गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना येथील नागमोडी वळणांचा अंदाज येत नाही.
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता आधीच तीव्र उतार आणि वळणांचा आहे. या ठिकाणी मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी वाहने, त्याचवेळी कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी डावीकडून उजवीकडे वळणारी वाहने आणि त्याचवेळी जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणारी अशा विचित्र स्थितीची भर पडली आहे. त्यामुळे येथे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता प्रवासासाठी ‘डेंजर झोन’ ठरत आहे.
शहरानजीकच्या कोंढेतड येथून महामार्गावरून विविध भागामध्ये जाणारे मार्ग वा रस्ते (Road) आहेत. त्यामध्ये या भागामध्ये वाहनांसह लोकांची नेहमीच वर्दळ असते. कोळशाच्या ट्रकने दुचाकी उडवून मोटारीला दिलेल्या धडकेतून झालेल्या अपघाताने कोंढेतड गाडगीळवाडी येथील महामार्गावरील ठिकाण धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.
कोंढेतड गाडगीळवाडी येथील परिसर वळणाचा आणि उताराचाही आहे. अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचाच पूल पार करून मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना येथील नागमोडी वळणांचा अंदाज येत नाही. त्याचवेळी डोंगर, विल्ये, जैतापूर आदी भागांमध्ये जाणारी वाहने मोठ्या पुलावरून रस्त्याने येत पुढे कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी त्यांना महामार्ग पार करून डावीकडून उजवीकडे वळावे लागते तसेच या भागातील पूर्वीच्या जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणाऱ्या वाहनांचीही वर्दळ असते.
शहराच्या दिशेने जाणाऱ्या पूर्वीच्या जुन्या रस्त्याच्या येथे कोणताही माहितीफलक वा दिशादर्शक फलक नसल्याने गोव्याकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या वाहनाला डोंगरतिठा येथे आल्यानंतर नेमके कुठल्या रस्त्याने जायचे? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कोंढेतड गाडगीळवाडी आणि डोंगरतिठा डेंजर स्पॉट झाले आहेत.
कोंढेतड गाडगीळवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाणारे रस्ते असल्याने त्या-त्या भागात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ नेहमीच जास्त असते. या भागात तीव्र उतार आणि वळण असल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी दिशादर्शक फलक आणि अन्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-अमोल गुरव, वाहनचालक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.