कणकवलीची स्थिती; खचलेला उड्डाणपूल रस्ता तसाच

पावसाळा संपला तरी अद्याप एकेरी वाहतूक
Kankavli Status flyover road
Kankavli Status flyover roadsakal
Updated on

कणकवली : येथील मुंबई-गोवा महामार्ग उड्डाणपुलावरील रस्त्याचा काही भाग पावसाळ्यात खचला होता. या ठिकाणी तात्‍पुरता सिमेंट क्राँक्रिटचा भराव टाकून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यानंतर आता पावसाळा संपला तरी खचलेल्‍या उड्डाणपूल रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. खचलेल्‍या ठिकाणी अजूनही एकेरी वाहतूक सुरू असल्‍याने महामार्गावर सतत अपघाताची ही शक्‍यता निर्माण होत आहे; मात्र या साऱ्या प्रकाराकडे महामार्ग विभाग दुर्लक्ष करत आहे, असा आरोप कणकवलीवासीयांतून होत आहे.

शहरातील उड्डाणपूल रस्ता सुरुवातीपासूनच वादात सापडला होता. उड्डाणपूल उभारणीवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्लॅबही कोसळला होता. तर उड्डाणपुलाची उभारणी सुरू असताना एस. एम. हायस्कूल परिसरात जोडरस्त्याचा भागही पहिल्‍याच पावसात कोसळला होता. सलग दुसऱ्या वर्षीदेखील तसाच प्रकार झाल्‍याने उड्डाणपूल रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला होता. त्‍यानंतर महिनाभर तात्‍पुरती डागडुजी करून ऑगस्ट २०२१ मध्ये उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला; मात्र उड्डाणपुलाची कायमस्वरूपी दुरूस्ती करण्यास ठेकेदाराला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही.

शहरातील धोकादायक झालेला उड्डाणपूलाचा भाग काढून तेथे नव्याने बांधकाम करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिले होते. त्‍यानुसार एस.एम.हायस्कूल परिसरात ठेकेदाराने गतवर्षी नवीन प्लेटस्‌ आणून ठेवल्‍या; मात्र धोकादायक भाग हटवून तेथे नवीन बांधकाम करण्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही. सध्या उड्डाण पुलावरील एस.एम.हायस्कूल परिसरात पुलाच्या दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तीन पदरी असलेल्‍या उड्डाण पुलावरील एकच लेन सुरू असल्‍याने भरधाव जाणारी वाहने तेथील बॅरिकेटला धडकून अपघात होण्याची शक्‍यता आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे ठेकेदार आणि महामार्ग विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी दुसरी बाजून जाणून घेण्यासाठी महामार्ग विभागाशी संपर्क साधला; मात्र सहाय्यक अधीक्षक अभियंता पद रिक्त असल्याने माहिती मिळू शकली नाही. पदच रिक्त असल्याने आता दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

''उड्डाणपुलाचा भाग १३ जुलै २०२१ रोजी कोसळला होता. त्‍यानंतर लगेचच तत्‍कालीन महामार्ग विभागाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिता पटेल यांनी धोकादायक भाग काढून तेथे नवीन बांधकामाचे आदेश ठेकेदाराला दिले होते. पावसाळा असल्‍याने हे काम लांबणीवर टाकण्यात आले. आता पावसाळ्याआधी हे काम न झाल्‍यास पुन्हा उड्डाणपूल खचून अपघात होण्याची शक्‍यता आहे.''

- विनायक मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते

''महामार्गाच्या निकृष्‍ट कामाबाबत वारंवार आवाज उठवला. प्रांताधिकाऱ्यांकडेही दाद मागितली. त्‍यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाचा धोकादायक भाग हटविण्याचे आदेशही ठेकेदाराला दिले; पण महामार्ग प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्‍याने उड्डाणपुलाचा धोकादायक भाग अजूनही हटविलेला नाही. त्‍यामुळे लवकरच आम्‍ही सर्व कणकवलीकर पुन्हा एकदा आंदोलन करणार आहोत.''

- अशोक करंबेळकर, अध्यक्ष, ‘आम्‍ही कणकवलीकर’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.