कोकणात डोंगर का खचतात? सह्याद्री रांगांमधील जगणं बनतय भीतीदायक

कोकणचे सौंदर्य आता कोकणवासीयांसाठी शापीत बनतय की काय?
कोकणात डोंगर का खचतात? सह्याद्री रांगांमधील जगणं बनतय भीतीदायक
Updated on

कधी कोकणात (konkan) पर्यटनाला आला तर दिसणाऱ्या, अथवा फोटो, पुस्तकातून कायमच दिसणाऱ्या कोकणी माणसाच्या तर सतत नजरेत असणाऱ्या हिरव्यागार उंचच उंच आणि लांबसडक डोंगररांगा नेहमीच सुखावणाऱ्या भासल्या असतील; पण हेच सौंदर्य आता कोकणवासीयांसाठी शापीत बनतय की काय? असा प्रश्‍न उपस्थित झालाय. कोकणात अनेक गावांत हे डोंगर अचानक काळपुरूषसारखे वाटू लागले आहेत. होय हे खर आहे...आतापर्यंत अनेकांचे पोशिंदे असलेले हे डोंगर कोकणातल्या वाड्या, वस्त्यांच्या, कोकणी माणसाच्या जीवावर बेतायला बघत आहेत. पोसरे खुर्द (रत्नागिरी) (Posare Khurd) सिंधुदुर्गातील (Sindhudurg,Digavale, Galel, Kalne) दिगवळे, गाळेल आणि आता कळणेत झालेल्या दुर्घटना या निसर्गाने दाखवलेली केवळ झलक आहे; पण हे अचानक घडलेलं नाही. हे डोंगर का जीवावर बेतताहेत याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता गावा गावातल्या निसर्गाला झालेल्या भळभळत्या जखमा समोर आल्या. त्याच मांडण्याचा हा प्रयत्न...

Summary

एकाबाजूला सह्याद्रीचे उंचचउंच कडे आणि दुसरीकडे अरबी समुद्र आणि त्याच्या मधल्या चिंचोळी पट्टीत वसलेले कोकण पिढ्यान पिढ्या निसर्गाशी एकरूप होवून जगण्याचे धडे गिरवत आले आहे.

आपत्तीची संकटे

कोकण खरतर वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे निसर्गसंपन्न आहे. एकाबाजूला सह्याद्रीचे उंचचउंच कडे आणि दुसरीकडे अरबी समुद्र आणि त्याच्या मधल्या चिंचोळी पट्टीत वसलेले कोकण पिढ्यान पिढ्या निसर्गाशी एकरूप होवून जगण्याचे धडे गिरवत आले आहे; मात्र येथे निसर्गाला दगाफटका करण्याचे प्रयत्न झाल्यानंतर त्याचा कोपही दिसू लागला आहे. सह्याद्रीचे कडे दरडीच्या रूपाने वस्तीकडे सरकण्याचे संकेत मिळू लागल्यानंतर ही धोक्याची छाया किती गडद आहे याची कल्पना येवू लागली आहे. डोंगर कोसळला तर काय होवू शकते याचा सगळ्यात जास्त गंभीर नमुना माळीण या पुणे जिल्ह्यातील गावात २३ जून २०१४ ला दिसला. वरचा अख्खा डोंगर कोसळला. यात अख्खे गाव डोंगराखाली गाडले गेले; मात्र कोकणात या आधीच अशा संकटाची चाहूल लागली होती.

२००० मध्ये काळसे (ता. मालवण) येथे डोंगरातली दरड कोसळून अख्खे कुटुंब घरासह त्याखाली गाडले गेले. चार वर्षांत अख्ख्या कोकणात अशा घटनांच्या मालिकाच सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत पोसरे खुर्द, दिगवळे, गाळेल आणि कालपरवा कळणे मायनींग येथे अशाच दुर्घटना घडल्या. शिरशिंगे, असनिये यासह सह्याद्री रांगांमधील अनेक डोंगर भीतीदायक स्थितीत कसेबसे उभे आहेत. पुढच्या काळात वातावरणातील बदलामुळे पाऊस कोसळण्याच्या प्रमाणात वाढ होवू शकते. त्यामुळे प्रत्येक गावातील डोंगर काळ म्हणून आपली छाया गडद करण्याची भीती आहे. हा प्रश्‍न समजून घेण्यासाठी आधी कोकणची भौगोलिक रचना लक्षात घ्यायला हवी.

