चिपळूण (रत्नागिरी) : शिरगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली जाधव यांच्यावर कोरोनाचे रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी आली. खबरदारी म्हणून त्यांनी त्यांच्या दहा महिन्याच्या बाळाला दूर ठेवले. वैद्यकीय सेवा देत असताना त्या कधी कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्या ते त्यांनाच समजले नाही. वैद्यकीय अधिकारी असूनही मन चिंतेत होते. पण प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास ढळू दिला नाही. वरिष्ठांनी दिलेला आधार, सामान्यांच्या सदिच्छांच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली आणि पुन्हा सेवेत रुजू झाल्या.
शिरगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये पदभार स्विकारला. पती अजिंक्य, मुलगा हर्षवर्धन आणि 75 वर्षाच्या आजींबरोबर त्या शिरगाव येथे राहत होत्या. एप्रिल 2020 मध्ये तळसर येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्णसंख्या वाढत गेली. त्यामुळे डॉ. जाधव यांची जबाबदार वाढली. त्यांच्या कार्यक्षेत्रात 11 गावे येतात. 21 हजार लोकसंख्येतून कोरोनाबाधित आणि कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले लोक शोधून काढण्याचे आव्हान होते.
सतत गावांना भेटी देवून बाळाला संभाळणे कठीण झाले. खासगी दवाखाने रूग्णांना तपासण्यास कचरत होते. त्यामुळे शिरगाव प्राथमीक आरोग्य केंद्र त्यांच्यासाठी हक्काचे झाले होते. रात्री-अपरात्री रूग्ण घरी येऊ लागले. त्यामुळे दहा महिन्याच्या बाळाला आणि आजीला त्यांनी रत्नागिरी येथे सासरवाडीत पाठवले. त्यानंतर रूग्णांना 24 तास सेवा देणे शक्य झाले.
कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबर साथीचे आजार असलेल्या रूग्णांवर उपचार, गरोदर महिलांच्या प्रसूती अशी आरोग्य सेवेची कामे सुरूच होती. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर बाधित रूग्णांशी अनेकदा संपर्क येत होता. 4 ऑगस्टला माझी कोरोना चाचणी घेण्यात आली. 9 ऑगस्टला मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला. पती सिव्हील इंजिनिअर आहेत. तेही चिंतेत होते पण आम्ही दोघांनी सकारात्मक विचार करत कोरोनाला सामोरे गेलो.
मी 14 दिवस होम क्वारंटाईन होऊन योग्य आहार आणि औषध उपचार घेत कोरोनावर मात केली आणि पुन्हा सेवेत रुजू झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, अडरे प्राथमीक आरोग्य केंद्राचे डॉ. यतीन मयेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे माझ्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. पोफळी कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. अलोरे, शिरगावसह इतर गावात चाचण्या घेवून आम्ही कोरोनाचे रूग्ण शोधून काढले. सध्या माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वीपणे राबवत आहोत. मी रूग्णसेवेत आहे पण माझे बाळ अजूनही माझ्यापासून लांबच असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
मी कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर सर्वांनी धीर दिला. सकारात्मक विचार करण्याची गरज सांगितली. मी पॉझिटीव्ह येण्यापूर्वी सासरवाडी आणि माहेरची लोक मला भेटून गेली होती. पण माझ्यामुळे एकही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह झाली नाही याचा आनंद आहे.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.