कणकवली : कणकवली तालुक्याच्या काही भागांत आज पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्याने पूरस्थिती निर्माण झाली. वागदेतील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. इतर भागालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. कुडाळ तालुक्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी पडझड झाली. काही मार्गांवरील वाहतूक ठप्प होती.
गेले दोन सरींवर सरी कोसळत होत्या. शुक्रवारी दुपारनंतर जोर वाढला. रात्रभर पावसाने अनेक भागांना झोडपून काढले. कणकवलीसह पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्याने कणकवलीत अक्षरश: दाणादाण उडाली. गड आणि जानवली नद्यांना पूर आला. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सह्याद्री पट्ट्यासह गड नदीपात्रातील बहुतांश केटी बंधारे पाण्याखाली गेले. वागदेतील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. कणकवली-आचरा मार्गावर चव्हाण दुकान आणि सेंट उर्सूला हायस्कूल, पिसेकामते आदी ठिकाणी तीन ते चार फुटांपर्यंत पाणी होते.
त्याने आचरा मार्गावरील वाहतूक बंद झाली. दिगवळे, नाटळ, नरडवे भागांतील अनेक वाड्यांमध्ये पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती. कणकवलीत जानवली नदीला पाणी आल्याने गणपती साणा दिवसभर पाण्याखाली होता. लगतच्या कातकरी घरांनाही पुराचा धोका निर्माण झाला होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने झोपड्यांलगत आलेले पाणी काही प्रमाणात ओसरले.
जानवली नदीकाठच्या महाजनीनगर येथील घरांलगत पाणी आल्याने नागरिकांमध्ये घबराट होती. शहरातील सोनगेवाडी येथे पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील घरांमध्येही पाणी साचले होते. सकाळपासून पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक मार्ग बंद असल्याने एस.टी. सेवाही कोलमडली. कणकवली बाजारपेठेतही शुकशुकाट होता. पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील काही शाळा आणि विद्यालये देखील लवकर सोडून देण्यात आली होती.
वैभववाडी तालुक्यातही पावसाचा जोर वाढला असून, तालुक्यातील शुक आणि शांती नद्या ओसंडून वाहत होत्या. शुक नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे खारेपाटण शहरात पूरस्थितीची शक्यता होती. तालुक्यातील कुसूर-सुतारवाडी, सोनाळी-चव्हाणवाडी पुलांवरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे संपर्क काही काळ तुटला. खांबाळे येथील पांडुरंग गुरव यांच्या घरासभोवतालचा संरक्षक कठडा कोसळला. गावातील आणखी एक विहीर कोसळली.
किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. देवगड तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. संततधारेमुळे देवगड-नांदगाव मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. तालुक्यातील दाभोळे तसेच ग्रामीण भागातील अन्य रस्त्यांवरही पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. कुडाळातील २७ गावांचा संपर्क तुटला कुडाळ तालुक्याला देखील संततधारेने झोडपून काढले. तालुक्यातील आंबेरी पुलावरून सकाळपासून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे या भागातील २७ गावांचा सपंर्क तुटला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.