कोकणची निर्मिती

कोकणची भौगोलिक रचना पाहिली तर याची निर्मिती प्रस्तर भंगातून झाल्याचे लक्षात येते. कोट्यवधी वर्षांपूर्वी द्विपकल्पाच्या पश्‍चिमेस भेदीय उद्रेक होवून लाव्हारस आसपासच्या प्रदेशात पसरला. यावर वारंवार क्रिया होवून थरावर थर साचत गेले. याला डेक्कन ट्रॅप किंवा दख्खन लाव्हा, असे म्हटले जाते. लाव्हा थंड होवून याचे रूपांतर बेसॉल्ट खडकात (काळा पाषाण) झाले. ४० पेक्षा जास्त थराच्या कठिण बेसॉल्ट खडकाची निर्मिती होवून याचे लांबलचक पठार तयार झाले. आंबोलीत ४० पेक्षा जास्त थरांची मोजदाज करता येते. यानंतर पठाराच्या पश्‍चिमेकडील भाग अनेक ठिकाणी प्रस्तर भंग होवून खचला. हा खचलेला खालचा भाग म्हणजे कोकण. कड्यांसारखा वर राहिलेला भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगा.

भूगर्भिय रचना

डोंगर आताच का खचायला लागले, हे समजून घ्यायला येथील भूगर्भिय रचना पहावी लागेल. एखाद्या इमारतीला जसा मजबूत पाया असतो तसा कोकणच्या भूगर्भ रचनेत खालच्या बाजूला बेसॉल्ट अर्थात काळ्या दगडाचा पाया आहे. शेकडो वर्षे रासायनिक विदारण होवून या खडकापासून जांभी मृदा आणि जांभा खडक बनला आहे. या बेसॉल्टच्या वर जांभा दगड आणि त्यावर जांभी मृदा म्हणजे माती आहे. असे असले तरी खालचा बेसॉल्ट खडक जिवॉलॉजीकल फॉल्ट अर्थात मध्येमध्ये भेगाळलेला जोड किंवा संधी असलेला आहे. त्यामुळे ही भौगोलिक रचना तशी संवेदनशील म्हणावी लागेल.

डोंगर कसे खचतात

खाली असलेला बेसॉल्ट खडकाचा पाया कमकूवत झाला किंवा हलला तर वरचा डोंगराचा डोलारा कोसळू लागतो. कोकणातील जांभी मृदा पाणी साठवणुकीच्या बाबतीत खूप कमी क्षमता असलेली आहे. हे पाणी मोठ्या प्रमाणात खाली मातीत घूसून बेसॉल्ट खडकाच्या भेगांवर आघात करते. यामुळे खडक तुटतो. त्याच्या भेगा रूंदावतात. मग जमिनीच्या आतील हा खडक उताराकडे सरकू लागतो. त्याच्याबरोबरच माती खाली यायला सुरूवात होते. यातूनच दरडी कोसळतात.

पूर्वीची रचना

कोकण तर कोट्यवधी वर्षांपासून आहे. मग आताच दरडी का कोसळायला लागल्या हा प्रश्‍न आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन निट होणे अवश्यक असते. याचे उत्तर कोकणच्या पारंपरिक लोकजीवनात आहे. पूर्वी शेती, बागायती यासह पूर्ण लोकजीवन निसर्गाची काळजी घेत जगले जायचे. यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत असे. डोंगरावर असलेल्या घनदाट जंगलामुळे डोंगर उतारावर फारशी धुप नव्हती. अगदी सहजगत्या पाणी नद्यांवाटे समुद्राला जावून मिळत. यात मानवी हस्तक्षेप झाल्यानंतर निसर्गाचा कोप सुरू झाला. याची कारणेही तितकीच गंभीर आहेत.

