बंदा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बांदा-सटमटवाडी येथील अत्याधुनिक सीमा तपासणी नाका येत्या १५ दिवसांत सुरू करण्याच्या सूचना राज्याने दिल्याने ठेकेदार कंपनीकडून येथील अंतिम टप्प्यातील कामे युद्धपातळीवर सुरू आहे. गणेश चतुर्थी कालावधीत वाहनांना या नाक्यावर तपासणी करूनच राज्यात प्रवेश मिळणार आहे. यामुळे गोव्यातून येणारी प्रत्येक गाडी यापुढे ‘स्कॅन’ होऊनच सिंधुदुर्गात प्रवेश करू शकणार आहे. बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
गेली १५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा सीमा तपासणी नाका लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आर्टिवो विभागाने दिली आहे. गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता. तपासणी नाका सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर व कालावधी कमी असल्याने येथील सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. हा अत्याधुनिक तपासणी नाका असल्याने याठिकाणी प्रशासकीय तांत्रिक बाबींबरोबरच प्रवाशांनाही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सीमेवर ठिकठिकाणी अत्याधुनिक २२ तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बांदा सटमटवाडी येथील तपासणी नाक्याचा देखील समावेश आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर २००७ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. मात्र तपासणी नाक्यासाठी ३२ एकर क्षेत्र संपादित करण्यात आल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी प्रचंड विरोध करत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शासनाने बळाचा वापर करत पोलीस बंदोबस्तात भुसंपादन व सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली होती.
नाक्याच्या विरोधात हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने तपासणी नाक्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. न्यायालयीन मार्ग मोकळा झाल्याने हा तपासणी सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या. ठेकेदार कंपनीला लवकरात लवकर नाका सुरु करण्यासाठी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. शासनाने गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधल्याने याठिकाणी युद्धापातळीवर कामे पूर्ण करण्यात येत आहेत. यासाठी दिवसरात्र कामे सुरु आहेत. या नाक्यावर आरटीओ, पोलीस, वनविभाग, उत्पादन शुल्क, महसूल, दहशतवाद विरोधी पथक तसेच अमली पदार्थ विरोधी पथक अशा सात विभागाचे कर्मचारी २४ तास सेवा बाजाविणार आहेत.
हा अत्याधुनिक तपासणी नाका असून या नाक्यावरून प्रवास करणारे कोणतेही वाहन हे डिजिटल स्कॅनिंग होऊन बाहेर पडणार आहे. यामुळे दारू वाहतूक, अमली पदार्थ वाहतूक याची तत्काळ माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही मार्गांवर नाका उभारण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी संकुल उभारण्यात आले आहे. नाक्याच्या परिसरातील सर्व इमारतीची साफसफाई व रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याठिकाणी सात विभागाचे कार्यालय होणार असल्याने प्रत्येक इमारतीला खत्यानुसार नावे देखील देण्यात आली आहेत. महामार्गावार इन्सुली खामदेव नाका तर गोव्यातून प्रवेश करताना पत्रादेवी येथून पुढे तपासणी नाका असल्याने वाहने सावकाश चालवा अशा आशयचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच वेगमर्यादा व दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.
दोन मार्गिकांवर वजनकाटे
हलकी व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेसात टन असेल त्यांच्याकडून ४७ रुपये २० पैसे, मध्यम व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेबारा टन असेल त्यांच्याकडून ९४ रुपये ४० पैसे, जड व अतिजड व्यावसायिक वाहनांचे वजन १२ टनच्या पुढे असेल त्यांच्याकडून १८८ रुपये ८० पैसे टोल आकरण्यात येणार आहेत. यासाठी नाक्याच्या दोन मार्गिकांवर वजनकाटे लावले आहेत. यातून कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या तसेच शासनाच्या संरक्षण विभागाची वाहनांना सवलत आहे.
तपासणी नाक्यावरील सुविधा
प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष, प्रतीक्षालय
प्रसाधनगृह, एटीएम, स्नानगृह, प्रथमोपचार केंद्र
दिव्यांगांसाठी बेड व व्हीलचेअर, वैद्यकीय अधिकारी
अत्यवस्थ रुग्णासाठी रुग्णवाहिका
वाहन स्कॅनिंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा
२४ तास सीसीटीव्हीची नजर
माल वाहनांकडून मालाच्या वजनानुसार टोल
बांदा येथील तपासणी नाका सुरू करण्याची प्रक्रिया शासकीय पातळीवर सुरू असून, यासाठीच नाक्याचे काम पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. याठिकाणची बहुतांश कामे पूर्ण झाली असून, काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. शासनाचा आदेश आला की तत्काळ तपासणी नाका सुरू करण्यात येणार आहे.
- नंदकिशोर काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.