Devgad Hapus Mango : देवगड हापूसची पहिली पेटी बाजारात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातवणला मान; शिंदे बंधूंच्या मेहनतीला मिळाले फळ
Devgad Hapus Mango
Devgad Hapus Mango
Updated on

देवगड : अनेक अडचणींवर मात करीत आणि प्रचंड मेहनत घेत तयार झालेला जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस’ आंबा आज वाशी फळबाजारात रवाना झाला. तालुक्यातील कातवण येथील दिनेश दीपक शिंदे आणि प्रशांत सीताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसची दोन डझनची या हंगामातील पहिली पेटी आजच्या मुहूर्तावर फळबाजारात पाठवली. ऐन नोव्हेंबरमध्येच हापूसने मुंबई बाजार गाठल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक होत आहे.

थंडीच्या सुरुवातीला झाडांना पालवी येते. त्यानंतर मोहोराची चाहूल लागते. मोहोर टिकवून फलधारणा होण्यासाठी बागायतदार फवारणी करतात. त्यानंतर आंबा पीक बाजारात जाते, असे सर्वसाधारण व्यवस्थापन चालते; मात्र अलीकडे शेतकरी निसर्गालाही साथीला घेतात. काहीवेळा पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. यातून हंगामाआधी आंबा पीक घेता येते. हेच तंत्र तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आत्मसात केले.

त्यांच्या बागेतील हापूसच्या कलमांना १५ ऑगस्टच्या आसपास मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे काही कलमांवरील मोहोर गळून पडला; मात्र चार-पाच कलमांवरील मोहोर राहिला. प्रयोग म्हणून आलेला मोहोर टिकवण्यासाठी शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. मोहोराची काळजी घेतल्याने त्यातून उत्तम फलधारणा झाली. त्यामुळेच चार कलमावरील उत्पादित झालेल्या आंब्याचे पहिले फळ काढून ‘देवगड हापूस’ची पहिली पेटी आज विधिवत पूजा करून वाशीला पाठविली.

डझनाला आठ हजारांचा भाव?

हंगामाच्या आधीच फळबाजारात जाणाऱ्या दोन डझनच्या आंबा पेटीला सुमारे सात ते आठ हजारांच्या आसपास भाव मिळेल, असा अंदाज स्थानिक शेतकरी व्यक्त करीत होते. हापूस कलमांची योग्य निगा राखल्यास फलधारणा होऊ शकते, असे यातून ध्वनित झाले. ऋतुचक्रात वारंवार बदल होत असून, शिंदे बंधूंनी मोहोर टिकविण्यासाठी अथक प्रयत्न केले. यंदाच्या हंगामातील आंबा फळाची चव त्यांनी स्वतः चाखली. त्यानंतरच उर्वरित आंबे काढत पेटी पाठविली.

बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन काहीवेळा अडचणीत सापडते, तरीही कलम बागांची योग्य मशागत केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नसते. यासाठी सुयोग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. ऑगस्टमध्ये कलमांना आलेला मोहोर टिकवून त्यातून तयार झालेला आंबा आता फळबाजारात पाठवण्यात येत आहे. चांगला भाव मिळेल, असा विश्‍वास आहे.

- प्रशांत शिंदे, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.