारींकडे पदभार देण्यात आला होता.
गेल्या तीन ते चार महिन्यात जिल्हा परिषदेत अधिकारी विरुध्द लोकप्रतिनिधी हा संघर्ष सुप्तावस्थेत होता.
जिल्हा परिषद कारभार सुरळीत रहावा यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही एका अधिकारी, सदस्य यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यानंतरही काही दिवसात पुन्हा कुरबुरींना सुरवात झाली होती; परंतु कोविड 19 मुळे राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करुन हा विषय जास्त काळ ताणला गेला नव्हता. बघाटे यांच्यामुळे जिल्हापरिषदेचा कारभार रूळावर येईल असे वाटत होते. त्यातच मंगळवारी शासनाने काही अधिकार्यांच्या बदल्या केल्या. त्यात कान्हुराज बगाटे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथील इंदुराणी जाकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले सात महिने कार्यरत असलेले कान्हुराज बगाटे यांची बदली झाल्याने जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर गेल्या पाच वर्षात पाच जणांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. 2015 मध्ये प्रेरणा देशभ्रतार यांच्यावर अविश्वास ठराव टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यांची बदली झाली. तो ठरावच बारगळला. त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कालावधीत योग्य पद्धतीने कारभार हाकला गेला. त्यांची बदली झाल्यानंतर 2018 मध्ये आलेल्या आंचल गोयल यांच्या विरोधातही अविश्वास ठरावाचीच रि ओढली गेली. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचीही बदली झाली. जिल्हा परिषद इतिहासातील तिसरा ठरावही बारगळला. त्यांच्या जागी डिसेंबर 2019 मध्ये कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती झाली; मात्र तेही स्थिरावलेले नाहीत. त्यांची सात महिन्यांनी बदली झाली असून पाचवा सीईओ नियुक्त झाला आहे.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.