गुहागर : कोरी कलाशी पद्धतीने आजही विहिरीचे बांधकाम

बांधकाम खर्चीक, पण भक्कम अन् पर्यावरणपूरक
 कोरी कलाशी
कोरी कलाशी sakal
Updated on

गुहागर : सिमेंट, गूळ, चुना अशा कोणत्याही पदार्थाचा जोडकामासाठी वापर न करता ६० ते ६५ फूट खोल विहिरी बांधणारा कसबी कलाकार म्हणजे गुहागरमधील नरेश करंदेकर. या पद्धतीला कोरी कलाशी बांधकाम म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात किल्ले देखील याच पद्धतीने बांधले जात असत.

आधुनिक काळातील बांधकाम विषयाचे कोणतेही शिक्षण न घेतलेले नरेश करंदेकर यांनी ही पद्धत आत्मसात केली आहे. वरवेली लोहारवाडी रहाणाऱ्या नरेश कोरी कलाशी पद्धतीचे काम सहदेव करंदेकर यांच्याकडून शिकले. या पद्धतीमध्ये चिरा पाचरीच्या आकाराप्रमाणे तासून तोडी रचनेत बसवतात. त्यामुळे विहिरीच्या भिंतींवर दगड, मातीचा कितीही दाब आला तरी भिंतीचा चिरा आतल्या अंगाला सरकत नाही. विहिरीची भिंत कोसळत नाही. गोल विहिरीचा व्यास तळापासून वरपर्यंत सारखा ठेवण्यात कौशल्य पणाला लागते. चिऱ्याची प्रत्येक रांग एकाच व्यासात उभी राहताना त्या रांगेतील शेवटचा चिरा संपूर्ण रांगेला घट्ट (लॉक) करतो. या चिऱ्याला चावी म्हणतात. कोणत्याही रांगेची चावी एकाखाली एक येणार नाही याची काळजी घेतली जाते.

कोरी कलाशी पद्धतीच्या फायद्याविषयी नरेश करंदेकर म्हणाले की, हे पारंपरिक पद्धतीचे बांधकाम मजबूत, वर्षानुवर्ष टिकणारे असते. शेकडो वर्षांपूर्वी बनवलेले गडकिल्ले, कमानीच्या आकाराचे दगडी पूल याच पद्धतीने बनविण्यात आले. विहीरीचे बांधकाम कोरी कलाशी पद्धतीने केले तर छोटे, मोठे झरे बुजत नाहीत. त्यातील पाणी चिऱ्यांमधून पाझरुन विहिरीत साठत रहाते. याउलट अतिपावसामुळे विहीर भरली तर चिऱ्यांमधून पाझरुन विहिरीबाहेर जाणारे पाणी भूजल पातळी वाढवते. त्याचाही फायदा विहिरीला होतो. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा प्रयत्नही या पद्धतीत होतो.

नरेश करंदेकर यांचे सहकारी

वरवेलीतील राजेश करंदेकर, रमेश शिंदे, दिलीप शिगवण, आशिष चांदोरकर व रविभूषण किर्वे, साखरीआगरमधील प्रभाकर भुते, सौ. पूजा माईन व सौ. संगीता भुते आणि कोतळूकचे वसंत पानवलकर

कलाशी पद्धतीमधील बांधकाम करणारे कारागीरही कमी आहेत. हे बांधकाम सिमेंट, वाळूपेक्षा खर्चिक असते पण टिकावू असते. आपल्या पारंपरिक पद्धतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून मी या पद्धतीची विहीर बांधली.

- अमोल शेटे,वेळणेश्र्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.