भर पावसात छप्पर उडाल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उघड्यावर पडली. काहींना शेजारच्या घरांमध्ये तात्पुरता आश्रय घ्यावा लागला.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव गोताडवाडीला चक्रीवादळाचा (Cyclone Ratnagiri) तडाखा बसला असून १६ घरांसह ८ गोठ्यांचे सुमारे 23 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. वेगवान वाऱ्यानी घरा, गोठ्यांवरील छपरे, कौले कागदासारखी हवेत उडून गेली. भर पावसात छप्पर उडाल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उघड्यावर पडली. काहींना शेजारच्या घरांमध्ये तात्पुरता आश्रय घ्यावा लागला. गावातील भले मोठे झाड वादळात उन्मळून पडले.
दोन ते तीन तास घोंगावणाऱ्या वादळाने गोताडवाडीवासीयांना दणका दिला. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि वेगवान वारे (Monsoon Rain) वाहू लागले. वाऱ्यांचा वेग काही क्षणात वाढला. फयानसारखे वारे वाहत असल्याची प्रतिक्रिया तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या वादळात खालगाव येथील माजी सरपंच दत्ताराम भागोजी गोताड, यशवंत भिकाजी गोताड, अनंत गुणाजी गोताड, संभाजी विठ्ठल गोताड, विष्णू विठ्ठल गोताड, समीर गोताड, गणपत गोताड, दीपक कातकर, अर्जुन गोताड, केशव गोताड, अंजली गोताड, विष्णू गोताड, यशवंत गोताड, चंद्रकांत गोताड, चंद्रकांत गावणकर, हरिश्चंद्र गोताड, संतोष गोंधळी, संदीप गोंधळी, शांताराम गोंधळी, शांताराम गोताड, दीपक गोताड, केशव गोताड, कृष्णा गोताड, महादेव गोताड, तुकाराम गोताड, गोविंद गोताड, सोनू कातकर, पांडुरंग कातकर, बाळकृष्ण कातकर आदी सर्वासामान्य शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यामध्ये दत्ताराम भागोजी गोताड यांचे घर नव्याने बांधण्यात आले होते. त्यांचे ६ ते ७ लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय संभाजी गोताड, विष्णू गोताड यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या वाडीतील १५ ते २० ग्रामस्थांना या वादळाची मोठ्याप्रमाणात झळ बसली. अनेक ग्रामस्थांच्या घरांवरील व गोठ्यांवरील कौले छप्पर उडाल्यामुळे कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. छप्पर उडून गेल्यामुळे पावसाच्या पाण्यात सर्व साहित्याचे नुकसान झाले. गोताडवाडी परिसरातील मोठमोठी वडाची झाडं, रिंगीची झाडे उन्मळून पडली. याशिवाय फणस, हापूस, काजू, नारळ अशी उत्पादन देणारी झाडे जमीनदोस्त झाल्यामुळे येथील शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.
ग्रामपंचायत खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य ,गावातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू माणिक गोताड यांच्यासह तीन वाड्यांतील ग्रामस्थांनी नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीचा आधार दिला. या नुकसानीची तहसीलदार राजाराम म्हात्रे, प्रवीण पांचाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदय बने, चंद्रकांत उर्फ बबन साळवी, सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, प्रतिक देसाई, यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकाऱ्यांनी वाडीतील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तत्काळ मदत पुरवली. घरांवर छप्पर उभारण्यासाठी हातभार लावला. शुक्रवारी उशिरापर्यंत खालगाव तलाठी कार्यालयाकडून सर्कल श्रीमती स्वाती तारळेकर, तलाठी मयुरा परांजपे, ग्रामसेवक गुरूप्रसाद शिवगण, पोलीस पाटील रमेश कांबळे, कर्मचारी प्रितेश खातू यांनी पंचनामे पूर्ण केले.
जाकादेवी विद्यालयातर्फे संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांनी घर उदध्वस्त झालेल्या दत्ताराम गोताड आणि शांताराम गोताड यांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची मदत दिली. जाकादेवी विद्यालयातील शिक्षकांनी एकत्र येऊन आप्तकालीन निधी उभारलेला आहे. त्या निधीतून नुकसानग्रस्तांना मदत दिली जाते. चेअरमन बंधू मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाळी तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाच्या वतीने हा धनादेश मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी ग्रामस्थांकडे सुपूर्द केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.