Oriental Dwarf Kingfisher : ज्वेल ऑफ कोकण... तिबोटी खंड्या; इंद्रधनुचे रंग लेवून Kingfisher कोकणात येऊन धडकतो!

सात रंगांची उधळण असणारे इंद्रधनुष्य डोळ्याचे पारणे फेडणारे. याच इंद्रधनुचे रंग लेवून एक पक्षी याच वेळी कोकणात येऊन धडकतो.
Oriental Dwarf Kingfisher
Oriental Dwarf Kingfisher esakal
Updated on
Summary

एकदा का पाऊस सुरू झाला की, तिबोटी खंड्याला चाहूल लागते ती प्रणयाची. मादीला आकर्षित करण्यासाठी त्याची नृत्य वजा कोर्टशिप पाहण्याजोगी. तसेच मादीला रिझवण्यासाठी खाद्य भेट हे एक वैशिष्ट्य.!

-प्रतीक मोरे, देवरूख moreprateik@gmail.com

मे महिन्याचा उष्मा टोकाला पोचलेला, अंगाची लाहीलाही होईल, असे वातावरण, झाडांची पाने पण हालायची बंद. अशा वेळेला कुठून तरी जोरदार वारा सुटतो, विजेचा एखादा लोळ आकाशातून जमिनीवर कोसळतो. वाऱ्याने वाहून आणलेले ढग आसमंत अंधारमय करून टाकतात आणि पावसाच्या शीतल सरी जमिनीवर कोसळतात. दरवर्षी कोकणात (Konkan Monsoon) मान्सूनपूर्व सरी अशा प्रकारचे नाट्य निर्माण करत असतात आणि या नाट्याचा क्लायमॅक्स म्हणजे इंद्रधनू.

सात रंगांची उधळण असणारे इंद्रधनुष्य डोळ्याचे पारणे फेडणारे. याच इंद्रधनुचे रंग लेवून एक पक्षी याच वेळी कोकणात येऊन धडकतो. माणसाच्या दृश्य पटलातील जवळजवळ सगळेच रंग ल्यालेला, ठेंगणा, सुबक, भली मोठी चोच, बाणाच्या वेगाने उडणारा, आणि समोर बसला तर सप्तरंगांची उधळण पेश करणारा हा पक्षी म्हणजे तिबोटी खंड्या अर्थात Oriental Dwarf Kingfisher (ODKF).

Oriental Dwarf Kingfisher
Konkan Port : 'कोकणातल्या कोणत्याच बंदरात बोट लागावी अशी बंदरेच उरली नाहीत'

ODKF हा किंगफिशर म्हणजेच धीवर वर्गातला पक्षी. कोकणात आढळणाऱ्या किंगफिशर पैकी सर्वांत लहान किंबहुना बटूरूपी पक्षी. पावसाच्या आगमनाबरोबर कोकणातल्या नद्या, नाले, छोटे ओहोळ, बांध इथे आढळतो. तसा हा पक्षी पश्चिम घाटाचा रहिवासी असला तरी लोकल मायग्रेशन करत असल्याचे आढळून आले आहे. दाट सावलीची जंगले, नाले आणि सदाहरित वने ही याच्या आवडीची. कोकणामध्ये हा विणीच्या हंगामात स्थलांतर करत असल्याने जून ते सप्टेंबरमध्ये सहज दिसतो.

एकदा का पाऊस सुरू झाला की, तिबोटी खंड्याला चाहूल लागते ती प्रणयाची. मादीला आकर्षित करण्यासाठी त्याची नृत्य वजा कोर्टशिप पाहण्याजोगी. तसेच मादीला रिझवण्यासाठी खाद्य भेट हे एक वैशिष्टय. या भेटीत छोटे सरडे, कोळी, खेकडे, चोपई असे नानाविध प्रकार सामाविष्ट असतात. यानंतर मग मिलन होऊन नर मादी दोघे पण घरटे बांधायची सुरुवात करतात. सगळेच किंगफिशर हे जमिनीमध्ये खोदून त्यात घरटे करणारे आहेत. ODKF सुद्धा ओढ्याच्या काठाचा भाग छोट्या मातीच्या भिंती आणि बांध अशा ठिकाणी बीळ खोदतात. ओढ्यावरती वाकलेल्या फांदीवरून झेप घेऊन वेगाने चोचीच्या साहाय्याने माती खोदून पुन्हा त्याच वेगाने आपल्या जागी येऊन बसताना यांना खोदताना पाहणं एक पर्वणीच आहे. नर आणि मादी दोघेही घरटे खोदण्याचे काम अगदी मन लावून करत असतात.

Oriental Dwarf Kingfisher
Konkan Tourism : हिरवेगार जंगल अन् निळाशार धबधबा..; हा निसर्गसोहळा अनुभवायचाय असेल, तर 'या' गावाला जरुर भेट द्या..

