कोकणात राम्बुतान लागवडीचा शेतकऱ्याचा प्रयोग

मणचेत उत्पादन : गतवर्षी ४८० किलो उत्पादन; प्रतिकिलो सरासरी २५० ते ३००
राम्बुतान
राम्बुतान sakal
Updated on

वैभववाडी : पाच सहा वर्षांपूर्वी मणचे (ता. देवगड) येथील नासीर सोलकर यांनी लागवड केलेल्या राम्बुतानला सलग दुसऱ्यावर्षी दर्जेदार उत्पादन आल्यामुळे कोकणात राम्बुतान लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर्षीचा फळांचा हंगाम सुरू झाला असून, ही फळे आता जिल्हावासीयांना चाखता येणार आहेत. यावर्षी १ टनच्या सुमारास उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा श्री. सोलकर यांना असून सध्या प्रतिकिलो ३०० रुपये दराने विक्री सुरू आहे.

मणचे येथील नासीर कैमुद्दीन सोलकर या तरूण शेतकऱ्याने २०१५-१६ मध्ये केरळ येथील कांजिरापल्ली येथुन रोपे आणून गावांपासून काही अंतरावर असलेल्या पेंढरी येथे लागवड केली. खडकाळ आणि उताराच्या जमीनीवर त्यांनी ही लागवड केलेली आहे. १५ फुट अंतरावर ही लागवड करून झाडांना ठिंबक सिंचनचा वापर त्यांनी केला आहे. लागवड केल्यानंतर अतिशय उत्तम व्यवस्थापन श्री. सोलकर यांनी केले.

कोकणात प्रथमच व्यावसायीक स्वरूपात हा प्रयोग केल्यामुळे श्री. सोलकर यांच्या मनात एक प्रकारचे कुतुहल आणि धाकधुक देखील होती. या झाडांना फळे लागतील का? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला होता; परंतु तिसऱ्या वर्षी त्यांच्या मनातील प्रश्न कायमचा दुर झाला. झाडांना चांगली फळे लागली. ती परिपक्व देखील झाली. त्यानंतर गेल्यावर्षी तौक्ते वादळात देखील ही झाडे टिकून राहीली. त्यामुळे झाडांच्या मजबुतीविषयीची शंका दुर झाली. गेल्यावर्षी श्री. सोलकर यांनी ४८० किलो उत्पादन घेतले. त्यांना प्रतिकिलो सरासरी २५० ते ३०० रूपये दर मिळाला. त्यामुळे हे वर्ष श्री. सोलकर यांच्या दृष्टीने खुप महत्वाचे होते. यावर्षी चांगले उत्पादन आल्यास राम्बुतान लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असे मानता येणार होते.

दरम्यान यावर्षी देखील राम्बुतानला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली असून आठ दहा दिवसांपासून ती परिपक्व होण्यास सुरूवात झाली आहेत. यावर्षीचा हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यत श्री. सोलकर यांनी २० किलो फळांची विक्री केली आहे. साधारणपणे प्रतिकिलो ३०० रूपयांनी या फळांची विक्री सुरू आहे. त्यामुळे राम्बुतान फळांची चव आता जिल्हावासीयांना चाखता येणार आहे. यावर्षी त्यांना साधारणपणे १ टन उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. सलग तिसऱ्यावर्षी चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे हापुसच्या प्रांतात आता राम्बुतान लागवडीचा मार्ग देखील मोकळा होणार आहे.

राम्बुतानची लागवड कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून केली आहे. हे पीक कोकणात घेण्यात योग्य आहे किंवा नाही हे संशोधनातून तपासण्यात येईल. टप्प्याटप्य्यावर निष्कर्ष काढून त्यानंतर कोकणात लागवडीस योग्य की अयोग्य हे सांगता येईल; परंतु तूर्तास काहीही सांगता येणार नाही. एखाद्या लागवडीविषयी झटपट निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते.’’

- डॉ. प्रदीप हळदवणेकर, सहयोगी अधिष्ठाता, उद्यान महाविद्यालय, मुळदे

राम्बुतानची लागवड केल्यानतंर तिसऱ्या वर्षी किरकोळ उत्पादन मिळाले होते. त्यानंतर गेल्यावर्षी ४८० किलो उत्पादन मिळाले. यावर्षी १ टन उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. जुलै-ऑगस्टपर्यत फळे मिळतील असा अंदाज आहे.’’

- नासीर सोलकर,शेतकरी, मणचे, देवगड

राम्बुतानविषयी

लिची वर्गातील हे फळ

मलेशिया, थायलंड, इंडोनोशिया देशात उत्पादन

केरळ, कर्नाटकात उत्पादन

सी जीवनसत्व, कॉपर, फॉस्फरस, लोह, झिंक आदी घटक

काढणीनंतर २१ दिवसांपर्यत फळ सुरक्षित

फळावर केसासारखे आवरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.