मालवण - वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र अक्षरशः दाणादाण उडविली आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी वादळी वाऱ्याचा तडाखा खालची देवली गावास बसला. यात काही ग्रामस्थांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारी काही काळ उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा सायंकाळी जोरदार हजेरी लावली.
दरम्यान, येथील बंदरात तीन नंबरचा वादळी बावटा लावला आहे. पावसासोबत वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मच्छिमार व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने आजपासून मुसळधार, अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार रात्री उशिरापासून पावसाचा जोर वाढला होता. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बागायत, आचरा-चिंदरसह अन्य भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गोठणे ते किर्लोस असणाऱ्या बंधाऱ्यावर पाणी वाढल्याने मार्ग बंद झाला होता.
अनेक ठिकाणी हीच स्थिती कायम आहे. शहरात अनेक ठिकाणी सखल पाणी भरले आहे. काही ठिकाणी घरांना पाण्याने वेढा दिला आहे. काही रस्ते पाण्याखाली आहेत. गटार ओव्हरफ्लो झाले आहेत. परिणामी रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
शहरातील धुरीवाडा व भरड भागातील काही गटारे पावसाच्या पाण्यामुळे तुंबली होती. याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक यतीन खोत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याची माहिती पालिका प्रशासनास देत कर्मचाऱ्यांना बोलावून घेत तुंबलेली गटारे मोकळी करून घेतली.
महसूलकडून नुकसानीचे पंचनामे
चिवला बीच मार्गावरही गटार व मोऱ्या तुंबल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परिणामी काही घरांना पाण्याने वेढा दिला होता. पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या मोऱ्या, गटारी साफ करण्याची कार्यवाही यतीन खोत यांनी केली. त्यामुळे या भागातील पाण्याचा चांगला निचरा झाला. शिल्पा खोत, रुजाय फर्नांडिस, राजा वालावलकर, मनोज शिरोडकर, सागर जाधव, सुमित हसोळकर, आनंद वळंजू, भरत जाधव, सुधा कासले, प्रणाली गायकवाड आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला.
तालुक्यातील नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे केल्याची माहिती नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.