देवगड : सातत्याने होणारा हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि किडरोग यामुळे नुकसानीत सापडलेल्या तालुक्यातील आंबा बागायतदारांना भरपाई मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली कराव्यात, या मागणीचे निवेदन येथील तालुका राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. येथील नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी निवेदन स्विकारले.
बदलत्या हवामानामुळे अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार श्री. ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, चंद्रकांत पाळेकर, शरद शिंदे, सुधाकर शेटगे, सहदेव पेडणेकर, रसिका पेडणेकर, सुधीर देवगडकर, नागेश आचरेकर, जयराम कदम, तात्या वाळके, कृष्णा परब, उदय रूमडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, तालुक्यात गेले काही दिवस बदलत्या वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात सापडले आहे. सुरूवातीला आलेल्या मोहोरात नरफुलांचे प्रमाण अधिक राहिल्याने अपेक्षित फलधारणा झाली नाही.
त्यानंतर वाढलेल्या थंडीमुळे आंबा फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. पुढे अवकाळी पाऊस आणि वादळामुळे आंबा पीकाचे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे आंबा हंगामावर सावट आहे. त्यातच आंबा फळावर फळमाशीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे तयार झालेली आंबा फळे खराब होत आहेत. महागडी औषधे फवारून वाढीव उत्पादन खर्च होऊनही अपेक्षित उत्पन्न हाती येण्याची शक्यता नसल्याने आंबा बागायतदार पुरते हैराण झाले आहेत. त्यातच आता आंबा कॅनिंग व्यवसाय सुरू झाल्याने आंबा चोरीचे प्रमाण वाढले आहे.
एकीकडे गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट असताना दारू मिळवण्यासाठी आंबा फळांची चोरी होताना दिसत आहे. पोलीसांचेही याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसते. हवामान बदल, किडरोग आणि आंबा चोरी यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. यातून दिलासा देण्यासाठी भरपाई मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी आंबा बागायतदारांची मागणी आहे.
आंबा पीकावर फळमाशीचे मोठे संकट आहे. यामुळे तयार आंबा फळे खराब होत आहेत. पर्यायाने बागायतदारांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. कृषी विभागाने याचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
- नंदकुमार घाटे, ज्येष्ठनेते, राष्ट्रवादी देवगड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.