गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही ; सिंधुदुर्गातील स्पेशल चाइल्डची संघर्षमय कहाणी

kokan student he is Deaf and dumb study for officers exam and study in forest area due to faces many problems in sindhudurg
kokan student he is Deaf and dumb study for officers exam and study in forest area due to faces many problems in sindhudurg
Updated on

बांदा : जन्मताच कर्णबधिर व मूकबधिर; मात्र खचून न जाता इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याचा निश्‍चय. हेच स्वप्न उराशी बाळगून युवकाने पुणे शहरात कर्णबधिर शाळेत प्रवेश घेतला. मात्र, लॉकडाउनमुळे घरी परतला. शिकण्याची प्रचंड जिद्द असलेल्या या युवकाने घरापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगरात निसर्गाच्या व हिंस्त्र श्‍वापदांच्या सान्निध्यात घनदाट जंगलात अभ्यासाचा दिनक्रम सुरू केला.

गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही. शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या आरोस-माऊलीवाडी येथील चेतन कोरगावकर (वय २०) या युवकाची धडपड ही खरोखरच कौतुकास्पद आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्‍य नाही, हे चेतनने दाखवून दिले आहे. शारीरिक विकलांग असूनही त्याने हार मानली नाही. ‘मी कर्णबधिर असलो म्हणून काय झाले? मलाही पुढे शिकायचे आहे, उज्ज्वल भविष्य बनवायचे आहे.’ असा निर्धार चेतन याने सांकेतिक खुणांच्या भाषेतून व्यक्त केला.   

आरोस-माऊलीवाडी येथे चेतन आईवडील व बहिणीसह राहतो. आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने घर चालविण्यासाठी बहिणीने बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन गोव्यात खासगी कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. लॉकडाउन असल्याने तिची नोकरी गेल्याने तीदेखील घरीच आहे. अशा कठीण परिस्थितीतून घराची गरिबी दूर करण्याचा निश्‍चय चेतनने केला आहे. तो बोलू व ऐकू शकत नाही; मात्र त्याच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्ने आहेत.

चेतनने दहावीपर्यंतचे शिक्षण शिरोडा येथील मूकबधिर शाळेत पूर्ण केले आहे. दहावीच्या परीक्षेत त्याने ६७ टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्याचे इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. त्याची पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती; मात्र मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. पुढील शिक्षणासाठी मुंबई किंवा पुण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्या इच्छेखातर आईवडिलांनी त्याला पुणे येथील स्व. सी. आर. रंगनाथन कर्णबधिर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला; मात्र महाविद्यालय शुल्क व होस्टेलची एकत्रित २२ हजार रुपये भरण्यासाठी कोरगावकर कुटुंबीयांकडे पैसेही नव्हते.

आई-वडिलांवर भार येऊ यासाठी चेतनने सुटीच्या कालावधीत गवंडी काम करून मेहनतीने पैसे गोळा केले. या मिळालेल्या पैशातून त्याने पुणे येथे कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मार्चमध्ये लॉकडाउन झाल्याने चेतन पुण्यातून आपल्या घरी परतला. त्याला शिकण्याची प्रचंड जिद्द होती. त्याच्या महाविद्यालयात ऑनलाईन अभ्यास वर्ग सुरू झालेत; मात्र अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे मोबाईलदेखील नव्हता. भावाची शिकण्याची तळमळ पाहून त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी मोबाईल घेऊन दिला. मोबाईल तर मिळाला; मात्र रेंज नसल्याने अभ्यास करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. या अडचणीवर मात करण्यासाठी त्याने डोंगरातील घनदाट जंगलात रेंज शोधली. एका झाडाखाली त्याच्या अभ्यासाचा दिनक्रम सुरू झाला. 

शैक्षणिक खर्चासाठी गणपती मूर्तीशाळेत काम

चेतन हा लॉकडाउनमुळे घरी परत आला. ऑनलाईन शिक्षण घेताना आपला शैक्षणिक साहित्य व मोबाईलचा खर्च भागविण्यासाठी त्याने  गणेश चित्र शाळेत रात्रीचे काम केले. दिवसा शिक्षण घेऊन तो रात्री मूर्ती घडविण्याचे काम करत असे. तो उत्तम कलाकार असून त्याचे रंगकामदेखील उत्कृष्ट आहे. मिळालेल्या पैशाचा त्याने शैक्षणिक खर्चासाठी वापर केला.  

"चेतन हा जन्मताच मूक व कर्णबधिर आहे. त्याच्यावर मुंबईत लहान असताना उपचार करण्यात आले. उपचारासाठी होणारा खर्च हा पेलवणारा नसल्याने त्याला घरी आणले. त्याला ऐकता, बोलता येत नसले तरी तो प्रचंड हुशार आहे. अभ्यासाशिवाय त्याला काहीच सुचत नाही. त्याला घरच्या परिस्थितीची जाण आहे. त्यामुळे खूप शिकून मोठा अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासाठी तो स्वतः मेहनत घेत आहे."

- आनंदी कोरगावकर, झिलू कोरगावकर, (आई-वडील)


गव्यांच्या कळपाने घेरले

चेतन अभ्यास करत असलेले ठिकाण हे घनदाट जंगलात मानवी वस्तीपासून ४ किलोमीटर अंतरावर आहे. एके दिवशी भर दुपारी अभ्यास करत असताना ४ गव्यांच्या कळपाने त्याला घेरले. मूकबधिर असल्याने तो कोणाला आवाजही देऊ शकत नव्हता, मात्र त्याने न घाबरता या संकटाचा सामना करत गवे निघून जाईपर्यंत झाडावर चढून सुरक्षित आसरा घेतला. कित्येकवेळा त्याला जंगलात आपल्या आजूबाजूला जंगली प्राण्यांचे अस्तित्व दिसल्याने त्याने सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.