डायरेक्ट विक्रीने हापूस ग्राहकांच्या दारात; वाशीतील 20 टक्के आवक घटली

mango export from konkan direct sales from market in ratnagiri
mango export from konkan direct sales from market in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : कोरोनामुळे टाळेबंदीचे नियम कडक केल्यामुळे गतवर्षीप्रमाणे पुन्हा यंदाही थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोचवण्याचा फंडा बागायतदारांनी अवलंबला आहे. त्याचा परिणाम वाशीसारख्या मोठ्या फळबाजारावरही झाला आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात वाशीत दाखल होणार्‍या पेटींच्या संख्येत वीस टक्के परिणाम झाला आहे. आधीच उत्पादन कमी असल्यामुळे आवक घटली असल्यामुळे पेटींची संख्या कमी आहे. आंबा कमी झाल्यामुळे दरही वधारलेलेच आहेत. वातावरणातील अनियमित बदलांचा यंदाच्या आंबा हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपुष्टात आला असून दुसर्‍या टप्प्यातील आंबा 20 एप्रिलनंतर हाती लागेल, असा अंदाज आहे. या परिस्थितीमध्ये गतवर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. शंभर टक्के टाळेबंदीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज 20 हजार पेटी जाते. एप्रिलमध्ये ती 40 हजारापर्यंत दरवर्षी जाते. पाडव्याला अनेकजणं मुहूर्तासाठी आंबा पाठवत असल्याने वाशीतील आवक वाढते. यावर्षी उत्पादनच 20 टक्के असल्याने मागणी अधिक आणि आंबा कमी असे चित्र आहे. परिणामी आतापर्यंतच्या इतिहासात हापूसचे दर पेटीला 2 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत टिकून आहेत. दरवर्षी हेच दर पेटीला साडेतीन हजार रुपये असतात. दीड हजार रुपये अधिक दर मिळत आहे. गतवर्षी कोरोनामुळे सुरवातीलाच दर घसरलेले होते.

वाशीतील आवक कमी होण्यासाठी हापूसचे घटलेले उत्पादन हे एक कारण असले तरीही थेट ग्राहकांपर्यंतची विक्री हेही दुसरे कारण ठरत आहे. कोरोनामुळे गतवर्षी अनेक व्यावसायिकांनी मुंबई, पुण्यासह नाशिक, धुळे, नागपूर येथील ग्राहकांना थेट आंबा पाठवला. त्यामुळे ग्राहक, शेतकर्‍यांमधील दलालांचा दुवा तुटला आहे. यंदाही तोच फंडा अनेक बागायतदारांनी अवलंबल्याने वाशीत आंबा जाण्याच्या प्रमाणावर वीस टक्के परिणाम झाला. परजिल्ह्यातील अनेक व्यावसायिक दर्जेदार आंबा कमी दरात जागेवर खरेदी करण्यासाठी कोकणात दाखल होत आहेत. हेच व्यावसायिक दरवर्षी मुंबईतून आंबा विकत घेत होते. यंदा थेट आंबा जात असल्यामुळे वाशीतील व्यावसायिकांनीही दर चढेच ठेवल्याने त्याचा फायदा बागायतदारांना होत आहे.

"कोरोना ही आंबा बागायतदारांसाठी इष्टापत्ती ठरली आहे. संकटामध्येही शेतकर्‍यांनी आंबा थेट ग्राहकांच्या दारात पोचवत आहेत. मध्यमवर्गीय बागायतदार पन्नास टक्के आंबा या पद्धतीने विक्रीला काढत आहे."

- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार

"यंदा वाशीत येणार्‍या आंबापेटींची संख्या कमी झालेली आहे. उत्पादन घटले असून थेट ग्राहकांचा फंडाही अनेक बागायतदार अवलंबत आहेत. आवक कमी असल्यामुळे दरही समाधानकारक आहेत."

- संजय पानसरे, वाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.