पुढचा काळ कठिण

माळीण दुर्घटनेनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी ई रविंद्रन यांनी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवकांमार्फत सर्व्हे करून अशी धोकादायक ठिकाणे आहेत का याची माहिती मागविली; मात्र अवघ्या काही दिवसांत ओढून काढलेल्या त्या अहवालात जिल्ह्यात एकही संवेदनशील गाव नसल्याचा शिक्का मारण्यात आला. प्रत्यक्षात त्यानंतर अनेक गावात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. आता तर कित्येक गावातून डोंगरातून आवाज येत असल्याचे, भेगा पडल्याचे प्रकार पुढे येत आहेत. यामुळे येत्या काही वर्षात सह्याद्री रांगांमध्ये बहुसंख्य गाव ‘डेंजर झोन’मध्ये येण्याची भीती आहे. असे झाल्यास कोकणातील खूप मोठी लोकसंख्या पावसाळ्यात भीतीच्या छायेखाली राहणार आहे.

पावसाचे तडाखे

कोकणात पूर्वी सलग १५-२० दिवस पाऊस पडला तरी फारसा धोका उद्भवत नसे. आता मात्र चार-आठ दिवसांच्या पावसानेही आपत्ती ओढवत आहे. निसर्गात वाढलेला मानवी हस्तक्षेप हे याचे कारण आहे. पुढच्या काळात पाऊस आणखी मोठ्या प्रमाणात आणि अनियंत्रीत पद्धतीने वाढण्याची भीती आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत आहे. साहजीकच बाष्पीभवन वाढून पाऊसही वाढणार आहे. अशावेळी दरडी कोसळण्याची भीती आणखी वाढणार आहे. याचा विचार आताच करावा लागणार आहे. बरीचशी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. असे असले तरी सुधारण्याची वेळ निघून गेली नाही.

का सरकताहेत डोंगर?

* सह्याद्री रांगांमध्ये प्रचंड वृक्षतोड झाली. मातीची धुप थोपवणारे वृक्षांच्या मुळांचे जाळे राहिले नसल्याने डोंगरांची मोठ्या प्रमाणात धुप.

* वृक्षतोड करून काजू, अननस, रबर आदी तुलनेत कमकूवत मुळांची रचना असलेल्या झाडांच्या बागायती डोंगर रांगांवर, त्याचाही फटका.

* पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नैसर्गिक मार्ग बंद. यामुळे पाणी व्यवस्थापन बिघडून जमिनीची धूप.

* गाळ नद्यांमध्ये साठून प्रवाह बदलले. यामुळे महापुरासारख्या आपत्ती वाढल्या.

* जलरेषांचा अभ्यास न करता विकासाचे अशास्त्रीय केलेले नियोजन.

* अनेक भागात चुकीच्या पद्धतीने डोंगर कापल्याने नैसर्गिक समतोल बिघडला.

* भूगर्भ अभ्यासकांचा सल्ला न घेता चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने डोंगर कमकुवत.

* अनेक ठिकाणी पाणी मुरण्याची क्षमता असलेल्या पाणथळ भूमी भर टाकून बंद केल्याने फटका.

* काही भागांत अनियंत्रीत खाण व्यवसायामुळे नैसर्गिक रचनाच डिस्टर्ब झाली.

* काही भागांत डोंगर उतारावर वस्ती, घरे उभारली. यामुळे पाणी निचरा व्यवस्थापनावर परिणाम.

