वेंगुर्ले : कोरोना संसर्गातही वेंगुर्लेवासियांसाठी एक गुड न्यूज आहे. एके काळी सिंधुदुर्गाची लाईफलाईन असलेले येथील सेंट लुक्स हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ओपीडी व आयसीयू सुरू करण्यासाठी कर्मचारी व डॉक्टर नेमण्याच्या सूचना संस्थेकडून देण्यात आल्या आहेत.
याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल सुरू केल्यानंतर त्यात महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि अन्य वैद्यकीय मदत योजना सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा फायदा तालुक्यासह परिसरातील सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण भागातील जनतेला होणार आहे.
सेंट लुक्स हॉस्पिटल सुरू व्हावे, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. माजी नगराध्यक्ष व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, व्यापारी महासंघ, कृती समिती यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत होते. त्यानुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी हॉस्पिटल त्वरित सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सामंत वेंगुर्लेत ठाण मांडून आहेत. सिंधुदुर्गातील जनतेला कोरोनाच्या या संकटसमयी आवश्यक त्या सर्व जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा प्रशासनाला कामाला लावले आहे. दरम्यान, सामंत यांनी सेंट लुक्स हॉस्पिटल त्वरित सुरू व्हावे, म्हणून हॉस्पिटलच्या कोल्हापूर व मुंबईतील व्यवस्थापनासोबत पंधरा दिवसांपूर्वी चर्चा केली होती. यावेळी हॉस्पिटल त्वरित सुरू केले नाही तर हॉस्पिटल आणि हॉस्पिटलची जागा महाराष्ट्र शासन ताब्यात घेईल, असा इशारा त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेला दिला होता. त्या वेळी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सेंट लुक्स हॉस्पिटल त्वरित सुरू करतो, असे आश्वासन दिले. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनानुसार आता त्यांनी सेंट लुक्स हॉस्पिटलच्या इमारतीची दुरुस्ती, रंगकाम सुरू केले आहे. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाई सुरू केली आहे. व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर ओपीडी आणि आयसीयू सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे यांनी दिली आहे.
तालुक्याचे भूषण
1912 पासून तालुकाच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांना सेवा देणारे आणि तालुक्याचे भूषण असलेले सेंट लुक्स हॉस्पिटल एकमेव होते. गोव्यातही त्या काळी असे अद्ययावत हॉस्पिटल नव्हते. हॉस्पिटलमधील डॉ. गोहिन दाम्पत्याने अल्पावधीतच उत्तम सेवा देऊन लोकांचा विश्वास संपादन केल्याने दूरदूरचे रुग्ण येथे येत असत. प्लेग साथीत या हॉस्पिटलने फार मोठी कामगिरी बजावली होती. 2009 मध्ये व्यवस्थापनाने या हॉस्पिटलसाठी डॉक्टर दास यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात ओपीडी, मॅटर्निटी वॉर्ड, जनरल वॉर्ड, आयसीयू युनिट, शस्त्रक्रियेसोबत नर्सिंग कॉलेजसारख्या सुविधा सुरू केल्या. अमेरिकेतून डॉ. सिटन यांनी वस्तूंच्या रूपात मोठ्या देणग्या दिल्या; मात्र हॉस्पिटल 2011 पासून बंद आहे. कोरोना राष्ट्रीय आपत्ती काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाने अधिग्रहित करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.