कुडाळ : कणकवली (Kankavli) येथील संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात भाजपचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उफ गोट्या सावंत (Gotya Sawant) यांचा संबंध नसेल तर त्यांनी जिल्हा कोर्टात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज का दाखल केला? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे (Sindhudurg District Bank) विद्यमान अध्यक्ष तथा महाविकास आघाडीच्या सहकार समृध्दी पॅनलचे प्रमुख सतिश सावंत यांनी उपस्थित करत याचे उत्तर नारायण राणे (Narayan Rane) यांनी द्यावे असे आवाहन केले आहे.
संतोष परब यांच्यावर हल्ला करून सतिश सावंत यांच्या सोबत राहिलात तर अशाच पध्दतीने मारहाण होईल हा मेसेज देण्यासाठीच हा हल्ला केला असल्याचा आरोप यावेळी सावंत यांनी केला. राणे यांना स्वतःची कर्जे निर्लेखित करण्यासाठीच जिल्हा बँक ताब्यात हवी असल्याचेही आरोप त्यानी पत्रकार परिषदेत केला.
कुडाळ येथील अनंत मुक्ताई हॉल येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुनिल भोगटे, महाविकास आघाडीचे उमेदवार विद्याप्रसाद बांदेकर, अतुल बंगे, विकास कुडाळकर आदि उपस्थित होते.
यावेळी सावंत म्हणाले, “संपुर्ण राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुका झाल्या ; पण त्या निवडणुका कधी संपल्या हे राज्याच्या जनतेला माहित नाही. सिंधुदुर्गतील या निवडणुकीत ज्यांनी सत्तेतुन पैसा आणि पैशातुन सत्ता हे राजकारण केलं अशांनी या निवडणुकीत दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू केला. कणकवली येथील माझे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर खासदार विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्या वादातुन हा हल्ला झाला असे आरोप नितेश राणे यांनी केले. हल्ल्याच्या तासाभरानंतर या हल्ल्यातील सुत्रधार आमदार राणे आणि गोट्या सावंत आहेत अशी प्रतिक्रिया संतोष परब यांच्या जबावातुन पुढे आली. जिल्हा बँक राणेंच्या नेतृत्वाखाली होती असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली सांगत आहेत. ही बँक राणेंच्या नेतृत्वाखाली होती तर गेल्या साडेसहा वर्षात जिल्हा बँक अध्यक्ष आणि संचालक मंडळाने कोणकोणते भ्रष्ट्राचार केले? हे जाहिर करावेत.”
ते म्हणाले, “२०१४ मध्ये राणे काँग्रेसमध्ये असतेवेळी त्यांनी १३ बोलेरो गाड्या घेतल्या, त्यापैकी ४ बोलेरोंचे पैसे स्वतः मी दिगंबर पाटील, प्रकाश मोर्ये व प्रज्ञा परब यांनी भरले; मात्र त्या चार गाड्या गेली सहा वर्ष राणे कुटूंबियांच्या ताब्यात वापरल्या जात आहेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते अण्णा केसरकर यांच्या नावावर सुध्दा एक बोलेरो गाडी आहे. त्या गाडीची थकबाकी १६ लाख ४१ हजार ६९० एवढी आहे. आज अण्णा केसरकर ७८ व्या वर्षी दुखःश्रु ढाळत आहेत.
ते राणे यांच्या बंगल्यावर गेले त्या ठिकाणी राणे म्हणाले की, ‘तुम्ही राजन तेलींना भेटा’, तेली सांगतात की ‘या प्रश्नी माझा काहीही संबंध नाही.’ ही टोलवा टोलवी ७८ वर्षाच्या जेष्ठ नागरीकाबाबत चाललेली आहे. आज पॅनलचे प्रमुख म्हणुन निवडणुक लढवत असतेवेळी ६ लोकांचे पैसे त्यांनी भरावेत आणि बँकेसाठी मते मागावीत.
या सहा लोकांमध्ये चंद्रकांत गावडे - १६ लाख ६१ हजार, वसंत केसरकर १६ लाख ४१ हजार ६९०, प्रकाश राणे १६ लाख ९६ हजार, (कै.) भालचंद्र कोळंबकर १६ लाख ६७ हजार, संदेश उर्फ गोट्या सावंत १८ लाख ५७ हजार रूपये अशी या सहा लोकांची २२ डिसेंबर २०२१ पर्यंत थकबाकी शिल्लक आहे. या थकबाकी प्रकरणी बँकेतुन १०१ची कारवाई झालेली आहे. जिल्ह्यातील ५ हजार ५०० शेतकर्यांचे २ कोटी ७७ लाख रूपये (व्याज सोडुन) देणे आहे. मेडिकल कॉलेजसाठी जिल्हा बँकेने नार्बाडच्या सर्व अटी शर्ती पुर्ण करून कर्ज दिले. त्यामध्ये सुध्दा १५ कोटी ३७ लाख थकीत आहेत. हे पैसे राणेंनी भरावेत आणि मगच भ्रष्ट्राचाराचे आरोप करावेत.”
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.