बहुतांश कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना ‘कातळ शिल्पे’ असे संबोधले जाते.
मालवण : तालुक्यातील धामापूर गावच्या (Dhamapur Village) सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून, इतिहास संशोधकांना (History Researcher) संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे.
तालुक्यातील धामापूर गाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट जंगले, नारळ-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगरांच्या मधोमध वसलेला ऐतिहासिक तलाव हे या गावचे वैशिष्ट्य आहे. तलावाच्या काठावर श्री भगवती देवीचे प्राचीन देवालय आहे.
अलीकडेच धामापूर तलावाला ''वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट''चा दर्जा देऊन महाराष्ट्राचा जागतिक सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि प्राचीन पार्श्वभूमीवर असलेल्या धामापूरमध्ये कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरिझमसाठी नवे द्वार खुले होणार आहे.
धामापूर, मोगरणे आणि साळेल या तिन्ही गावांच्या लांबलचक सड्यावर ही कातळशिल्पे (Historical Sculpture) दिसून आली आहेत. धामापूर गावच्या गोड्याचीवाडीच्या हद्दीत ही कातळशिल्पे आढळून आली आहेत. कातळशिल्पे दोन-चार ठिकाणी आहेत, याबाबत आम्हाला कल्पना आहे; मात्र त्याबद्दल सविस्तर माहिती नाही, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
धामापूर तलाव आणि कातळशिल्पांचा प्राचीन ठेवा पर्यटनदृष्ट्या पर्वणी ठरणारा असून, कातळशिल्पाच्या चित्रकृतीचा उलगडा होणे आवश्यक आहे. साळेल गावचे ग्रामस्थ परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे हे धामापूर सडा परिसरात ''अळंबी'' काढण्यासाठी फिरत असताना त्यांना ही कातळशिल्पे निदर्शनास पडली. त्यांनी सिद्धेश आचरेकर यांना याबाबत माहिती दिली.
आचरेकर यांनी धामापूर सड्यावर परेश गावडे यांच्या समवेत जाऊन कातळशिल्पांची पाहणी केली. या ठिकाणी असलेली ख्रिस्ती धर्मातील ''क्रॉस''च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास येण्यासाठी आचरेकर, गावडे, अनिकेत पाटील (डोंबिवली) यांनी त्या चित्रकृतीच्या बाजूने गोलाकार दगड ठेवले. बाजूलाच गोलाकार स्थितीत कातळशिल्प कोरलेले आहे. त्याच ठिकाणाहून ५०० मीटरवर आणखी एक भव्य कातळशिल्प कोरलेले आहे.
साळेल गावातील युवकांनी ही कातळशिल्पे उजेडात आणली. कातळशिल्पांच्या सभोवताली युवकांनी साफसफाईदेखील केली आहे; मात्र पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत उगवत आहे. कातळशिल्पे आढळून आलेल्या परिसरात चिरेखाणी असल्याने ती नष्ट होऊ शकतात. त्यामुळे हा अमूल्य ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
कातळशिल्पांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साळेल, मोगरणे गावातून रस्ता आहे. बहुतांश कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना ‘कातळ शिल्पे’ असे संबोधले जाते. तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशाप्रकारची कातळशिल्पे सापडू शकतात; मात्र अशा शिल्पांबाबत ग्रामस्थांमध्ये तेवढी जागरुकता व माहिती दिसून येत नाही. अशा शिल्पांचा शोध घेणे गरजेचे असून, इतिहास संशोधकांची यामध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.