माथेरान : लॉकडाऊन काळात पर्यटकांना माथेरानमध्ये बंदी झाल्यानंतर काही दिवसांत माथेरान-अमन लॉज शटल सेवाही बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन उठल्यानंतर माथेरानची मिनी ट्रेन गुरुवारी (ता. 29) कार्यशाळेत नेण्यासाठी नेरळकडे रवाना झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांच्या शटल सेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
2 सप्टेंबरपासून माथेरान हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. पण, दस्तुरीपासून माथेरान बाजारपेठ हे दोन किलोमीटरचे अंतर चालताना पर्यटकांची दमछाक होत होती. त्यामुळे सातत्याने मिनी ट्रेन शटल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. येथील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला पत्रही दिले आहे. तसेच राज्य सरकारच्या आपत्ती, मदत व पुनर्वसन मंत्रालयाने माथेरान शटलसेवा संदर्भात हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार गुरुवारी दोन इंजिन आणि सहा बोगी घेऊन दुपारी 12 वाजता मिनी ट्रेन फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसह माथेरानहून नेरळला रवाना झाली आहे. त्यामुळे काही दिवसांतच माथेरान-अमन लॉज मिनी ट्रेन पर्यटकांसह स्थानिकांच्या दिमतीला धावणार आहे.
पिटलाइनचे काम पूर्ण
लोको शेड नेरळमध्ये असल्याने इंजिन व बोगीची कामे तेथील पिटलाइनमध्येच करावी लागत होती. त्यामुळे मिनी ट्रेन ही नेरळमध्ये आठवड्यातून एकदा पाठवली जायची. एखादी फेरी उशिराने अमन लॉज-माथेरान धावत होती. त्यामुळे रेल्वेने पिटलाईन माथेरानमध्ये करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दीड वर्षानंतर पिटलाईनची उभारणी झाल्याने इंजिन व बोगीची दुरुस्ती माथेरानमध्येच होणार आहे.
माथेरानमध्ये अडकून पडलेली मिनी ट्रेन नेरळच्या कार्यशाळेकडे रवाना झाली, ही आनंदाची बाब आहे. शटल सेवा सुरू व्हावी याबाबत आम्ही रेल्वे मंत्रालयाला आणि अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. लवकरच शटल सेवा पर्यटकांच्या दिमतीला धावेल, अशी आशा आहे.
- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा
(संपादन : उमा शिंदे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.