Amar Khamkar : शेतकर्‍यांसाठी खुशखबर...! जादा उत्पन्न देणारी काजूची नवी जात शेतकर्‍याने केली विकसित

लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी गेली सुमारे आठ वर्ष अभ्यास अन् संशोधन करून जादा उत्पादन क्षमता असलेली काजूची नवी जात विकसित केली आहे.
Amar Khamkar
Amar Khamkarsakal
Updated on

राजापूर - पर्यावरणातील बदलावांमुळे काजूचे उत्पादन घटत असले तरी, प्रामुख्याने फुलोर्‍याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याच्या कमी प्रमाणाचा फटका काजूचे उत्पादन आणि उत्पन्नाला घटण्याला बसत आहे. अशा स्थितीमध्ये लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी गेली सुमारे आठ वर्ष अभ्यास अन् संशोधन करून जादा उत्पादन क्षमता असलेली काजूची नवी जात विकसित केली आहे.

नव्या संशोधित जातीच्या रोपांच्या फुलोर्‍यामध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त असल्याने फुलोर्‍याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण अधिक असून साहजिकच त्यातून काजूचे भरघोस उत्पादन अन् शेतकर्‍याला जादा उत्पन्न मिळणार आहे.

काजूच्या नव्या संशोधित जातीला ‘एकेआर’ हे नाव देण्यात येणार असून या नव्या काजूच्या जातीला शासन, कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची श्री. खामकर यांनी माहिती दिली. दरम्यान, या नव्या जातीच्या काजूच्या रोपांना शेतकर्‍यांकडून चांगलीच पसंती मिळत असून शंभरहून अधिक रोपांची रूजवात केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कृषी विद्यापीठाने संशोधन करून विकसित केलेल्या वेंगुर्ला-4 आणि वेंगुर्ला-7 या जातीच्या झाडांची जास्त लागवड होत आहे. काजू हंगाम वा त्यापूर्वी पर्यावरणामध्ये सातत्याने होणार्‍या बदलावाचा काजूच्या उत्पादन अन् उत्पन्नावरही प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यातून, काजू उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरता मेटाकुटीस आला आहे.

त्यामुळे श्री. खामकर यांनी विकसित केलेली काजूची नवी संशोधित जात शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. नव्या विकसित केलेल्या काजूला मुबलक प्रमाणात येणार्‍या फुलोर्‍यामध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त आहे.

त्यामुळे अन्य जातीच्या काजूच्या रोपांच्या तुलनेमध्ये या संशोधित जातीमध्ये फळधारणेचे प्रमाण जास्त राहणार आहे. खते वा औषध फवारणीच्या खर्चामध्येही तुलनात्मकदृष्ट्या घट होणार आहे. साहजिकच परिणामी काजूच्या जादा उत्पादनासोबत शेतकर्‍यालाही जादा उत्पन्न मिळणार असल्याचा विश्‍वास श्री. खामकर यांनी व्यक्त केला आहे.

'वेगुर्ला-4 वा वेगुर्ला-7 या जातीच्या काजूच्या झाडांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गेली सात-आठ वर्ष संशोधन आणि अभ्यास करून काजूची नवी जात विकसित करण्यात आपणाला यश आले आहे. अन्य जातीच्या काजूच्या झाडांपेक्षा संशोधित केलेली नवी जात कमी श्रम आणि खर्चामध्ये शेतकर्‍यांना जादा उत्पन्न मिळवून देणारी आहे. या जातीच्या रोपांचे आयुर्मानही तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे.'

- अमर खामकर, शेतकरी

काजूच्या नवीन जातीची वैशिष्ट्ये

  • चौथ्या वर्षापासून उत्पन्नाला सुरुवात

  • दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या कलमाची 20 ते 50 किलोपर्यंत उत्पन्न देण्याची क्षमता

  • कलमांना खोडक्याचे आणि बुरशीचे प्रमाण कमी

  • झाडाचे आयुष्य सरासरी 40 ते 50 वर्ष

  • एकरी 70 झाडे बसू शकतात

  • पिकलेल्या बोंडापासून काजू वेगळा करणे सहज सोपे

  • मधमाशांचा वापर करून मधाचे अन् काजूचे भरघोस उत्पन्न घेणे शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com