संगमेश्वर (रत्नागिरी) : चाकरमान्यांना गावात घ्यायचे सोडाच, पण त्यांच्याकडे कुणीही बघायलासुद्धा तयार नसताना संगमेश्वर तालुक्यातील धामापूर (संगमेश्वर) मधील देवस्थळी कुटुंबीयांनी आपल्याच घराशेजारचे आपले रिकामे घर चाकरमान्यांना उपलब्ध करून देत "येवा आमचे घर आपल्यासाठीच" असा धाडसी दृष्टिकोन दाखवला आहे.
कोरोनाच्या हाहाकारात चाकरमान्यांनी गावची वाट धरली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढली. गावागावांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अशा स्थितीत देवस्थळी कुटुंबीयांची भूमिका गावात सकारात्मक वातावरण तयार करण्यास महत्वाची ठरली. कोरोना लढाईत आत्मनिर्भर बनलेल्या देवस्थळी कुटुंबीयांच्या या प्रेरणेने आता गावकरीही पुढे सरसावले असून गावात रिकामी घरे शोधून चाकरमान्यांची व्यवस्था केली जात आहे. जगासह देशात आणि राज्यासह मुंबईत कोरोनाची प्रचंड लाट आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने चाकरमानी हवालदिल झाले होते. अशातच चौथ्या लॉकडाऊनपूर्वी त्यांना गावी येण्याची संधी मिळाली.
चाकरमानी गावी आले आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढू लागली. यामुळे एरवी चाकरमानी गावात आले की, दिवाळी साजरी करणारे गाववाले त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. अशा स्थितीत त्यांचे हाल काय होतील, यावर धोका पत्करण्याची तयारी दाखवली, माखजनजवळच्या धामापूर गावातील देवस्थळी कुटुंबाने. गावातील सुवर्णा आणि सूर्यकांत देवस्थळी यांनी आपल्या घराशेजारीच रिकामे असलेले घर चाकरमान्यांना उपलब्ध करून दिले. 16 मे पासून याच घरात 4 चाकरमानी राहत आहेत. आणखी 2-4 जणांची सोय इथे होऊ शकते. देवस्थळींचा मुलगा नोकरीनिमित्त मुंबईत आहे. कोरोना नियंत्रणात आल्याशिवाय तो गावी येणार नाहीये. अशा स्थितीत या कुटुंबाने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे आता गावकरीही चाकरमान्यांच्या सोयीसाठी पुढे सरसावले आहेत.
हेही वाचा-दैव बलवत्तर : हुक्केरीत छतासह पाळण्यात झोपलेले बाळ हवेत उडाले अन्...
कौतुकाचा विषय
ज्या धामापूर गावात देवस्थळी कुटुंबीयांनी हे धाडस दाखवले आहे, त्याच गावात काल दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. अशा स्थितीत या कुटुंबाने आणि गावाने दाखवलेले हे धाडस कौतुकाचा विषय ठरणार हे निश्चित आहे.
आमचं चाकरमान्यांशी रक्ताचं नातं नसलं तरी गावाचं त्यांच्याशी आणि त्यांच गावाशी नक्कीच नातं आहे. यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. कोरोना लढाईत प्रत्येकाने असा सकारात्मक विचार केल्यास अडचणींवर मात करता येईल.
- सूर्यकांत देवस्थळी, धामापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.