सिंधुदुर्गतच्या पाऊलखुणा; ब्रिटिशांविरूद्ध रोवला बंडाचा झेंडा

येथील याच मनोहर मनसंतोष गडावर ब्रिटिशांविरूद्धच्या बंडाचे मुख्य केंद्र होते.
मनोहर मनसंतोष गड
मनोहर मनसंतोष गडsakal
Updated on

ब्रिटीशांविरोधातील १८५७ मध्ये झालेले बंड भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या लढाईची सुरवात मानली जाते; मात्र सावंतवाडी संस्थानात त्या आधी म्हणजे १८४४ मध्ये ब्रिटिशांविरूद्ध मोठे बंड झाले. ते जवळपास पाच वर्षे चालले. या बंडाने ब्रिटिशांनाही जेटीस आणले.

ब्रिटीशांनी कारभार हातात घेतल्यापासून सावंतवाडी संस्थानात छोटे-छोटे बंडाचे झेंडे अधून मधून उंचावले जातच होते; पण १८४४ मध्ये ब्रिटीशांविरूद्ध खूप मोठे बंड पेटले. याची व्याप्ती पूर्ण संस्थानात पसरली. या बंडाचा उगम कोल्हापूर संस्थानातून झाला होता. कोल्हापूरचे तत्कालीन कारभारी दाजी कृष्ण पंडीत आणि सामानगड किल्ल्यावरील गडकरी यांचे भांडण झाले. यातून सामनगडावरील गडकऱ्यांनी बंड केले. बेळगाव येथील ब्रिटिशांचे कर्नल वॉलेस यांनी ते मोडून काढले. या पाठोपाठ भुदरगडावरील रहिवाशांनीही बंड पुकारले. ते मोडण्यासाठी ब्रिटिशांचा जनरल डिला मोटी हा सैन्य घेवून गेला; मात्र युद्ध न करताच भुदरगडच्या गडकऱ्यांनी किल्ला ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. या दोन घटनांनंतर कोल्हापूर संस्थानात छोटी-मोठी बंडाची मालीकाच सुरू झाली. याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांनी कारभारात केलेले बदल होते. संस्थानकाळातील व्यवस्था सावंतवाडीप्रमाणे कोल्हापुरातही बदलण्यात आली. यामुळे अनेक जण दुखावले गेले. त्यातून हे सत्र सुरू झाले. ब्रिटिशांनी कोल्हापुरातील बंडाळी मोडीत काढण्यासाठी मोहीम उघडली.

मनोहर मनसंतोष गड
हिंगोली : परप्रांतीय पणत्यांवर हिंगोलीकरांची दिवाळी

कोल्हापुरातील बंडखोर लगतच्या सावंतवाडी संस्थानात आश्रयाला येण्याची शक्यता होती. शिवाय या संस्थानातही बंड पसरण्याची भीती होती. याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटीशांनी कोल्हापूरच्या सिमेवरील रांगणा व शिवापूरचा मनोहर मनसंतोष गड यावर नजर ठेवण्याचे धोरण आखले. यासाठी सावंतवाडी लोकल कोरचा अंमलदार मेजर वेनवो यांच्या नेतृत्वाखाली सैन्याची एक तुकडी देवून हनुमंतघाटाच्या (निसणीची पाणंद) पायथ्याशी हळदिचे नेरूर येथे छावणी बसवली.

पुढे ब्रिटिशांचा अंदाज बरोबर ठरला. कोल्हापुरातील अनेक बंडखोर शिवापूरच्या मनोहरगडावर आले. सावंतवाडी संस्थानात सगळ्यात आधी बंड पुकारणारे फोंड सावंत तांबुळकर आणि त्यांची मुले या बंडखोराना येवून मिळाले. त्यांनी या संस्थानातही ब्रिटीशांना जेरीस आणायचे नियोजन सुरू केले. संस्थानातील सगळ्यात मोठ्या बंडाची ही सुरवात होती. याची पहिली ठिणगी १० ऑक्टोबर १८४४ ला पडली. मनोहरगडाच्या पायथ्याशी माणगाव खोऱ्यात गोठोस या गावात त्यांनी पहिले पाऊल टाकले. मनोहरगडाचे सबनीस म्हणून गोठोसचे कुलकर्णी असलेले घनःशाम कृष्ण गोठोसकर हे काम पाहायचे. १० ऑक्टोबरच्या रात्री या बंडवाल्यानी गोठोसकर यांच्या घरावर हल्ला केला. त्यांच्या ताब्यातील सरकारी दप्तर व खाजगी कागदपत्र जाळून टाकली. गोठोसकर यांच्या एका भावाला ताब्यात घेवून पुन्हा मनोहरगड गाठला. गोठोसपासून हळदिचे नेरूरची ब्रिटीशांची छावणी अवघी तीन मैलावर होती. ब्रिटिशांना बंडखोरांनी दिलेले हे पहिले आव्हान होते.

