kokan: दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत वृक्षवल्ली गटाने महिला बचत गटांच्या समवेत करजगाव ब्राम्हणवाडी येथे एकाच दिवशी कोणत्याही कुशल कामगारांची मदत न घेता तीन कोकण विजय बंधारे बांधून चांगलाच विक्रम केला आहे. याआधी असे एकाच दिवशी तीन बंधारे कोणीच उभे केले नसल्यामुळे विद्यापीठ स्तरातून या विद्यार्थ्यांनींचे चांगलेच कौतुक होत आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी शाखेच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींना रावेअंतर्गत सुरुवातीपासूनच शेतीविषयक सर्व उपक्रम राबविण्यासाठी दापोली तालुक्यातील करजगाव हे गाव देण्यात आले होते. शेवटच्या वर्षाला असणाऱ्या या विद्यार्थिनींनी येथील शेतकऱ्यांसमवेत अनेक शेती विषयावर प्रात्यक्षिके, कार्यक्रम राबविण्याचे कार्य जून २०२३ पासूनच चालू केले होते. त्यामध्ये हे बंधारे बांधण्याचा कार्यक्रम नुकताच पार पाडण्यात आला. ता.१९ नोव्हेंबर यादिवशी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास बंधारे बांधण्याचे काम सुरू करून दुपारी २ वाजेपर्यंत हे तीन बंधारे उभे केले.
साधारण ५०० मीटरच्या अंतराने हे बंधारे बांधण्यात आले आहेत. करजगाव मधील स्वामी समर्थ महिला बचत गट, सरस्वती महिला बचत गट, महिला बचत गट, साईनाथ माऊली महिला बचत गट या गटांच्या सर्व महिला, ग्रामसेवक समीर पाटील, विजय चिपळूणकर, व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थीनी म्हणून ऋतुजा पेठे (अलिबाग), ऋतुजा बाम्हणे (पुणे), सलोनी भारदे (टेटवली), निहाली - कटवटे (अलिबाग), मधुरा सारंग - (रत्नागिरी), जान्हवी गावकर - (मुंबई), प्रतिक्षा जाधव (लातूर), माधुरी घोडेकर (अहमदनगर), प्रचिती मालवणकर (वेंगुर्ला), बंधारे बांधण्याच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभागी झाल्या होत्या.
कोकण विजय बंधाराच्या माध्यमातून भुगर्भात पाण्याचे पूनर्भरण होते. त्यामुळे उन्हाळयात जाणवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य होते. नाला पात्रातील लहान ते मध्यम आकाराच्या दगडांचा वापर करून कुशल कामगारांच्या मदतीविना आम्ही हे तीनही बंधारे गावकऱ्यांच्या साहाय्याने बांधले आहेत. तसेच कमी खर्चिक व बांधकामास सोपे असून सर्वसाधारणपणे २-३ महिने पाण्याचा साठा या बंधाऱ्यांमध्ये उपलब्ध करणे शक्य आहे.
याआधी साधारण पाच वर्षांपूर्वीच्या कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांनी एकच कोकण विजय बंधारा बांधला होता. करजगांवातील एकूण ३५ गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला; अशी माहिती दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) वृक्षवल्ली गटाची प्रमुख ऋतुजा पेठे हिने दिली.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, डाॅ. सचिन पाठक विशेषज्ञ कृषी विभाग यांचे योग्य बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.