गुहागर (रत्नागिरी) : पारदर्शकतेचा अभाव, अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्चित नाही, असे अनेक आरोप करत महाराष्ट्र राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळच बरखास्त करून टाकण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे सर्वाधिक नुकसान अंजनवेलमधील शाळा, विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीला सोसावे लागणार आहे. तालुक्यातील सर्वाधिक पायाभूत व शैक्षणिक सुविधा आणि उत्तम शिक्षक, कर्मचार्यांची नेमणूक अशी ओळख निर्माण करण्यासाठी अंजनवेल ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून 2 कोटींपेक्षा जास्त खर्च भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेवर केला आहे.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. तेथील सरपंच यशवंत बाईत यांनी दूरदृष्टीने आरजीपीपीएल, केएलपीएलकडून येणार्या लक्षावधी रुपयांच्या ग्रामनिधीतून विविध ग्रामोपयोगी योजनांची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय शिक्षण देणार्या शाळांची योजना आखल्यावर अंजनवेलमध्ये अशी शाळा व्हावी यासाठीही यशवंत बाईत यांनी थेट शिक्षणमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला.
6 पदवीधर प्राथमिक शिक्षकांची नेमणूक
अंजनवेलमध्ये शाळा मंजूर झाल्यानंतर शाळेतील सर्व मुलांना ग्रामपंचायतीने गणवेश दिला. दररोज काजू, बदाम, पिस्ता व मनुका असा पौष्टिक आहार मुलांना देण्यासाठी ग्रामपंचायत खर्च करत आहेत. 20 कि.मी. परिसरातील मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी सुमारे 52 लाखाच्या 3 स्कूलबसची व्यवस्था केली. अंगणवाडीतील मुलांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून 6 पदवीधर प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केली. शाळा व परिसर स्वच्छतेसाठी 3 सफाई कामगार नियुक्त केले.
ग्रामनिधीमधून शाळेचा खर्च
पोषण आहार शिजवून देण्यासाठी 4 महिला कर्मचारी नियुक्त केल्या. शाळा व अंगणवाडीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. यासाठी होणारा खर्च अंजनवेल ग्रामपंचायत ग्रामनिधीमधून करत आहे.
या शाळेत शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातून चौकशी सुरू आहे. त्यामुळे भविष्यात नवीन शैक्षणिक संकुल बांधण्यासाठी 100 गुंठे जागा ग्रामपंचायतीने आरक्षित केली आहे. शिवाय 9 वर्ग खोल्या, 4 स्वच्छतागृहे, रंगमंच, कार्यालय आदी बांधकामासाठी 1 कोटी 36 लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
150 विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश
अंजनवेल गावामधील तीन जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांना एकत्रित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था केली गेली. तालुक्यातील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला. आता हे शिक्षण मंडळ बरखास्त केल्याने अंजनवेलमधील शाळांसमोर, विद्यार्थ्यांसमोर आणि ग्रामपंचायतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.