मनुस्मृतीच्या शिकवणीमुळे धर्माच्या रचनेत विषमता मानली जायची. महिलांना मूलभूत अधिकारांपासून दूर ठेवले जात होते.
महाड - शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष, महिलांची रॅली, विविध अभिवादन सभा अशा उत्साही वातावरणात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत महाडमध्ये रविवारी क्रांतीस्तंभ येथे मनुस्मृती दहनाचा ९५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
मनुस्मृतीच्या शिकवणीमुळे धर्माच्या रचनेत विषमता मानली जायची. महिलांना मूलभूत अधिकारांपासून दूर ठेवले जात होते. समाजव्यवस्थेला हादरा देण्यासाठी अस्पृश्य व स्त्रियांच्या मुक्ततेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करून समाजातील अनिष्ट परंपरांचे जोखड मोडून काढले.
मनुस्मृती दहनाच्या स्मृती म्हणून महाड येथे ५१ फुटी उंचीचा क्रांतीस्तंभ उभारण्यात आला आहे. समता, बंधुभाव व प्रेमाचा संदेश देणाऱ्या या क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो अनुयायी येतात. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
स्मृतीदिनाकरिता भीमसैनिकांची महाडच्या क्रांतीस्तंभाजवळ रविवारी गर्दी केली होती. वीर रेल्वे स्थानकावर देखील भीमसैनिकांची गर्दी झाली होती. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक सामाजिक, राजकीय, संघटनांच्या प्रतिनिधींनी महाडमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे चवदारतळे तसेच क्रांतीस्तंभ परिसर भीमसैनिकांनी गजबजून गेला होता. शनिवारी रात्रीपासूनच याठिकाणी अनुयायी दाखल होऊ लागले होते.
महिला मुक्तीदिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. विकास वंचित दलित महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत अनेक वर्षांपासून महाडमध्ये यानिमित्त रॅली काढून सभा घेतात.
यंदाही शाहू, फुले, डॉ. आंबेडकरांचा जयघोष करत क्रांतीस्तंभ, चवदारतळे मार्गे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक अशी रॅली काढण्यात आली.
आनंदराज आंबेडकरांची उपस्थिती
महाडमध्ये मनुस्मृती दहन दिनानिमित्त विविध संघटनांचे कार्यक्रम झाले. यावेळी बौद्धजन पंचायत समितीच्या अभिवादन सभेस समिती सभापती आनंदराज आंबेडकर उपस्थित होते. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास व क्रांतीस्तंभाला अभिवादन केले. त्यांच्या समवेत अशोक जाधव, दीपक गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपालिकेकडूनही पाणी व स्वच्छतेची व्यवस्था केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.