महाड : महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) पथकाचा कायमस्वरूपी बेस कॅम्प जिल्ह्यात असण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार आता रायगड जिल्ह्यासाठी महाड येथे एनडीआरएफ पथक कार्यरत ठेवण्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. आता पुढील प्रस्ताव दिल्ली येथे पाठवण्यात आला आहे.
चक्रीवादळ, दरड व पूल कोसळणे, पूर, अपघात अशा आपत्तींचा रायगड जिल्ह्याला इतिहास आहे. अशा प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे काम जलदगतीने व्हावे; तसेच आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासह पालकमंत्री अदिती तटकरे यांची बैठक झाली होती. या बैठकीत महाड येथे एनडीआरएफ पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसे आदेश संबंधितांना देण्यातही आले.
त्यानंतर महाड येथे कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार आता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सरकारला सविस्तर प्रस्ताव सादर केला असून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून संचालक, अभय यावलकर यांच्या सहीनिशी महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नवी दिल्ली यांना अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून महाड येथील प्रस्तावित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या केंद्रासाठी 257.46 हेक्टर आर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे.
(संपादन : उमा शिंदे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.