माझ्याकडून नेमकी कोणती चूक झाली आहे, हे विद्यमान नेतृत्वाने समजावून सांगावे.
मंडणगड : दापोली-मंडणगड-खेड मतदारसंघात ज्या गद्दारांमुळे शिवसेनेचा भगवा खाली उतरवला गेला, त्या भगव्याच्या सन्मानासाठी आणि शिवसेनेच्या वाढीसाठी २०१७ पासून मतदारसंघातील ग्रामीण भाग पिंजून काढून शिवसेनेला बळकट केले. शिवसैनिकांचे जाळे तयार करण्याचे आवाहन पेलून राष्ट्रवादीच्या घशात गेलेला हा मतदारसंघ काबीज केला. शिवसेना वाढवणे चूक असेल तर शिक्षा भोगायला मी तयार आहे, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी केले.
पक्षनिष्ठा ठेवून एवढे मोठे काम मी केवळ शिवसेनेसाठीच केले असताना फक्त वैयक्तिक आकसापोटी शिवसेना पक्षप्रमुखांना खोट्या बातम्या व खोटी माहिती पुरवून माझे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव करणाऱ्यांना पक्ष जर कोणतीही खातरजमा न करता बक्षीस देत असेल व मला शिक्षा देत असेल तर शिवसेनेच्या निष्ठेसाठी शिक्षा भोगायला मी तयार आहे. ते म्हणाले, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दापोली मतदारसंघ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने सेनेच्या हातून निसटला व पराभव शिवसैनिकांसह राज्याचे नेतृत्वाच्या जिव्हारी लागला.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २०१७ साली मी पक्ष संघटना बांधण्यास सुरवात केली. अवघ्या दोन वर्षात युवकांची मोठी संघटना बांधली. जुन्या, नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधत २०१९ च्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणत मतदारसंघ सेनेच्या पुन्हा एकदा ताब्यात घेतला. यानंतर पक्षांच्या माध्यमातून दापोली मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे आणून कोरोना विषाणू संसर्गाचे काळात मतदारसंघात दिवस रात्र काम केले. निसर्ग चक्रीवादळ असो वा फयान वादळ मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिलो. या काळात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत सेनेने प्रथम क्रमांकावर येत वर्चस्व राखले आहे. गेल्या पाच वर्षांचे काळात पक्षाचा जनाधार सातत्याने वाढविण्याचे काम केले असताना माझ्याकडून कोणती पक्षविरोधी कृती झाली आहे. माझ्याकडून नेमकी कोणती चूक झाली आहे, हे विद्यमान नेतृत्वाने समजावून सांगावे.
राज्य शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहचवण्याचे काम शिवसैनिक व युवासेनेच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात आले. असे असतानाही दापोली मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेपासून मला डावलण्यात आले. मी मतदारसंघात अतिशय सक्रियपणे काम करीत असताना या मतदारसंघाची निवडणुकांची जबाबदारी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपविण्याचा नेतृत्वाने घेतलेला निर्णय कोणत्या कारणांनी घेतला आहे, ती कारणेही मला अद्याप अवगत झालेली नाहीत.
शिवसेनेची सत्ता असताना आघाडीचा निर्णय घेताना उमेदवारांची संख्या का कमी करण्यात आली. मंडणगडमध्येही सेनेच्या वाट्याला कमी जागा का स्वीकरण्यात आल्या, कोणत्या निकषांचे आधारे या वाटाघाटी करण्यात आल्या, दोन्ही शहरात शिवसेनचा वाढलेला जनधारास विद्यमान नेतृत्वाच्या लेखी काहीच किंमत नाही का, असा प्रश्न आमदार कदम यांनी उपस्थित केला. या संधीमुळे महाआघाडीतील मित्र पक्षांचा मोठा लाभ होणार आहे, असे असले तरी पक्षाचा आदेश माझ्यासह सर्व शिवसैनिकांना मान्य असल्याचे या निवडणूक प्रक्रियेत मी कोणताही सक्रीय सहभाग घेतलेला नाही किंवा कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांनी संयमाने घ्यावे
कार्यकर्त्यांनी कोणताही निर्णय घाईघाईने न घेता संयमाने वाट पाहण्याचा संदेश आमदार योगेश कदम यांनी दिला आहे. शिवसेनेशी प्रामाणिक राहून पक्षाचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवणे व जनतेच्या पाठिशी राहायचे आहे. नेत्यामंधील वादाचा पक्षावर कोणताही परिणाम होवून द्यायचा नाही. आपणे भगव्याचे निष्ठावान पाईक असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपली उर्जा असल्याचे कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.