रत्नागिरी : जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिले. जलजीवन मिशनसाठी केंद्र व राज्य शासनाकडून १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्रत्येक गावाला अनुदान प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाविषयी जालगांव (ता. दापोली) येथे कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. जाखड आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रेश्मा झगडे यांच्या हस्ते झाले.
डॉ. जाखड यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शोषखड्डे बांधकाम पूर्ण करून घेण्याच्या सूचना केल्या. सार्वजनिक स्तरावर गांडूळ व नेडॉप खतप्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापनसाठी स्थिरीकरण तळे, प्लास्टिक निर्मूलन व व्यवस्थापन करावे आणि ग्रामपंचायतीला हागणदारीमुक्त प्लसचा दर्जा मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी देऊन दरडोई किमान ५५ लिटर प्रतीदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या. कार्यशाळेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रूपा दिघे, सहाय्यक गटविकास अधिकारी बागल, उपअभियंता उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा दापोलीचे आनंदे उपस्थित होते.
लोकसंख्येनुसार अनुदान वाटप
केंद्र व राज्य शासनाकडून १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्रत्येक गावाला अनुदान प्राप्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशनमधून सार्वजनिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५ हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावाला प्रति व्यक्ती २८० रुपये, ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाला प्रती व्यक्ती ६६० रुपये अनुदान मिळेल. घनकचरा व्यवस्थापनासाठी ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावाला प्रती व्यक्ती ६० रुपये आणि ५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाला प्रती व्यक्ती ४५ रुपये असे अनुदान दिले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.