उरण तालुक्यातील करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस हे सागरी अंतर आता केवळ अर्ध्या तासात पार करता येणार आहे. रविवारी (ता. १३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करंजा ते रेवस या १० किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. हा पूल लवकरच उभा राहणार असून कमीतकमी वेळेत सागरी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. मुंबईतील सागरी सेतूमार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे.
कोकणचे भाग्यविधाते तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांनीही त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात या करंजा-रेवस पुलाच्या उभारणीसाठी कंबर कसली होती. आता रायगडवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या पुलाच्या उभारणीनंतर खऱ्या अर्थाने साकार होणार आहे. दुरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात करंजा येथील द्रोणागिरी मंदिराच्या भक्त भवनात स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
पुलाची रूपरेषा
१. बांधकामाची निविदा - तीन हजार ५७ कोटी
२. एकूण लांबी - १०.२०९ किलोमीटर
३. एकूण रुंदी - २९.५० मीटर
३. दोन्ही बाजूला पादचारी मार्ग - १.५ मीटर
४. वाहनांची वेगमर्यादा - ८० किमी प्रतितास
सध्या रेवस-करंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यासाठी दोन तासांचा अवधी लागतो, तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. आता पूल झाल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी जाणाऱ्या उरण, पनवेल तालुक्यातील हजारो प्रवाशांचा खर्च व वेळेची बचत होणार आहे. उरण येथून अवघ्या ३० ते ३५ मिनिटांच्या अवधीत अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण गाठता येणार आहे.
वर्षानुवर्षे अनेक लोक कामानिमित्त अलिबाग येथे जात असतात. दरम्यान, करंजा-रेवस बोटीतून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला दुचाकी घेऊन जाण्यासाठी प्रवाशांची मोठी लूट होत होती. आता नवीन पूल झाल्यानंतर या लुटीला लगाम लागणार असल्याने प्रामुख्याने अलिबाग, उरण व पनवेल तालुक्यासह विविध ठिकाणच्या प्रवाशांनी करंजा-रेवस पुलाच्या उभारणीचे स्वागत केले आहे.
रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग-४ (रेवस-रेड्डी कोस्टल हायवे)वरील हा ४ लेन पूल जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबागदरम्यानचे अंतर अंदाजे ५५ किलोमीटरवरून ३० किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. हा पूल १० किलोमीटर लांबीचा आहे. २९.५० मीटर रुंद पूल असणार आहे. या पुलावरून तब्बल ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावतील असेच डिझाइन विकसित करण्यात येत आहे. पुलावर दोन्ही बाजूला १.५ मीटर रुंद पादचारी पदपथ समाविष्ट करण्यात आले आहेत. पुलाला जोडण्यासाठी करंजा येथे ५.१३ किलोमीटर लांबीचा; तर रेवस येथे १.७१ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे.
करंजा-रेवस पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई-मुंबईशी जोडला जाणार आहे. रेवस ते करंजा हा पूल दोन किमी लांबीचा असणार असून, त्याच्या दोन्ही बाजूला तीन किमी लांबीचे मार्ग असतील. शिवडी आणि रायगडमधील न्हावा-शेवाला जोडणारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कार्यान्वित झाल्यानंतर, हा रेवस-करंजा पूल अलिबाग आणि मुरूडसह कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे.
प्रलंबित रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते उरणनजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पूल अखेर मार्गी लागण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले होते. हा पूल व्हावा असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे स्वप्न होते. ते सत्यात उतरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.