हे घरटे वरच्या दिशेने इनकलाईन झालेले आढळते. त्यामुळे पावसाचे पाणी बिळात शिरण्याची शक्यता फार कमी आणि घरट्यातील कचरा सुद्धा बाहेर येऊन पडण्यास मदत होत असावी. साधारण २० दिवसांच्या अंडी उबवणी काळानंतर पिल्ले बाहेर येतात आणि आणि त्यानंतर सुरू होते ती नर आणि मादीची अथक मेहनत. सरडे, पाली, खेकडे, कोळी, चौपाई, छोटे कीटक, असे अनेक खाद्य यांच्या शिकारीमध्ये सामील असतात आणि आणि हे खाद्य पिलांना नेऊन भरवण्याची त्यांची धावपळ सुद्धा बघण्यासारखी. जशी पिल्ले मोठी होऊन जातात तसा खाद्याचा आकार सुद्धा वाढत असलेला बघायला मिळतो. साधारण २० ते ३० दिवस हे फिडिंग चालू राहतं आणि त्यानंतर पिल्ले घरट्यातून बाहेर येतात. एक दोन दिवस थांबून भुर्रकन उडून जातात; परंतु बरीच पिल्ले दगावतात सुद्धा.

काही वेळा अति पडलेला पाऊस, बिळात पाणी शिरणे, भूस्खलन, शिकाऱ्यांचा हल्ला, नवीन बांधकाम, अशा अनेक कारणांनी वीण पूर्ण होत नाही आणि ही जोडी पुन्हा नव्याने बीळ खोदण्याच्या तयारीला लागते आणि पुन्हा नव्याने पिल्लांना जन्म देते. गेल्या काही वर्षांत चिपळूण, रत्नागिरी, गुहागर या ठिकाणी खंड्याला पाहण्यासाठी त्याचे फोटोग्राफ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याचे आढळून येत आहे. हे याविषयी पक्षी निरीक्षक नितीन नार्वेकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अनेक गोष्टी विशद केल्या. खरंतर फोटोग्राफी करताना अनेक प्रकारची काळजी घेतली जाणं अत्यंत आवश्यक आहे. अतिउत्साहाच्या नादात बऱ्याच वेळेला फोटोग्राफर्स घरट्याच्या अगदी जवळ जाऊन बसतात. त्यामुळे या खंड्या पक्षांची अॅक्टिव्हिटी डिस्टर्ब होते. काही वेळेला घरटे भक्षकांच्या नजरेस पडते.

Oriental Dwarf Kingfisher
पौगंडावस्था-तणावपूर्ण संक्रमणाचा काळ; कुमारवयात मुलींमध्ये आढळतात मुलांपेक्षा जास्त भावनिक समस्या!

तसेच चांगला फोटो मिळावा म्हणून कडेच्या फांद्या कापणं किंवा जागा व्यवस्थित करणे, असे प्रकार केले जातात. त्यातून घरट्याला धोका उद्‍भवतो. तसेच काही वेळा माणसंसुद्धा बिळात प्राणी जाऊन बसू नयेत म्हणून बिळे बंद करून टाकतात. त्यामुळे फोटोग्राफी करताना कोणत्याही प्रकारे पक्षाला त्रास होणार नाही, अशी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्यावर्षी कर्नाळा अभयारण्यामध्ये झालेल्या घटनेनंतर वनविभागाने अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या फोटोग्राफीला बंदी घातली होती. ती त्यामुळे योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनही कोणाला या पक्षांचा अभ्यास करायचा असल्यास यासाठी योग्य ती मदत आम्ही करू, असे आश्वासन नितीन नार्वेकर यांनी दिले आहे. याचबरोबर पावसाळा संपल्यानंतर हा तिबोटी खंड्या जंगलांच्या किंवा झाडीच्या भागांमध्ये जात असावा, असा अंदाज आहे.

परंतु याचा अजून अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच घरट्यातून पिल्ले बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जीवनाविषयीच्या बऱ्याच गोष्टी अजूनही पूर्णपणे उकललेल्या नाहीत त्यामुळे फोटोग्राफी करत असताना आज या विषयांचा सुद्धा अभ्यास पक्षी निरीक्षकांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. असा हा सुंदर पक्षी गेली काही वर्षे सतत चर्चेत आणि सोशल मीडियावर कोकण रत्न (ज्वेल ऑफ कोकण) म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु असे अनेक पक्षी सुद्धा कोकणात आढळतात. त्यांचा सुद्धा पर्यटनाच्या दृष्‍टिने विचार व्हायला हवा. सर्व प्रकारची काळजी घेऊन जर टुरिझमला चालना दिली तर इथली परिस्थिती बदलणार आहे आणि लोकांचा सहभाग वाढून पक्ष्यांचे रक्षण करणे सहज शक्य होणार आहे.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.