Deepak Kesarkar : 'तुम्हाला अजून किती संधी द्यायची? भाई.. आता पुरे, थांबा आता'; केसकरांविरोधात झळकले बॅनर
मुंबई, पुणे व कणकवली येथून आलेली पार्सल सावंतवाडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार आहे.
दोडामार्ग : तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या विरोधातील बॅनर चर्चेचा विषय ठरले. ‘आम्ही पंधरा वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलो असून तुम्हाला अजून किती संधी द्यायची?’ असा सवाल करण्याबरोबरच ‘भाई...आता पुरे, थांबा आता’ असा आशयही या बॅनरवर होता.
पोलिसांकडे या संदर्भात त्यांच्या समर्थकांनी निवेदन दिल्यानंतर हे बॅनर हटविण्यात आले; मात्र ते बॅनर नेमके लावले कोणी? याचे गूढ कायम आहे. मंत्री केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आपण लोकसभा लढवणार नसून विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर अनोळखी व्यक्तीने ऐन दिवाळीत हे बॅनर लावले.
तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या दोडामार्ग शहर व बाजारपेठ, साटेली-भेडशी बाजारपेठ यांसह मुख्य राज्यमार्ग व गावोगावी केसरकर यांच्या विरोधातील बॅनर बुधवारी (ता. १५) सकाळी पहावयास मिळाले. दोडामार्ग शहर व बाजारपेठेतील बॅनर नगरपंचायतीने तात्काळ हटविले; मात्र इतर भागातील बॅनर न हटविल्याने ते तसेच राहिले व यावरील मजकूर सर्वांसाठीच चर्चेचा विषय बनला.
‘दोन वेळचे नगरसेवक, एकदा नगराध्यक्ष, तीन वेळा आमदार, एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री, चार वेळा पक्ष बदलल्यात आणि आता तर शिक्षणमंत्री. तुमी वरती चढत गेल्यात आणि प्रत्येक वेळाक नवीन नवीन काय काय सांगल्यात. आमका पटत गेला. हत्तींच्या वेळाक तसा, पूर इलो तेवा तसा, शेतीचा नुकसान झाला तेव्हा तसा आणि तुम्ही स्वतः शिक्षणमंत्री असानव आमच्या दोडामार्गातल्या ९० टक्के शाळा बंद पडले हत, असा कितकेंदा झाला'', असा उल्लेख त्या बॅनरवर होता.''
आता तर आमच्या दोडामार्गातली आरोग्य व्यवस्था संपल्यात जमा आसा. लोकांका साधो सर्दी, ताप इलो तरी गोयात जावचा लागता. हाल्लीच्या हाल्ली दोडामार्ग हॉस्पिटलातली बाळंतपाणा बंद झाली. दोन म्हयन्यात ५४ बाळंतपणा गोयात झाली. मागच्या १५ वर्षात जग खय गेला आणि आमी थयच रवलो. आता तुमका अजूनय वेळ दिव म्हणतासात. हेच्यापेक्षा आणखी वेगळा काय करतल्यात?''
दोडामार्ग रुग्णालयातील आरोग्य सेवा रामभरोसे आहे. कंत्राटी डॉक्टरांनी राजीनामा दिला असून गेली दोन महिने महिला प्रसूती कक्ष बंद आहे. आपण पंधरा वर्षे आमदार, दोन वेळा मंत्री आणि चारवेळा पक्ष बदलून देखील दोडामार्गातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला अजून किती संधी द्यायची? भाई, आता पुरे, थांबा आता, असा शेवट या बॅनरवर होता.
दरम्यान, तालुक्यात इतरत्र लागलेले बॅनर हटवण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना दोडामार्ग शहर प्रमुख योगेश महाले यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली. यानंतर पोलिसांनी ते बॅनर हटविले; मात्र ते नेमके लावले कोणी? याचे गूढ कायम आहे.
'हिंमत असेल तर समोर या'
बदनामीचे बॅनर लावणारी ही एक एजन्सी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची बदनामी करण्यासाठी काहींनी केलेल्या केविलवाण्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसांना हिंमत असेल तर समोर येऊन केसरकरांनी कोणती विकासकामे केली नाहीत ते दाखवून द्यावे, असे आवाहन दोडामार्गच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मुंबई, पुणे व कणकवली येथून आलेली पार्सल सावंतवाडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार आहे. जनतेने केसरकरांना पसंती दिली आहे. त्यामुळे ही पार्सल जिथून आली तेथे पोहोचवणार, अशी खरमरीत टीका नाव न घेता विरोधकांवर केली आहे. शिक्षणमंत्री केसरकरांविरोधात बॅनर लावण्यात आले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना कार्यकर्त्यांनी दोडामार्ग शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निषेध केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.