बांदा : व्हेल माशाच्या उलटी तस्करीप्रकरणी बांदा पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांना कुडाळ न्यायालयाने बुधवार (ता.१५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या तस्करीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. उलटी खरेदी करण्यासाठी आलेला मुख्य सूत्रधार पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागल्याने निसटून जाण्यात यशस्वी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे 'डिल' शनिवारी (ता.११) बांद्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उधळून लावले होते. याप्रकरणी गोव्यातील कॉन्स्टंटटिनो फिलोमेनो फर्नांडिस, जुजू जोस फेरीस व तनिष उदय राऊत यांना अटक केली होती. आज सकाळी त्यांना कुडाळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
तिघेही संशयित सराईत
पोलिसांनी सांगितले, की अटक केलेले तिघेही संशयित सराईत आहेत. व्हेल माशाच्या उलटीची तस्करीची माहिती गुन्हे अन्वेषणच्या पथकाला पंधरा दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानुसार पथक संधीची वाट पाहत होते. तिघेही गुंगारा देत होते. तिघांनी व्यवहारासाठी बडी आसामी शोधली होती. सोयीचे ठिकाण म्हणून बांद्याची निवड केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांचे पथक संशयितांच्या गोव्यातून मागावर होते.
यातील फर्नांडिस व फेरीस शहरात सकाळीच मोटारीने आले होते. दोघेही एका हॉटेलमध्ये उतरले. पोलिसांच्या पथकाने मुद्देमाल असण्याच्या संशयाने त्यांना सकाळीच ताब्यात घेतले होते; मात्र मुद्देमाल नसल्याने पोलिसही संभ्रमात पडले. अखेर पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी मुद्देमाल तोरसे येथील तनिष राऊतकडे असल्याची माहिती दिली. तत्पूर्वी तिघाही संशयितांनी बांद्याची रेकी केली होती. त्यावेळी एकत्रित सीमेवर गोवा हद्दीत जेवणही केले होते.
डिलिंगसाठी रवाना
खरेदीदाराने बांद्यात येण्यासाठी दुपारची वेळ दिल्याने जेवण करून तिघेही संशयित वेगवेगळ्या मार्गाने बांद्यात दाखल झाले; मात्र पोलिसांच्या पथकाने घाई करत यातील दोघांना कट्टा कॉर्नर चौकात मोटारीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर तिसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गांधी चौक बाजारपेठेत सापळा रचला. प्लास्टिकच्या पिशवीतून दुचाकीने उलटी घेऊन येणाऱ्या तनिष राऊतला पोलिसांच्या पथकाने अलगद ताब्यात घेतले.
कमिशनच्या आमिषाने कृत्य
उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात काही कोटींमध्ये किंमत असते. उलटी अतिशय दुर्मिळ असते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाला मुद्देमाल सोपविण्यासाठी तिघाही संशयितांना एक लाख रुपये कमिशन देण्याचे ठरले होते; मात्र खरेदीदार न येताच तिघेही संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने मुख्य सूत्रधारपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. तस्करी प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी सांगितले. तिघेही पोलिसांना वेगवेगळी माहिती देत आहेत. उलटी नेमकी कुठून मिळविली, तसेच ते कोणाला विक्री करणार होते, याचा शोध घेण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.