बंडकऱ्यांचे हे धाडस पाहून ब्रिटिशांनी यावर ठोस उपाय योजण्याचा निर्णय घेतला. संस्थानचे पोलिटीकल सुप्रिटेंडन्ट यांनी मेजर वेनवो यांच्याशी सल्लामसलत केला. यावेळी पारपोली येथे असलेल्या ब्रिटीशांच्या छावणीवर सैन्य कुमक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. बंडकऱ्यांनी मात्र आपल्या हालचालींची व्याप्ती वाढवली. ११ ऑक्टोबर १८४४ ला त्यांनी पुन्हा हल्ला केला. रात्री मनोहर गडावरील २०० सशक्त गडकरी सोबत घेवून ते पुन्हा हळदिचे नेरूरजवळील दुकानवाडीत आले. तेथे ब्रिटीशांच्या लोकलकोरचा एक जमादार काही सैनिकांसह तळ ठोकून होता. त्याच्यावरच त्यांनी हल्ला चढवला; मात्र त्या जमादाराने हा हल्ला परतवून लावला.

इकडे ब्रिटिश पोलिटीकल सुप्रिटेंडन्टनी हे बंड मोडण्यासाठी सैन्याची जमवाजमव सुरू केली. हत्यारबंद लोक व शिपायांना हजर होण्याचे आदेश काढले; मात्र तोपर्यंत बंडाची हवा पसरली होती. अनेकजण नाराज, असंतुष्ट होते. त्यामुळे फार कमी प्रमाणात सैनिक हजर झाले. १३ ऑक्टोबरला मेजर वेगवो यांनी रांगणा आणि मनोहरगडावर हल्ला केला. या हल्ल्यापर्यंत रांगणागडावरून कोणत्याच बंडाच्या हालचाली झाल्या नव्हत्या. मनोहरगडावरील बंडखोरांना ते गुप्तपणे मदत मात्र करत होते. यामुळेच ब्रिटीशांनी रांगणागडालाही टार्गेट केले.

मनोहर मनसंतोष गड
धुळे : राष्ट्रवादीचे ‘जवाब दो’ आंदोलन

या हल्ल्याचा परिणाम मात्र वेगळाच झाला. रांगणागडावरील गडकरी उघडपणे मनोहरगडवरील बंडखोराना जावून मिळाले. दोन्हीकडील लोकांनी एकत्र येवून मेजर वेनवो यांच्या सैन्याला चारही बाजूने घेरले. यामुळे सावंतवाडीतून ५० जणांची जादा कुमक ब्रिटीशांनी पाठवली. वेंगुर्ल्यात असलेल्या ब्रिटीशांच्या सैन्य तळातूनही मदत करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला. तेथे सैन्य तुकडी तयार ठेवण्याची सुचना तेथील लेफ्टनंट कर्नल वायली यांना देण्यात आली. हल्ला करून बंड मोडून काढण्याचा ब्रिटिशांचा हा प्रयत्न फसला. यामुळे पूर्ण संस्थानात बंडाची हवा पसरली.

पुन्हा मनोहरगडावरील बंडखोरांनी दुकानवाड येथे घुसून पुष्कळ धान्य लुटून नेले. याच दरम्यान ब्रिटिशांच्या लोकल कोरची येथील तुकडी सावंतवाडीत गेली होती. याचा फायदा बंडखोरानी घेतला. या प्रकारामुळे ब्रिटिशांनी लोकल कोरचा अधिकारी लेफ्टनंट प्राईस याला ओरोस येथे असलेली त्याची सैन्य तुकडी घेऊन दुकानवाड येथे पाठवले. ब्रिटिशांचे कोल्हापूर येथील कर्नल औट्स यांना बेळगावच्या पोलिटीकल एजंटमार्फत या सगळ्याची कल्पना देण्यात आली. यानंतर बंड शमवण्यासाठी सावंतवाडी संस्थानपुरत्या ब्रिटीशांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी व्यापक स्वरूप आले.

---------

चौकट

बंडाची व्याप्ती सर्वत्र पसरली

आतापर्यंत बंडाची व्याप्ती शिवापूरपासूनच हळदिचे नेरूरपर्यंतच मर्यादित होती; मात्र ३० ऑक्टोबर १८४४ च्या घटनेने ती संस्थानच्या इतर भागातही पोहोचल्याचे स्पष्ट झाले. त्या दिवशी गोव्यालगतच्या सासोली (ता. दोडामार्ग) येथे ब्रिटीशांसाठी येणार्‍या काही गाड्यांवर सशस्त्र बंडखोरांनी हल्ला केला. या गाड्यांच्या ताफ्यात लष्करी सामान असेल असा हल्लेखोरांचा समज होता. या हल्ल्यात दोन गाडीवाल्यांना ठार करण्यात आले. आत असलेली दारूची पिंप फोडून टाकण्यात आले.

अशी आहे निसणीची पाणंद

बंड मोडीत काढण्यासाठी ब्रिटीशांनी हळदीचे नेरूर येथे हनुमंत घाटी याठिकाणी पहिली सैनिकांची छावणी बसवली होती. स्थानिक याला निसणीची पाणंद म्हणून ओळखतात. याच्या वरच्या भागात कोल्हापूर जिल्हा येतो. पूर्वी येथे हनुमंते नावाचे गाव होते. त्याच्यावरुनच याला हनुमंते घाटी असे नाव पडले होते. पाटगाव धरण झाल्यानंतर हे गाव बुडीत क्षेत्रात गेले. ही दोन संस्थानच्या सिमांवरील वाट होती. याठिकाणी एक उंच भाग असून तेथे निसण (शिडी) लावावी लागत असे. यावरूनच त्याचे नाव निसणीची पाणंद असे पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com