रत्नागिरी : जलप्रलयातील त्या 72 तासात कोकण रेल्वेच्या अधिकारी, कर्मचार्यांसह कंत्राटी कामगारांनी पुरात अडकुन प्रवाशांसाठी जीवाची बाजी लावली. पूरामुळे चिपळूण स्थानकांत अडकलेल्या शेकडो प्रवाशांच्या नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यापासून ते अगदी रुळ ठिकठाक करण्यापर्यंतची कामे अविरतपणे सुरु ठेवली. काळोख, पूर याची तमा न बाळगता प्रसंगी कंबरभर पाण्यातून मार्गक्रमण करत दमल्या भागलेल्या कर्मचार्यांनी ‘सादर सेवा’ हे कोकण रेल्वेचे ब्रीद सत्यात उतरवले.
चिपळूणात 24 जुलैच्या पहाटेला आलेल्या महापुराने हजारो जीव संकटात सापडले. पुढील 48 तासांहून अधिकचा काळ सार्यांचेच जीव टांगणीला लागले. सर्वच स्थानकांवर धावपळ सुरू होती. थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल पाच ट्रेन कोकण रेल्वेच्या विविध स्थानकावर थांबल्या होत्या. पाच हजाराहून अधिक प्रवासी त्यात होते. पाऊस कधी थांबेल हे सांगता येत नव्हतं. प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी अवघ्या काही वेळात कोकण रेल्वेची संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. सर्वप्रथम प्रवाशांच्या नाष्टाची व्यवस्था केली. ज्या गाड्यात पँन्ट्री होत्या, तिथे तयारी सुरू झाली. पण जिथे ही व्यवस्था नव्हती, अशा कामथे आणि अन्य ठिकाणी मोठे आव्हान होते. मुसळधार पावसात कोरे कर्मचार्यांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि हजारो प्रवाशांच्या नाष्टाची व्यवस्था झाली. पावसाचा जोर ओसरला नाही, मग दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा तेही आव्हान लिलया पेलले.
सर्वाधिक जिगरबाज काम केलं ते रात्री चिपळूण स्थानकातील कोकण रेल्वेच्या कर्मचार्यांनी. सकाळपासून दिलेल्या नाश्ता-जेवण-नाश्त्याने स्थानकातील जेवणाचा सगळं जिन्नस संपला होता. स्थानकात उभ्या असलेल्या तुतारी एक्सप्रेसमधील प्रवाशांना रात्रीचे जेवण द्यायचे कसे हा मोठा प्रश्नच होता. चिपळूणच्या स्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा होता. बाहेरुन साहित्य स्टेशनला येण्याचा मार्गच बंद झाला होता. या स्थितीत खेड स्थानकात जेवण करण्याचा निर्णय झाला.
साडे पाचशे लोकांचे हे जेवण टॉवर व्हॅनच्या माध्यमातून अंजनी स्थानकापर्यंत आणण्यात आले. इथे एक नवं संकट उभे होते. इथून पुढे चिपळूणच्या मार्गावर पुराचे पाणी चढले होते. जेवण चिपळूणकडे जाणं कठीण होते. कोरेच्या चाळीस कर्मचार्यांनी एकमेकांचे हात धरत पुराच्या कंबरभर पाण्यातून पाचशे लोकांचे जेवण अंजनीवरून चिपळूण मार्गावर उभ्या असलेल्या आरएमव्हीपर्यंत नेले. मुसळधार पाऊस आणि मिट्ट काळोखात पाया खालच्या ट्रॅकखाली जमीन आहे की नाही याची कल्पना नसतानाही हे धाडस जीवावर बेतणार होतं. या जिगर बाजांनी तुतारीतील या शेकडो लोकांच्या जेवणासाठी हे धाडस केले.
आठ तासात रुळ झाले ठिकठाक
पूर ओसरला आणि लक्षात आलं की चिपळूणजवळील कोकण रेल्वेच्या मार्गावरील ट्रॅक खालील खडीच पूर्णतः वाहून गेली. हा पॅच कित्येक मीटरचा होता. पुन्हा एकदा कोकण रेल्वेची टीम सज्ज झाली. महत प्रयासाने साहित्याची जुळवाजुळव केली आणि सलग आठ तास सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. वाहून गेलेला मोठा मार्ग पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पहाटेचे पावणे चार वाजले. त्या मेहनतीमुळे खोळंबलेल्या हजारो लोकांचा प्रवास पुन्हा सुरु झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.