दोन वर्षांतील सह्याद्रीची खदखद

* झोळंबेत डोंगर खचून बागायती उद्ध्वस्त

* असनियेतही डोंगरात दरडी कोसळल्या

* शिरशिंगेत दरडीमुळे दोन वाड्या धोक्यात

* दिगवळेत दरड पडून घर जमिनदोस्त; एका महिलेचा मृत्यू

* गाळेलमध्ये डोंगरकडा रस्त्यावर कोसळून एकाचा मृत्यू

* रत्नागिरीतील पोसरे खुर्दमध्ये खचलेला डोंगर

* कळणेत खाण क्षेत्रातील बांध फुटून कोट्यवधीची झालेली हानी.

एक नजर...

* सिंधुदुर्गात ४० टक्के पेक्षा जास्त भागात डोंगर

* ५७ कोटी वर्षांपूर्वीच्या आर्चियन किंवा वेदकालीन खडकाचा कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्लेत आढळ

* सिंधुदुर्गात सडे म्हणजे जांभ्या खडकांचे भंडारच

* महाराष्ट्रात १५ टक्के भाग दरड प्रवण

* भारतात ०.४२ दशलक्ष चौरस किलोमीटर (एकूण क्षेत्रफळाच्या १२.६ टक्के) भूस्खलन क्षेत्र

संभाव्य पाऊस असा

जिल्हा*२०३०*२०५०*२०७०

सिंधुदुर्ग*१२.८१*१०.९८*१५.४

रत्नागिरी*१५.४२*१५.२६*१८.७

रायगड*२०.१०*१९.६२*२०

ठाणे*२५.१६*२४.७*२७.३२

कोल्हापूर*१५.३०*१५.५*२२.७

(महाराष्ट्र `क्लायमेट चेंज` विभागाने पुढच्या दर २० वर्षानंतर होवू शकणाऱ्या संभाव्य पर्जन्यमान वाढीचा दिलेला हा रिपोर्ट असून त्यात सरासरी पावसात होणाऱ्या वाढीची संभाव्य टक्केवारी आहे.)

भूपृष्ठावरची माती, खडक, झाडे काढली तर भूगर्भातील दाब कमी होतो. परिणामी भूगर्भरचना बदलते, भेगा वाढतात, यातून दुर्घटना घडतात. निसर्गाद्वारे याचे संकेत आधी मिळत असतात. शिवाय जीआयएस, एनआरएसए, जीएसआय, इस्त्रो, आदींच्या मदतीने हानी कमी करता येवू शकते.

- प्रा. हसन खान, भूगर्भ अभ्यासक

भविष्यात अतिवृष्टीमुळे डोंगर कोसळून खाली येऊ शकतात. मोठी झाडे डोंगराला धरून ठेवतात. तिच तोडली तर एक एक करून सगळे डोंगर कोसळतील. कोकणचे वाळवंट करणारा विकास नको. जंगल राहील तरच डोंगर राहतील. लागवड करा; पण जंगल दुखवून नको.

- स्टॅलीन दयानंद, वनशक्ती संस्था

डोंगरांचा विध्वंस थांबवला नाही तर भविष्यात यापेक्षा मोठ्या दुर्घटना घडतील. कमी वेळेत प्रचंड पाऊस झाल्यानंतर दुर्घटना घडत आहेत. तापमान वाढल्याने समुद्र पातळीत वाढ होत आहे. सागरी तापमान वाढीने चक्रीवादळे कोकण किनारपट्टीला धडकत आहेत. डोंगरांचे, जंगलांचे संवर्धन गरजेचे आहे.

- माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ

कोकणातील लोकांची पूर्वीची पर्यावरणपूरक असलेली लाईफस्टाईल बदलली आहे. आता काजूसारख्या `कॅश क्रॉप`कडे कल वाढला आहे. यामुळे पर्यावरण राखण्यासाठी आवश्यक बरीच झाडे, वृक्ष प्राधान्यक्रमातून नाहीसे होत आहेत. याचा फटका पर्यावरणाला बसत आहे. इतरही कारणे आहेतच.

- प्रसाद गावडे, युवा पर्यावरण अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.