कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - राष्ट्रीय महामार्ग 66 च्या चौपदरीकरणात प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत ठेकेदार कंपनीला काम करू देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षियांनी दिला. आपल्या विविध मागण्यांसाठी मनसेने घंटानाद आंदोलन येथील प्रांत कार्यालयासमोर केले. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.
मुंबई - गोवा महामार्गाचे काम गेले वर्षभर सुरू आहे. या महामार्गाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झालेले असून कुडाळ तालुक्यातील काही भागात काही गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. जमिन संपादित केल्याबाबतची कोणतीही नोटीस मिळालेली नाही. असे असताना संबंधित जमिनींमध्ये काम सुरू आहे. याविरोधात मनसेने घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज प्रांत कार्यालयासमोर मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. जिल्हा प्रशासन हाय हाय, सरकारचे पैसे नाही तर आम्ही आमचे पैसे मागत आहोत ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशा विविध घोषणांनी प्रांत परिसर दणाणून गेला.
हेही वाचा - मटण दरवाढीमागे हे आहे कारण
घटनास्थळी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. या प्रकल्पासाठी जो निधी मंजूर झाला त्याचे लवकरच वितरण केले जाईल. ठेकेदार कंपनीचा अतिरेकीपणा कधीही सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, पंचायत समिती सदस्य मथुरा राऊळ, सुशील चिंदरकर, राजू गवंडे, सतीश कुडाळकर, मंजुनाथ फडके, बबन बोभाटे, कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनीही न्याय्य मागण्यासाठी आमचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी नगरसेवक सुनील बांदेकर उपस्थित होते.
हेही वाचा - देवगड हापूसची धिमी सुरूवात
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रफुल्ल सुद्रिक, बाळ कनयाळकर, भास्कर परब, आत्माराम ओटवणेकर यांनी पाठिंबा जाहीर केला. मनसे नेते उपरकर यांनी शासन दरबारी न्याय्य हक्कासाठी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे, या मागण्यांसाठी आमचे घंटानाद आंदोलन आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी, बाळा वेंगुर्लेकर, प्रथमेश धुरी, कुणाल किनळेकर, गणेश चव्हाण तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर शेतकरी प्रकल्पग्रस्त आदी उपस्थित होते.
घंटानाद आंदोलन सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. यामुळे आंदोलकांचा संताप आणखी वाढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.