कोयना प्रकल्प देतोय वीजटंचाईतून दिलासा

०.४० टीएमसी जादा पाणीवापर ; जलसंपदाची विशेष मंजुरी
कोयना जलविद्युत प्रकल्प
कोयना जलविद्युत प्रकल्पSakal
Updated on

रत्नागिरी - विजेची मागणी आणि निर्मिती यामध्ये सुमारे अडीच ते तीन हजार मेगावॅटची तूट निर्माण झाल्याने भारनियमनाचे मोठे संकट देशासह राज्यावर आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात यातून वगळण्यात आले असले तरी कोयना जलविद्युत प्रकल्पाने वीजटंचाईपासून काहीसा दिलासा दिला आहे. एरवी वीजनिर्मितीसाठी दररोज ०.३० टीएमसी पाणी वापरले जात होते; मात्र आता विजेची मागणी वाढल्याने मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या ०.७० टीएमसी पाणी वापरले जात आहे. म्हणजे ०.४० टीएमसी एवढे जादा पाणी वापरले जात आहे. प्रतिकूल परिस्थिती पाहता वीजनिर्मितीसाठी आणखी १० टीएमसी पाणीसाठा वापरण्यास जलसंपदा विभागाने विशेष मंजुरी दिली आहे.

विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभुतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र विजेची वाढती मागणी व कोळश्याअभावी अपुऱ्या वीजनिर्मितीमुळे सुमारे २ हजार ५०० ते ३ हजार मेगावॅट विजेची तूट भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागात आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे. गेल्या फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर देखील वाढला आहे. त्यामुळे राज्यात २८ हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यःस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत तब्बल ४ हजार मेगावॅटने वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून महावितरणची विजेची मागणी २४ हजार ५०० ते २४ हजार ८०० मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी २५ हजार ५०० मेगावॅटवर लवकरच जाईल, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या कालावधीत देखील २२ हजार ५०० ते २३ हजार मेगावॅट विजेची मागणी आहे. सध्याच्या अभुतपूर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये महावितरणला २५०० ते ३००० मेगावॅट विजेच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाइलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते.

सध्या १८०० मेगावॅट विजेची निर्मिती

या परिस्थितीमध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पाने महावितरणला चांगला हात दिला आहे. या प्रकल्पातून सध्या १८०० मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे. येत्या ३१ मे पर्यंत जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण निर्धारितपैकी आता १७.६० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एरवी वीज निर्मितीसाठी दररोज ०.३० टीएमसी पाणीवापर होत असताना विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या तब्बल ०.७० टीएमसी पाणीवापर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.