Kokan : कोकणचे राजकारण पोखरले व्यक्तीद्वेषाने

आदित्य ठाकरेंच्या निष्ठायात्रेतही दर्शन; शिवसेना, भाजप आणि शिंदे गटात चुरस
Aditya Thackeray , Devendra Fadnavis and Eknath Shinde
Aditya Thackeray , Devendra Fadnavis and Eknath Shindeesakal
Updated on

चिपळूण : राजकारणात मतभेद असावेत; परंतु मनभेद असू नयेत, असे म्हटले जाते. सध्या मतभेद वैचारिक पातळीवरून शाब्दिक पातळीवर नेले जात आहेत, अर्वाच्य भाषा वापरली जात आहे. यापूर्वी परस्परांवर टीकास्त्र सोडणारे विरोधक एकत्र भेटल्यावर त्यांच्यात वैरभाव नसायचा; मात्र गेल्या काही काळात व्यक्तीद्वेषाने राजकारण पोखरले आहे.

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या कोकणातील निष्ठायात्रेतही ते प्रकर्षणाने पाहायला मिळाले. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बरोबर घेऊन राज्य सरकार बनवले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या आघाडीचे जनक ठरले. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसने या सरकारला पाठिंबा दिला.

जसे पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे, त्या पदावर असणारे नरेंद्र मोदी एका पक्षाचे नेते नसून राष्ट्राचे प्रमुख आहेत तसेच मुख्यमंत्रिपद घटनात्मक असून, त्यावर विराजमान असलेले उद्धव ठाकरे एका पक्षाचे नेते नसून राज्याचे प्रमुखही होते. ठाकरेंसह राष्ट्रीय नेत्यांविरोधात बोलताना राजकारणाचा दर्जा घसरणार नाही, याची काळजी घेणे विरोधकांकडून अपेक्षित होते; परंतु अडीच वर्षात तो अत्यंत खालच्या पातळीवर घसरला.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी जरूर केली; मात्र ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीवर टीका करताना त्यांचे शब्द सभ्यच होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्यानंतर शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणवले जाणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीच्या विरोधात टीका करताना कोणतीच मर्यादा ठेवली नाही.

ठाकरे कुटुंबावर टीका करताना रामदास कदमांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनाही अंगावर घेतले. जाधव गेली तीन वर्षे शिवसेनेकडून भाजपविरोधी आक्रमक भूमिका मांडत आहेत. पक्ष फुटल्यानंतर ठाकरेंनी त्यांना नेतेपद दिले. मुंबईसह मराठवाड्याचा दौरा करत त्यांनी बंडखोरांचा समाचार घेतला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्यात ते सामंत यांच्या घरापर्यंत पोहचले.

दापोलीच्या दौऱ्यात त्यांनी रामदास कदमांवर निशाणा साधला. १९ वर्षापूर्वी खेर्डीतील सभेत रामदास कदमांनी केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचा बदला जाधवांनी दापोलीच्या सभेत घेतला. भास्कर जाधव राष्ट्रवादीत असताना ते शिवसेनेच्या विरोधात काय बोलले होते याचा व्हिडिओ आमदार योगेश कदम सोशल मीडियावर टाकत आहेत. राजकारणाचा विखारी पोत संपुष्टात येण्याऐवजी तो दिवसेंदिवस वाढत आहे.

नक्की काय निष्पन्न होते?

मर्यादा सोडून होणाऱ्या भाषणातून नक्की काय निष्पन्न होते? राज्यातील परिस्थिती बदलते का? मतदानाचा टक्का किती वाढतो? याचा विचार सामान्य माणसाने तसेच राजकीय नेत्यांनी करायला हवा. एखाद्या नेत्याविरोधात किंवा सरकारविरोधी भूमिका घेण्याचे विरोधी पक्षाला सर्वतोपरी स्वातंत्र्य आहे; परंतु जे लोकहिताचे आहे, देशहिताचे आहे त्याला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. सरकारकडून चांगले घडत नसेल तर अनुभवी लोकांनी दिशा दाखवली पाहिजे; परंतु सध्या व्यक्तीद्वेषाचे राजकारण वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.